पर्वतीवरचे लेणं

By Discover Maharashtra 2 Min Read

पर्वतीवरचे लेणं –

भारताच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवणाऱ्या ह्या पुण्यनगरीत नजर टाकली की एक गोष्ट प्रकर्षानी जाणवते ती म्हणजे,ज्या पुरातन वस्तूंनी,वास्तूंनी पुण्याला इतिहासात स्थान दिलं,त्या हळूहळू काळाच्या पडद्याआड होत पुसट होत चालल्या आहेत. काळानुसार बदलताना,नव्याचा शोध घेताना आपण मात्र नकळत ह्या ऐतिहासिक वास्तूंचा हात सोडून दिलाय. इतिहासाची पाने चाळून बघताना लक्षात येतं की, की आपल्या पुण्यातल्या ह्या काही वास्तूंना किती महत्त्व आहे,त्यांचं स्थान त्या पानांमध्ये अजूनही किती भक्कम आहे.  अश्याच काही लपलेल्या पुरातन वास्तू पर्वतीवर पण आहेत. त्यापैकी एक आहे पर्वतीवरचे सुंदर कातळ लेणं.

पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रकुट कालखंडात काही लेण्या खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात. खुद पुण्यामध्ये असलेल्या या अपरिचित लेण्या मात्र आज उपेक्षेच्या गर्तेत सापडल्या आहेत.  पर्वतीच्या लेण्यांना जर भेट द्यायची असेल तर शाहू कॉलेजच्या मागच्या बाजूने एक रस्ता आहे, जो लेण्यापर्यंत जातो आणि दुसरा पर्वतीवरून डाव्या हाताला असलेली पाण्याच्या टाकीची वाट धरायची. या पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर त्या टाकीच्या खालच्या बाजूला आपल्याला काही खोदकाम केलेले पहावयास मिळते हे खोदकाम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पर्वतीवरची राष्ट्रकुट काळात खोदलेली लेणी आहे.

आतमध्ये डोकावले असता आतमध्ये कोणतेही कोरीव काम आपल्याला दिसत नाही. अत्यंत साध्या पद्धतीमध्ये असलेला हा तीन दुष्यम लेण्यांचा समूह आहे. या लेण्याच्या समोरून पाहिले असता आपल्याला या लेण्यांच्या मध्ये असलेल्या दोन खांबांमुळे या लेणीचे तीन भाग झालेले आपल्याला बघायला मिळतात. या लेण्यांचा आणि पुण्यातील इतर लेण्यांचा संबंध हा आपल्याला या लेण्यांच्या घाटणीवरून समजतो. शाहू कॉलेज मधल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या लेण्यामधील गाळ काढायचा प्रयत्न १९७६ साली झाला होता परंतु या प्रयत्नाने आतमध्ये कोणतेही प्राचीन अवशेष मात्र मिळाले नाहीत. सध्या त्यात पावसाचे पाणी आणि लोकांनी टाकलेला कचरा साठून खूप दुर्गंधी पसरलेली आहे.

संदर्भ :
पुणे शहराचा ज्ञानकोश – डॉ. शां. ग . महाजन
महाराष्ट्राची शोधयात्रा – अनुराग वैद्य

पत्ता :
https://goo.gl/maps/YoZuUgppSoMFvrrr5

© आठवणी इतिहासाच्या

Leave a comment