शिवचरित्र !!

शिवचरित्र !!

शिवचरित्र !!

पुस्तक लेखमाला क्रमांक – १

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच नुसते महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे एक अजरामर पराक्रमी योद्धा. आपण त्यांना दैवतही मानतोच. पण या छत्रपतींचा अचाट पराक्रम आणि त्यांची अनेक  वर्णने आपण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचतोच.तर आजचा हा छोटेखानी लेख म्हणजे शिवचरित्र आणि त्या संदर्भातील असलेल्या उपयुक्त संधर्भयुक्त पुस्तकांवर आहे.

माझ्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची अभ्यासाची सुरुवात ही इयत्ता चौथी मध्ये म्हणजे वयाच्या १० वर्षी झाली. आपणा सर्वांना ते पुस्तक परिचित असेलच. त्यानंतर ९० च्या दशकात श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या “जाणता राजा” या महानाट्याच्या प्रयोगावेळी त्यांनी लिहिलेले “राजा शिवछत्रपती” हे पुस्तक वाचनात आले. त्यानंतर नुसत्या कादंबरी न वाचता संदर्भ युक्त “शिवचरित्र” वाचण्याकडे कल वळू लागला. यानंतर आताच दोन खंडात  आलेली याच पुस्तकाची सुधारित आवृत्ती ही मिळवली.

याच शिवचरित्राची श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवप्रतिष्ठान मार्फत एक जनावृत्ती काढली होती. सांगलीच्या एक मित्राकडून तीही संग्रहात दाखल झाली.

अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना गो. नि. दांडेकर यांचा सहवास लाभला.त्यानंतर त्यांच्या ४ एकत्र कादंबरी लिहिलेल्या ” कादंबरीमय शिवकाल” या पुस्तकाने प्रचंड गारुड केले होते.

नोकरी करून गडकिल्ले फिरत असताना जाणवायला लागले की या गडकिल्ल्याना प्रचंड इतिहास लाभलेला आहे. मग अजून संधर्भ असलेली शिवचरित्राचा अभ्यास करण्याकडे कल वळला. त्यानुसार वा. सी.बेंद्रे यांचे शिवचरित्र दोन खंडात भेटले. तेही झपाटलागत वाचून काढले.

त्यानंतर आमच्या पुण्यातील एक मित्राने छत्रपती शिवरायांवर १९३६ साली छापलेले एक दुर्मिळ पुस्तक मुलाच्या वाढदिवशी भेट म्हणून पाठविले.

मध्यंतरी श्री विजयराव देशमुख यांचे दुर्मिळ शिवचरित्र पुनः प्रकाशित झाले. तेही अगदी त्यांच्या मुलाकडून संपर्क करून मिळविले.

त्यानंतर “श्री केळुस्कर” यांचे आद्य शिवचरित्र, तसेच ४ खंडात असलेले साहित्याचार्य श्री बाळशास्त्री हरदास यांचेही शिवचरित्र संग्रहात दाखल झाले.

नुकतेच श्री गजानन मेहंदळे सर यांनी प्रचंड मेहनत घेऊन लिहिलेले दोन खंडातील “श्री राजा शिवछत्रपती” हे ही संग्राहत दाखल झालेय.

याशिवाय सेतू माधवराव पगडी, तु. वि.जाधव यांनी शिवरायांच्या वर आधारित लिहिलेली अनेक पुस्तके संग्रहात आहेतच. त्यामुळे ती सर्व पुस्तके नावसाहित इथे देणे शक्य नाहीय.

पण ज्यांना अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित “शिवचरित्र” हवी असतील त्यांनी ही वर दिलेली आणि सध्या बऱ्यापैकी शोधली तर उपलब्ध असणारी शिवचरित्रे जरूर वाचावीत!!

शेवटी वाचन आणि त्यातून मिळालेले ज्ञान हे अजिबात वाया जात नाहीच. उलट आपली विचारमंथन करण्याची क्षमता आणि प्रगल्भता वाढत जाते.

हा छोटेखानी लेख फक्त अभ्यासासाठी लागणारी संपूर्ण शिवचरित्र यासाठी आहे. या पुस्तकात अभ्यासलेले शिवचरित्र आणि कादंबरी मधून समजलेले शिवाजी महाराज यात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

ही पुस्तके मिळवताना खूप वेळेस कष्ट पडतात. पण एकदा का संग्रहात आले की सगळ्या कष्टांचा विसर पडतो.

माझी एक सवय आहे, की पुस्तके कुणाकडे न मागता ती स्वतः विकत घेऊन संग्रहात वाढवत जायची. कारण पुस्तकांचा संग्रह करणे आणि ते सांभाळणे ही एक मोठी कला आहे. ती ज्याला जमली तो आयुष्यात खूप मोठा गर्भश्रीमंत माणूस असतो.

त्यातून ही पुस्तके कुणीही वाचनासाठी मागितली तर मी अगदीच नम्रपणे नकार देतो. कारण एकदा का हे पुस्तक कुणाकडे गेले की ते पुन्हा मिळविणे खूपच अवघड असते..स्वानुभव आहे हा.

असो, बहुत काय लिहिणे.

आपणही “वाचन” करीत राहा आणि शिवचरित्र चा प्रसार करीत राहावे हाच या पोस्ट मागील एकमेव उद्देश आहे.

किरण शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here