महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

भोर तालुक्यातील राजघर

By Discover Maharashtra Views: 1303 3 Min Read

भोर तालुक्यातील राजघर –

भोर तालुका हा निसर्गसंपन्न, कर्तृत्वसंपन्न, इतिहासाला दिशा देणारा, प्राचीन काळापासून पराक्रम, शौर्य, बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतींचे अवशेष गावोगावी उपलब्ध असलेला तालुका. शिवकाळात अतुलनीय योगदान देणारे मावळे याच भूमीत जन्माला आले. सामान्य कष्टकरी लंगोटी नेसून राष्ट्र कार्यात अग्रेसर राहून आपल्या निष्ठा, पराक्रम, त्यागाने इतिहासात असामान्य म्हणून गौरवीलेले गेले हा वारसा या भूमीचा आहे.(राजघर)

या तालुक्यातील अनेक पराक्रमी घराण्याची नोंद इतिहासाने घेतली आहे किंबहुना त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले आहेत, असे असले तरी किती तरी तत्कालीन पराक्रमी वीरांची व घराण्याची इतिहास पुरुषाने नोंद घेतली नाही. म्हणून त्यांचे योगदान किंवा कर्तृत्व तसूभरही कमी होत नाही. अशा अनेक अज्ञात वीरांचा पराक्रम मूकपणे व्यक्त करणाऱ्या वीरगळ, समाधी, सतीशिळा, शिलालेख व इतर अवशेष भोर तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर आढळून येत आहेत, फक्त गरज आहे ती त्यांचे संवर्धन करून इतिहास जाणून घेण्याची. वेळवंड खो-यातील वेळवंडी नदीवर ब्रिटिश राजवटीत भाटघर धरण बांधले गेले.

वेळवंडी नदीच्या किनाऱ्यावरील गावे आपले मूळ गावठाण सोडून डोंगराच्या बाजूला विस्थापित झाली.आपली घरदार, गाई गुरे ही बरोबर घेऊन नवीन जागेवर जूनीच नावे घेऊन राहू लागली. मात्र आपली मंदिरे, वीरगळी व ऐतिहासिक साधने ही तेथेच राहिली व भाटघर जलाशयाच्या पाण्यात गेली. उन्हाळ्यात धरणाचा पाणीसाठा अत्यल्प झाल्यावर कांबरे गावचे श्री.कांबरेश्वर मंदिर, वेळवंडचे नागेश्वर मंदिर व इतर अवशेष आपल्याला दिसून येतात. नागेश्वर मंदिराच्या भिंती मध्ये व परिसरात अज्ञात वीरांच्या अनेक वीरगळी असल्याचे प्रामुख्याने दिसून येते.

भोर पासून सुमारे पंधरा कि.मी. अंतरावर ” राजघर ” नावाचे एक गाव वेळवंडी नदी काठावर आहे. या गावाचे नावाला नक्कीच काहीतरी इतिहास असणार पण तो आपणांस माहित नाही. अशा या गावच्या जुन्या जागेतील काही अवशेष पाहावयास मिळाले. मी राजघर गावापासून नदीच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर हे अवशेष असल्याचे दिसून आले. ही जागा बहूदा पूर्वीच्या गावठाण मंदिर परिसराची असावी कारण देवांच्या मूर्ती शिवाय इतर अवशेष होते. प्रकाशचित्रात असलेला मोठा घडीव शिल्प ही सतीशिळा आहे.

शिवकाळात येथील मातब्बर व्यक्तीच्या वीर मृत्यूनंतर ती सती गेली असेल तिचा ही शिळा आहे. शिवकाळात जर एखादा कर्तृत्ववान वीर युद्धात कामी आला तर त्याची समाधी बांधण्याची परंपरा होती. बाजूला असलेले तीन समाधीच्या चारही मनो-यावरील घुमट आहेत.या अज्ञात वीराची समाधी ही १०×१२ फूट बांधकामात असावी. या चार पैकी तीन घुमट उपलब्ध असून एक घुमट आजूबाजूच्या ठिकाणी असला पाहिजे. तेथील एका शेतक-याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की तेथे काळेश्वरी मंदिर होते. तेथील घडीव पाषाणातील अवशेषांचे प्रकाशचित्र सोबत संलग्न केले आहे. आता या अवशेषांचे साधार विश्लेषण करून अपरिचित इतिहास जाणून घेण्याची कामना आहे.

© सुरेश नारायण शिंदे,भोर

Leave a comment