महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,380,898

सदाशिवगड | Sadashivgad Fort

By Discover Maharashtra Views: 3910 3 Min Read

सदाशिवगड | Sadashivgad Fort

महाराष्ट्रातील बहुतांशी गडाची नावे हि त्या गडावरील देवता वा गडाच्या घेऱ्यात असलेले गाव यावरून पडलेली आहेत. सांगली-सातारा सीमेवरील सातारा जिल्ह्यातील कराड शहराच्या पूर्वेस ७ कि.मी. अंतरावर असलेला सदाशिवगड (Sadashivgad Fort) त्यापैकी एक. गडावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामुळे या गडाला सदाशिवगड नाव पडले आहे.

कराड शहरातुन ओगलेवाडी या गडाच्या पायथ्याच्या गावात जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. ओगलेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जाण्यासाठी साधारण १००० पायऱ्या चढुन जावे लागते. या पायऱ्यांनी किल्ल्यावर पोहोचण्यास साधारण एक तास लागतो. टेहळणीसाठी बांधलेल्या या गडाच्या घेऱ्यात हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची व राजमाची या चार माच्या आहेत. पायऱ्या चढुन वर आल्यावर शेवटच्या टप्प्यात वरील बाजूस एका बुरुजाचा व तटबंदीचा तळातील दगडांचा थर पहायला मिळतो. गडपणाचे तटाबुरुजाचे इतकेच अवशेष आपल्याला सद्यस्थितीत पहायला मिळतात. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन २६६५ फूट असुन पुर्वपश्चिम पसरलेल्या या गडाचा परीसर २५ एकरपेक्षा जास्त आहे. पायऱ्या संपल्यावर सरळ जाणारी वाट मंदिराकडे जाते तर डावीकडील वाट एका चौकोनी मोठया विहीरीकडे जाते. या विहिरीत पाणी असले तरी पिण्यासाठी ते योग्य नाही. विहीर पाहुन मुळ वाटेने मंदिराकडे जाताना वाटेत एक दगडी ढोणी व उध्वस्त वास्तुचा चौथरा दिसतो.

गडावरील महादेवाचे मंदिर दगडी बांधकामातील असुन त्यावरील कळस मात्र नव्याने बांधला आहे. या मंदिरात १५ ते २० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराच्या आवारातच एक बारमाही पाणी असणारी विहीर असुन गडावर या विहीरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. विहिरीजवळच नव्याने बांधलेले लहान हनुमान मंदिर आहे. मंदीरासमोरील गडाच्या पठारावर एक भलामोठा खोदीव तलाव असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या पुर्व बाजुला ढिगाऱ्यात रुपांतर झालेली तटबंदी असुन येथुन उत्तर बाजुच्या सोंडेवर खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी दिसुन येतात. या टाक्यांच्या पुढील बाजुस खडकात खोदलेल्या पायऱ्या असुन या ठिकाणी गडाचा दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. या ठिकाणी खडकात खोदलेले अजुन एक पाण्याचे टाके पहायला मिळते. गडावर येणारी बहुतांशी मंडळी मंदिराकडूनच मागे फिरत असल्याने या वास्तुपर्यंत फारसे कोणी पोहचत नाही. पण गड फिरायला आल्यास या वास्तु आवर्जुन पहायला हव्यात. येथुन परत मंदिराकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

गडावर फारशा वास्तु नसल्या तरी घेरा बऱ्यापैकी असल्याने संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो. गडावरील वास्तु व पाणीपुरवठा पहाता गडाचा उपयोग पहारा व टेहळणीसाठी केला जात असावा. गडावरून कोयना नदी,कराड, मलकापूर,आगाशिव डोंगर, वसंतगड पासुन मच्छींद्र गडापर्यतचा परिसर दृष्टीस पडतो. १० नोव्हेंबर १६५९ला अफझलखानाचा वध केल्यावर मराठयांनी केलेल्या घोडदौडीत १३ नोव्हेंबर १६५९ ते फेब्रुवारी १६६० च्या दरम्यान आदिलशाहीच्या ताब्यातील हा परीसर मराठयांच्या ताब्यात आला पण महाराज पन्हाळ्यात अडकल्यावर सिद्दी जोहरने हा भाग परत ताब्यात घेतला. पुढे १६७०-७१ च्या दरम्यान हा भाग परत मराठयांच्या ताब्यात आला. इ.स.१६७६च्या सुमारास शिवरायानी या डोंगररांगेत जे दुर्ग बांधले त्यात सदाशिवगडची उभारणी केली असावी. नंतरच्या काळात या गडाबाबत फारशा नोंदी दिसुन येत नाही.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment