महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पन्हाळगडाचा वेढा व बाजीप्रभूंचे बलिदान

By Discover Maharashtra Views: 11165 15 Min Read

पन्हाळगडाचा वेढा व बाजीप्रभूंचे बलिदान –

अफझलखान वधानंतर आदिलशाही साम्राज्यास धक्का बसला व विजापुरात हलकल्लोळ माजला. स्वराज्यातील मावळ्यांचे मनोबल वाढले होते . विजापुरातील अनागोंदीचा व स्वराज्यास अनुकुल परीस्थीतीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजानी आदिलशाही साम्राज्यातील मुलुख स्वराज्यात आणून स्वराज्याच्या सीमा विस्तारित करण्यास सुरवात केली.

विजापूर प्रांतातील भूभाग स्वराज्यात दाखल करत २८ नोव्हेबर १६५९ रोजी कोल्हापूर येथील पन्हाळा जिंकून घेतला अफझलखान वधानंतर अवघ्या १८ दिवसात विजापुरी आदिलशाही साम्राज्यास दिलेला हा दुसरा धक्का होता. वाई ते पन्हाळा असा मोठा भूभाग स्वराज्यात सामील झाला . शिवाजी महाराजांची हि विजयी घोड्दौड रोखण्यासाठी विजापूर सरदार रुस्तम-इ-जमान व अफझलखानचा मुलगा फाझलखान मोठ्या सैन्यासह मराठा सैन्यावर चाल करून आले. बुधवार दिनांक १८ डिसेंबर १६५९ शिवरायांनी ५००० मावळ्यांसह या विजापुरी सैन्यास कोल्हापूर येथे लढत दिली. या युद्धात विजापूर सरदार रुस्तम-इ-जमान व अफझलखानचा मुलगा फाझलखान यांचा दारूण पराभव होऊन युद्धभूमी सोडून पळून गेले. अफझालखानाची तीन गलबते दाभोळ येथे असल्याची माहिती समजताच महाराजांनी सरदार दोरोजी यास दाभोळचे नेतृत्व दिले. सरदार दोरोजी याने दाभोळला आक्रमण केले परंतु राजापूर गव्हर्नर हेन्री रीव्हिंगटनने ती गलबते राजापूर बंदरात नेली त्यामुळे सरदार दोरोजीनी यांनी इंग्रज सैन्यातिल काही लोकांस कैद केले . राजापूर गव्हर्नर हेन्री रीव्हिंगटन याच्या विनंतीनुसार महाराजांनी त्याचाशी मैत्रिचा व शांततेचा करार केला. मराठ्यांनी सातारा, चंद वंदन , विशाळगड , पालगड , रांगणा , पारगड , वसंतगड असे अनेक किल्ले व विजापुरी भूभाग स्वराज्यात आणले.

अफझलखान व रुस्तम-इ-जमान यांच्या पराभवामुळे वीजपुर आदिलशहाने सिद्धी जोहर यास शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी २०,००० घोडदळ व ४०,००० पायदळ व तोफखाना देवून रवाना केले. आदिलशहाने सिद्धी जोहरला ‘ सलाबतखान ‘ असा किताब देखील दिला. शिवाजी महाराज मिरजेच्या किल्यास वेढा घालून होते . सिद्धी जोहर स्वराज्यावर चालून येत आहे अशी माहिती मिळताच शिवाजी महाराज तत्काळ २ मार्च १६६० रोजी पन्हाळगडावर आले. शिवाजी महाराज पन्हाळगडावर असल्याची खबर सिद्धीस मिळताच त्याने पन्हाळगडास वेढा दिला . पन्हाळगडावर तोफांचा मारा चालू झाला परंतु गडाची उंची जास्त असल्याने तोफाचा हल्ला निकामी ठरला . राजापूर वखारीतील हेन्री रीव्हिंगटनने सिद्धी जोहर याच्या विनंतीनुसार लांब पल्य्याच्या तोफा व दारुगोळा सिद्धीस पुरवला. तसेच इंग्रज सैन्य देखील त्यांच्या मदतीस पाठवले. इंग्रजांनी शिवाजी महाराजांबरोबरचा मैत्री व शांतता करार मोडून सिद्धी जोहरास मदत केली . १० मे १६६० ला पन्हाळगडावर पुन्हा तोफांचा मारा चालू झाला. सिद्धीने वेढा फारच कडक केला मुंगीसुद्धा आत येऊ शकणार नाही असा सक्त वेढा पन्हाळ्यास पडला . पावसाळा जवळ येत असल्याने सिद्धीस हा वेढा फार काळ चालवता येणार नाही हा शिवाजी महाराजांचा अंदाज पूर्णपणे चुकला . पावसाळ्यात बचावासाठी व वेढा नेटाने चालवण्यासाठी सिद्धीने छावणीवर गवताचे छप्पर टाकण्यास सुरवात केली.

शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने मोगल दरबारी मदतीची याचना केली. त्यानुसार औरंगजेबाने शाहीस्तेखान यास ७७००० घोडदळ व ३०००० पायदळ व तोफखाना देऊन स्वराज्यावर पाठवले. स्वराज्यात लुट व जाळपोळ करत शाहीस्तेखान ९ मे १६६० रोजी पुण्यात लाल महालात दाखल झाला. शाहीस्तेखानाने स्वराज्यातील चाकण किल्ला जिकून घेतला आता स्वराज्य आणि शिवाजी महाराज मोगली आणि वीजपुर या दोन्ही सैन्याच्या कचाट्यात सापडले.

सरनौबत नेताजी पालकरांनी थेट विजापूरवर हल्ला केला परंतु विजापूर सरदार खवासखानाच्या फौजेपुढे पराभव पत्करून माघार घ्यावी लागली. स्वराज्यावर मोगली संकट आल्याने व शिवाजी महाराज विजापुरी वेढ्यात अडकल्याने शिवाजी महाराजांना पन्हाळगड वेढ्यातून सोडवण्यासाठी स्वतः राजमाता जिजाबाई यांनी सिद्धी जोहरवर हल्ला करण्याचे व वेढा फोडून शिवबांना वेढ्यातून सोडवण्याचे ठरवले. परंतु सरनौबत नेताजी पालकर यांनी हि जबाबदारी स्वतः घेऊन सिद्धी हिलाल व त्याचा मुलगा सिद्धी वाहवाह याच्यासह पन्हाळगडावर हल्ला केला परंतु सिद्धी वाहवाह मारला गेल्याने सिद्धी हिलालने रणागणातून माघार घेतली व नेताजी पालकरांना हा वेढा फोडण्यात अपयश आले.

मराठ्यांना वेढा तुसभरही फोडण्यात यश आले नाही तसेच भर पावसाळ्यातदेखील वेढ्यात कोणतीही कुचराई सिद्धीने जोहरने केली नाही. शिवाजी महाराजांनी एक धाडसी निर्णय घेऊन वकील गंगाधर पंत यांस १२ जुलै १६६० रोजी सिद्धी जोहरकडे पत्र देवून पाठवले. “ मी केलेले सर्व मोठे गुन्हे माफ करून व संकटापासून माझे रक्षण केल्यास मी उद्याच आपल्या छावणीत येऊन सर्व मालमत्ता व गड किल्ले बादशहाकडे स्वाधीन करेन “ शिवाजींचे हे पत्र पाहून सिद्धी व त्याच्या विजापुरी फौजेस अत्यानंद झाला व इतके दिवस असलेल्या कडक वेढ्यात थोडी निष्काळजी होऊन फौजेत गाफिलपणा झाला. महाराजांनी पन्हाळगडाची जबादारी त्रंबकपंत भास्कर यांच्याकडे सोपवून किल्यावर असलेल्या ८००० मावळ्यातील निवडक ६०० बांदल मावळे घेऊन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाण्यास कूच केले. बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे सरनौबत होते. स्वराज्यातील गुप्त हेरांनी विशाळगडी जाण्याचा मार्ग व त्यातील खाचखळगे हे आधीच हेरून ठेवले होते . हा मार्ग अतिशय दुर्गम होता . त्या पुर्वहेरीत मार्गांवर शिवाजी महाराजांनी मार्गक्रमण करण्यास सुरवात केली . शिवाजी महाराज वेढ्यातून निसटल्याची बातमी सिद्धी जोहरास त्याच्या हेरांमार्फत मिळताच त्याने आपला जावई सिद्धी मसूद यास शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पाठवले.

सिद्धी मसूदचे सैन्य गजापूर खिंडीजवळ जवळ येत असल्याची माहिती शिवाजी महाराजांना मिळाली. विशाळगड अजून ४ कोस दूर होता. या कठीण प्रसंगी बाजीप्रभूंनी ३०० मावळे घेऊन खिंड लढवण्याचा निर्णय घेतला व शिवाजी महाराज्यांना ३०० मावळ्यांसह विशाळगडावर कूच करण्यास सांगितले. विशाळगडावर सुखरुप पोहचल्याची निशाणीची खूण म्हणून तोफांचे आवाज करण्याचे सांगून शिवाजी महाराज विशाळगडावर जाण्यास निघाले. सिद्धी जोहरच्या आज्ञनेणे पालीचे जसवंतराव दळवी व शृंगारपुराचे सूर्याजीराव सुर्वे यांनी विशाळगडास वेढा दिला होता . त्यामुळे महाराजांना हा वेढा फोडून पुढे जाणे क्रमप्राप्त होते. विशाळगडावरून महाराजांना मराठा सैन्याची कुमक मिळाली व महाराज हा वेढा फोडून विशाळगडी दाखल झाले. बाजीप्रभू व मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून खिंड लढवली. गनिमास खिंड ओलांडू दिली नाही . बाजीप्रभूंच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात प्राणांतिक जखमा झाल्या . अनेक मावळे मारले गेले , शत्रू संखेने जास्त होता परंतु मराठे जिद्दीने खिंड लढवत होते. १२ जुलै रोजी रात्री पन्हाळ्यावरून निघाल्यापासून ते १३ जुलै रोजी संध्याकाळपर्यंत मराठा सैन्य प्रथम पळत होते व नंतर गनिमानसोबत उपाशीपोटी झुंजत होते. बाजीप्रभूंचा देह केव्हाचाच जर्जर झाला होता फक्त प्राण तोफेचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले होते. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास महाराज विशाळगडावर पोहचले . विशाळगडावर पोहचताच महाराजांनी तोफांची सरबत्ती केली . महाराज सुखरूप गडावर पोहचले तोफांचे आवाज ऐकुनच बाजीप्रभूंनी आपला देह पावनखिंडीत ठेवला. गजापुरची घोडखिंड बाजीप्रभू व मावळ्यांच्या रक्ताने पावन होऊन पावनखिंड झाली .

प्रतापगडाच्या युद्धात कान्होजी जेध्यांना दिलेला तरवारीच्या पानाचा अग्रमान बांदलाना दिला यासाठी कान्होजी जेधे यांनी आनंदाने आपली संमत्ती दिली. शिवाजी महाराज स्वतः चालत बाजीप्रभूंच्या घरी गेले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बाजीप्रभूंच्या सात भावांना पालखीचा मान दिला .

बाजीप्रभूंचे बलिदान पावनखिंड , विशाळगडाच्या पायथ्याशी कि विशाळगडावर

समकालीन शिवभारत व बांदल घराण्याची तकरीर लढाई विशाळगड पायथ्याशी झाल्याचे नमूद करते. समकालीन जेधे शकावली बाजीप्रभू पडल्याचे सांगते पण युद्धाचे स्थळ दर्शवत नाही. जेधे करीना , ९१ कलमी , शिवदिग्विजय व चिटणीस बखर बाजीप्रभू पावनखिंडित मारले गेले असे सांगते. बांदल घराण्याच्या तकरीरीनुसार बाजीप्रभू हे बांदलांचे सरनौबत होते व ते विशाळगाडाच्या पायथ्याशी मारले गेले . सभासद बखर पन्हाळगड लढाई सिंहगड युद्धात नंतर झाल्याचे दर्शविते त्यामुळे या बखरीत क्रम चुकल्याचे दिसून येते व हि बखर लढाईचे कोणतेही वर्णन करत नाही. उपरोक्त साधनांचा विचार करता हि लढाई विशाळगडाच्या पायथ्याशी झाल्याचे अधिक विश्वसनीय वाटते .

शिवभारतात बाजीप्रभू देशपांडे बांदल सैनिक यांचे नावे आढळून येत नाहीत . शिवभारत हे नायकाचे म्हणजे शिवछत्रपतींचे चरित्र आहे. कान्होजी जेधे , शिवपुत्र शंभूराजे यांचेदेखील नाव शिवभारतात आढळून येत नाही . परंतु या सर्वांची नावे आपणास इतर साधनात आढळून येतात .

९१ कलमी बखर साने प्रत बाजीप्रभू खिंडीत जखमी होऊन युद्धात पडले असे नमूद करून पुढे नमूद करते “ महाराज्यांनी बाजीप्रभू आदिकरून मावळे जखमी झाले होते त्यासी आणोन जखमा बऱ्या केल्या “ तारीखे शिवाजी या बखरीतही “ बाजीप्रभू गंभीर जखमी झाला पण मावळ्यांनी त्याला डोंगरावर नेले “ असे नमूद केले आहे . उपरोक्त साधनाच्या आधारे बाजीप्रभू युद्धात जखमी होऊन पडल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत विशालगडावर आणले असावे .

विशाळगडावर बाजीप्रभूंची समाधी असल्याने बाजीप्रभूंचे प्राणोत्क्रमण विशाळगडावर झाले असावे.

विजापूर दरबारातील समकालीन कवी नुस्त्रती त्याच्या अलीनामा या काव्यात किल्ले पन्हाळ्याचे वर्णन करताना गडाची विशालता व उत्तुंगता , गडाची दुर्गमाता , गडाभोवतालचे घनदाट अरण्य व दर्याखोर्यांची सखोलता , गडावरील पाण्याची मुबलकता , गडाची अभेद्यता व अजिंक्यता गडावरील साहित्याची विपुलता यांचे बहारदार वर्णन पुढीलप्रमाणे करतो.

था यक गड वो जग में सब अवगड पनाले का बुलन्द थमने घरत लंगर अहै हौर अंबर कुं थांब आधार का /

( सर्व जगातील गडापेक्षा अधिक अवघड असा पन्हाळ्याचा उत्तुंग गड होता. पृथ्वीला थांबवून धरण्याचा तो लंगर असून अंबर आकाशाचा तो आधारभूत थांब स्तंभ होय.)

दुरी के तिस फेरे मने होय मंगल जुहल का कुहना लंग सटता है तेजी नाल वां चंदर सुबक रफ्तार का /

( त्याच्या अंतराधिक्याच्या फेऱ्यामध्ये प्रौढ असा शनी ग्रहरूपी हत्ती लंगडा होतो. अचपल व वेगवान चंद्ररूपी घोड्याच्या पायातून त्याच्या नाला गळून पडतात.)

वैतुश्शरफ सुं सूर कि धरता है नित हम-सायगी मिर्यख सुं उस का धनी दावा धरे हकदार का /

( त्याच्या या श्रेष्ठ स्थानामुळे तो नित्य सूर्याचे शेजारपण धारण करून राहिलेला आहे. त्याचा धनी मी एक वारसदार आहे असा दावा मंगल ग्रहाशी करत असतो. )

कमतर सरे की तिस जुहल मंगता है रोशन नायकी चंदर हिलाली जुइ सदा हर निस है तिस दरबार का /

( शनी ग्रह त्याच्या ( पन्हाळ्या ) जवळ कमी श्रेणीचा ( का होईना ) नायकपणा उघडपणे वांछीत असतो. कलावर्धीष्णु चंद्र त्याच्या आस्थानी प्रत्येक रात्री आशा बाळगून आहे.

जिस के हशम का शव नवीस अक्सर उतारीद का सगा जिस का अलंगी नित धरे जुहरा सुं नाता यार का /

( त्याच्या सैन्याची गणती ठेवणारा अधिकारी बहुधा बुध ग्रहाचा नातेवाईक असतो.त्याचा रक्षक शुक्र ग्रहाशी मित्राचे नाते बाळगून असतो )

पोंचे पवन फेरे मे जा कर गर जवानी में चडे अंपडे न दूजी उम्र लग तिस पर कयास यक बार का /

( पन्हाळगडाचा फेरा पूर्ण करण्यासाठी जर वायू आपल्या योवनात निघाला तर ,कशी तरी मोजदाद करीत दुसऱ्या जन्मी सुद्धा इष्टस्थळी जाऊन पोहचू शकत नाही )

नै बात कय लग मुक मने कै ठार पर फिसले जवान गर नांवुं कोइ लेने मंगे तिस राह-ना-हमवारका /

( त्या पन्हाळ्याचा मार्ग इतका ना हमवार ( उंचसखल ) आहे कि त्याच्यावर चढून जाण्यासाठी जर कोणी वाचा हलवली तर तोंडातून गोष्ट काढण्याच्या अगोदरच जिव्हा किती तरी ठिकाणी ठेचाळून पडते. )

दामन में तिस अैसा हर यक पाले गया है वर्ग रुक आता है वां भाने बचे सीमुर्ग दर्या पार का /

( पन्हाळ्याच्या उपत्यकावर हर प्रकारचे असे वृक्ष , पर्ण पोसले गेले आहेत कि साता समुद्राच्या पैलतीरावरील गरुड ( सिमुर्ग ) तेथे आपली पिले घालण्यासाठी येत असतो. )

है कफ जुग जुग हर कुइ असहावे –कहफ आ सोएं तो होय गोर कइ बहराम कुं डोंगापना है गार का /

पन्हाळ्याच्या दऱ्या इतक्या खोल आहेत कि कोणाही ( सप्त ) गुहातील झोपनाऱ्याला सुद्धा त्यामुळे जन्मोजन्मी खंत होत रहावी. त्याच्या दऱ्याची खोली अशी आहे कि तिथे अनेक बहरामाची ( प्रख्यात मल्ल ) थडगी बनलेली आहेत.

गड पर थेम पानी ते अत घर घर तो मावराउन्नहर है करता है रद कश्मीर कुं अंगन हर यक गुलजार का /

( गडावर घरोघर इतके विपुल पाणी असल्यामुळे असे वाटते कि हा जणू सोगदिया प्रदेशच आहे. ( गडावरील ) उद्यानाचे प्रत्येक प्रांगण काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याला सुद्धा अधोमुख व्हायला लावते. )

सुनते थे रूदे नील का है कर गंगन पिरतम , ओ कम यो गड तो जल सुं भुई पो नित बादल है दर्या पार का /

( आम्ही असे ऐकत होतो कि नील नदी आकाशाची प्रियतम आहे. परंतु टी कमी हा गड तर या पृथ्वी तलावर नित्य आपल्या पाण्यामुळे समुद्राकडील मेघच आहे. )

दुनिया में कुइ राज आज तक इस गड कुं लडे ले नै सक्या तिर्जग का दल ले दो जनम खोया इते यक वार का /

( जगातील कोणताही राजा , त्रिलोकातील एवढे सगळे सैन्य जमवून व दोन जन्म पर्यंत खटाटोप करूनही , या एक गडाला ( समोरासमोर ) लढून आजपर्यंत जिंकू शकला नाही .

जब हात सुं मक्कार के भेदों सुं ऐसा गड चढ्या हौर यक दगा का हो अमल म्याने उसे बदकार का /

( आणि तेंव्हा त्या दुष्टाच्या हातून एका धोक्याची जादू झाली तेंव्हा त्या ढोंगी माणसाच्या ( शिवाजीच्या ) हातून हा गड जिंकला गेला. )

चड देक गड जान्या अगर जीव काडने आवे मलक तो मुंज तरफ देखे न देवू लग धनी इस ठार का /

( वर चढून ( शिवाजीने ) गड पाहिला , तो जाणला ( आणि मनात असा उमजला कि ) जरी माझा जीव काढून नेण्यासाठी ( यमाचे ) देवदूत आले तरी, जोपर्यंत मी या गडाचा स्वामी आहे , तोपर्यंत त्यांना माझ्याकडे पाहू देखील देणार नाही )

सामां सुं हर यक जिन्स के गड पर जखैरा युं भऱ्या नै तुट पड्या सो गड अजब वो जा हो भारी भार का

( गडावर हर प्रकारच्या वस्तूचा समानाचा इतका संग्रह केलेला होता कि कधीही तुटवडा पडणार नाही ,अशा प्रकारचा हा अजब गड मोठ्या प्रतिष्टेचा आहे. )

संदर्भ :- दख्खनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख :- देवीसिंग व्यंकटसिंग चौहान.
समरधुरंधर :- विद्याचरण पुरंदरे.
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख.

श्री नागेश सावंत

Leave a comment