महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,422

सानगडी | Sangadi Fort | सहानगड किल्ला

By Discover Maharashtra Views: 4483 3 Min Read

सानगडी | Sangadi Fort | सहानगड किल्ला

भंडारा शहराच्या पुर्वेला असलेल्या साकोली तालुक्यात सानगडी(Sangadi Fort) नावाचा लहानसा किल्ला आहे. आज साकोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी नागपुरकर भोसले यांच्या काळात अगदी १८६७ पर्यंत सानगडी हे तालुक्यातील महत्वाचे ठिकाण होते व त्याचसाठी येथे गढीवजा किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. सानगडी उर्फ सहानगड किल्ला(Sangadi Fort) भंडारा शहरापासून ५३ कि.मी.वर तर साकोली या तालुक्याच्या ठिकाणापासुन १४ कि.मी. अंतरावर आहे. गावाबाहेर असलेल्या तलावाच्या काठावरील लहान उंचवट्यावर हा किल्ला बांधला गेला आहे. खाजगी वाहनाने आपण थेट किल्ल्याजवळ पोहोचतो.

किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असला तरी देखरेख नसल्याने किल्ल्याची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन या पडलेल्या तटबंदीमधुन आपला गडावर प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दीड एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत ६ व मध्यभागी एक भलामोठा बुरुज आहे. या बुरुजाखाली १० फुट लांबीची व्याघ्रमुखी तोफ असुन बुरुजावर असणारी हि तोफ नंतरच्या काळात खाली ठेवण्यात आली असावी. या तोफेची देवी म्हणुन पुजा केली जात असुन तोफेश्वरीदेवी नावाने या बुरुजात देवीच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. हि तोफ म्हणजे या किल्ल्याचे वैशिष्ट म्हणावे लागेल कारण भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या ५ किल्ल्यांपैकी केवळ या एकाच किल्ल्यावर तोफ आढळते. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन तोफ फिरवण्याच्या जागेवर नव्याने भारताची राजमुद्रा उभारलेली आहे.

किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या या बुरुजावरून संपुर्ण किल्ला व दूरवरचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्याच्या तटबंदीचा खालील भाग दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात कोसळली असुन शिल्लक असलेल्या तटबंदीवरील चर्या आजही तग धरून आहेत. किल्ल्याच्या आवारात फेरी मारताना एका बुरुजावर शिवलिंग व नंदी दिसुन येतात तर दुसऱ्या बुरुजावर एक थडगे दिसुन येते. किल्ल्याच्या आत असलेल्या विहीरीत आज मोठया प्रमाणात झाडी माजली आहे. किल्ल्याचा दरवाजा आजही चांगल्या अवस्थेत असुन दरवाजाच्या आतील बाजुस दरवाजावरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असुन यातील एका देवडीच्या आतील बाजुस कोठार आहे. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम अथवा शिल्प दिसुन येत नाही.

दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक सुस्थितीतील सुंदर वास्तु दिसते. या वास्तुचे केवळ छप्पर उडालेले असुन दरवाजा व भिंती आजही शिल्लक आहेत. या ठिकाणी आपले किल्लादर्शन पुर्ण होते. किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment