महाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभव

सांदण दरी

सांदण दरी

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी…..सह्याद्रीच्या या रुपापुढे फक्त नतमस्तक व्हायच….आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या ,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. मुंबईपासुन जवळ-जवळ १५० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा महामार्ग पकडायचा. कल्याण-शहापुर- कसारा -घोटी – भंडारदरा(शेंडी) -पांजरे-उधवने- घाटगर डॅम मार्गे मजल दरमजल करत आपण साम्रद गावात पोहोचतो. साम्रद गावाच्या बाजुला मोठ खडकाळ माळरान पसरलेल आहे. दरीत जाण्यासाठी गावापासुन वीस मिनिटे चालत जावे लागते. दरी अशी वरून दिसुन येत नाही कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली आहे. त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसते. या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य आहे. दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आपण दरीच्या मुखाशी येऊन उभे ठाकतो. दरीच्या सुरुवातीला एक दिशादर्शक दगड आहे. इथपर्यंत न चुकता आलात तर पुढं चुकायची संधीच नाही. फक्त एकच रस्ता एकच दिशा. रस्ता जमिनिच्या पोटात खोल खोल उतरत जाणारा.

घळ उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आपला आत दरीच्या नाळेत प्रवेश होतो. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ही अतिशय अरुंद नाळ असुन दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त झाली आहे. एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात. त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं थंड झालेल्या दगडांचा आहे. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत. त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करतांना काही ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. पाण्याची खोली ट्रेक कुठल्या महीन्यात करतो त्यावर अवलंबून आहे. सांदण व्हॅलीच्या या भागात नदीच्या पात्राची सरासरी रुंदी १० फूट तर पात्राच्या दोन्ही बाजूच्या कातळकड्यांची सरासरी उंची १५० फूट आहे. काही ठिकाणी हे कातळकडे वरच्य बाजूस एकमेकाला चिकटलेले आहेत. या भागातून साधारणत: ३० मिनिटे प्रवास केल्यावर आपण दरीच्या टोकावर येतो. येथून पुढे दूर पर्यंत अजस्त्र खडकांची रास पडलेली दिसते. आता वाट एका पातळित आहे असं वाटत असताना पुन्हा काही मोठे मोठे दगड ओलांडुन पुढच्या उतारावरुन खाली जातो. इथे एक प्रचंड शिलाखंड दोन छोट्याश्या दगडांच्या आधारानं उभा आहे. जिथे नजर जाईल तेथे कातळच कातळ आहे. येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत. सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो. या खडकांवरून उतरत आपण साधारणत: १ ते १.५ तासात पहिल्या कातळटप्प्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी ४५ फूटाचा उभा कातळकडा आहे.

रॅपलिंग तंत्राचा वापर करून हा कातळटप्पा पार करावा लागतो. कातळटप्पा ओलांडल्यावर पुन्हा अजस्त्र खडकांची रास आपली वाट पहात असते त्यातून मार्ग काढून उतरतांना २ ठिकाणी ८ ते १० फूटांचे अजस्त्र खडक उतरावे लागतात. पुढे गेल्यावर एके ठिकाणी अजस्त्र खडकांच्या आडव्या भिंतीने आपली वाट अडवलेली दिसते. या ठिकाणी या दगडांच्या भिंतीवर चढून न जाता दगड एकमेकांवर पडून तयार झालेल्या पोकळीतून उतरत ही भिंत पार करावी लागते. या दगडांमधील पोकळीत एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, सॅक मात्र दोरीने खाली सोडाव्या लागतात. याच्या पुढे पुन्हा एक १५ फूटाचा कातळटप्पा आहे. तो नुसती दोरी लावून उतरता येतो. हा कातळटप्पा पार केल्यावर १० मिनीटात आपण सपाट पृष्ठभागावर येतो. ४-५ तास सतत दगडांच्या राशीतून चालल्यावर सपाट पृष्ठभागावर चालण्याचा आनंद काही वेगळाच. पुढे एक वळण घेतल्यावर नदी एका खोल डोहात कोसळते. या ठिकाणी असलेल्या सपाट कातळावर रात्रीचा मुक्काम करतात. येथून मागच्या बाजूला बाण सूळका दिसतो. डोहात जाण्यासाठी डोंगर उतरून खाली जावे लागते. ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे. या नळीच्या वाटेने आपण खाली कोकणात उतरु शकतो. ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते. तेथुन आसनगावला जाता येते. नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येते. जातिवंत ट्रेकर्स सांदण दरी – करोली घाट असा ट्रेक करतात. खरच अद्भुत अशी निसर्गनवल सांदणदरी अनुभव म्हणजे एखादे शिखर पादाक्रांत केल्यासारखेच आहे. सुचना— पावसाळा व त्यानंतरचे २ महीने सोडून हा ट्रेक केला जातो. मार्च अखेरपर्यंत काही भागात पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तो भाग पार करण्यासाठी रोपचा वापर करावा लागतो. मे महीन्यात पिण्याचे पाणी सांदण व्हॅलीच्या सुरूवातीला व शेवटी डोहाजवळच मिळते ,त्यामुळे पाण्याचा साठा सोबत बाळगावा.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
www.durgbharari.com
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close