पंचहौद मिशन चर्च, पुणे | Panchhoud Mission Church

पंचहौद मिशन चर्च, पुणे | Panchhoud Mission Church

पंचहौद मिशन चर्च, पुणे –

उत्तर पेशवाईत, म्हणजे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात पुणे शहरात इंग्रजांची वर्दळ वाढू लागली. पेशवे सरकारमार्फत इंग्रज वकिलातीस संगमावर जागा देण्यात आली आणि प्रार्थनास्थळासाठी क्वार्टर गेटजवळ जागा देण्यात आली. या जागेत लोकवर्गणीतून एक लहानसे चर्च बांधण्यात आले. पंचहौद मिशन चर्च. पुढे इ.स.१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर पुण्यातील ख्रिश्चन समाज वाढू लागला.

पुणे शहरात युरोपियन मिशनऱ्यांचे कार्य सुरू झाले. या मिशनरी कार्याला चालना देण्यासाठी त्या वेळचे मुंबईचे बिशप रेव्हरंड हेन्री अलेक्झांडर डग्लस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मिशनची ठाणी स्थापन करण्याचे ठरविले. त्यानुसार,त्यांच्यानंतरचे मुंबईचे बिशप रेव्हरंड डॉ. मायल यांच्या पुढाकाराने इ.स.१८७३ मध्ये पुण्यात कायमचे ठाणे ८४०, गुरुवार पेठ येथे स्थापन करून तेथे एका लहानशा खोलीत उपासना सुरू झाली आणि पंचहौद मिशनची स्थापना झाली. तेव्हा याला पूना सिटी मिशनही म्हटले जायचे. त्यांनी तिथे असलेला एक मोठा बंगला विकत घेतला, ज्यात सध्या मिशनचे कार्यालय आहे. तो बंगला भारतीय आणि युरोपियन वास्तू शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.  पुढच्या बाजूला भरपूर मोकळी जागा आहे. त्यामागे सर्व दिशांना दारे खिडक्या असलेली ऐसपैस दुमाजी वस्तू आहे. त्याच्या पुढे या जागेत मोठे चर्च बांधण्याची कल्पना पुढे आली आणि मुंबईचे बिशप रेव्हरंड डॉ. लुई जॉर्ज मिलन यांच्या हस्ते सप्टेंबर १८८३मध्ये पायाभरणी झाली. हे बांधकाम इ.स. १८८५ मध्ये पूर्ण होऊन चर्चची मोठी व देखणी वास्तू उभी राहिली. चर्च ऑफ द होली नेम, पंचहौद मिशन, किंवा पवित्रनाम देवालय या नावाने ती प्रसिद्ध आहे.

या चर्च व मिशनचे सोसायटी ऑफ सेंट जॉन, द इव्हान्जेलिस्ट यांचेशी सुरुवातीपासून संबंध होते आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्या ऑर्डरमधील कोणी ना कोणी चर्चमध्ये असायचे. शहराच्या जवळ आणि छावणीपासून लांब बांधले गेलेले हे पहिले चर्च. लाल विटेचा वापर करून चर्च बांधण्यात आले व त्यावर निळ्या आणि पिवळ्या विटांचे पट्टे काढण्यात आले. याचे बांधकाम बेसिलिकासारखे करण्यात आले. चर्चच्या शेजारी १३० फूट उंचीचा मनोरा असून त्यात पाच मजले आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतून लाकडी जिना आहे. चौथ्या मजल्यावर घड्याळे बसविलेली असून पाचव्या मजल्यावर ८ घंटा आहेत. या घंटा लंडन येथील टेलर अँड सन्स यांनी बनवल्या असून त्यावर Holy Name of Jesus अशी अक्षरे कोरलेली आहेत. त्यामुळेच या चर्चला #पवित्र_नाम_देवालय असे म्हटले जाते. मनोऱ्याची बांधणी आकर्षक आहे.  या चर्चला व मनोऱ्याला हेरिटेज विभागाचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असून इ.स.१९७० पासून या चर्चला कॅथिड्रलचा दर्जा देण्यात आला आहे.

संदर्भ:
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
https://thesocietyofchn.org/index.html#history

पत्ता :
https://goo.gl/maps/tjLkod7JjD8mJ2VN8

आठवणी इतिहासाच्या FB Page

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here