महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

नेताजी पालकरांच्या स्मृतिस्थळाची दुरवस्था!

By Discover Maharashtra Views: 3702 8 Min Read

नेताजी पालकरांच्या स्मृतिस्थळाची दुरवस्था

छत्रपती शिवरायांच्या कालखंडात घोडदलाचे प्रमुख म्हणून तुकोजी मराठा, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पैकी प्रति शिवाजी म्हटले गेलेल्या नेताजींची कारकीर्द सर्वांत प्रदीर्घ असून शिवरायांनी नेमलेले स्वराज्याचे ते पहिले सरनोबत. शिवरायांच्या जीवनातील खडतर मोहिमा म्हणजे अफझलखान स्वारी, पन्हाळ्याचा वेढा, उंबरखिंडीतील कारतबलखान व रायबागनची केलेली फजिती, शाहिस्तेखानावरील छापा, सुरतेवरील पहिली स्वारी व पुरंदरचा तह या सर्वच मोहिमांत नेताजी पालकरांनी सेनापती म्हणून अद्वितीय अशीच कामगिरी केली आहे. उंबरखिंडीत गाठून फक्त दगडांचा वर्षाव करून त्याने मोगलांना शरण आणले होते तर शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून बसलेला असताना नेताजींनी परंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना गनिमी काव्याचा धडा दिला होता.

नेताजी पालकरांच्या मूळ गावाविषयी इतिहासकारांत एकवाक्यता नसली तरी काहींच्या मते कराडजवळील खंडोबाची पाली हे त्याचे मूळ गाव असून पालकर घराण्यातील विश्वासराव हे या परिसरातील पिढीजात देशमुख असून पुढे ते रत्नागिरी जिल्ह्यातील चौक या गावी राहण्यासाठी गेले. मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांच्याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही. परंतु याच वेळी *काष्टी ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर .घोड नदीच्या पूर्वेला काष्टी गाव नगर जिल्ह्यात व घोड नदीच्या पश्चिमेला तादंळी गाव पुणे जिल्ह्यात आहे (तांदळी), ता. शिरूर, जि. पुणे* तादंळी या ठिकाणी मात्र नेताजी पालकरांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आढळून येतात. तादंळी गावामध्ये ३२ गुंठ्यांवर नेताजींचा भव्य वाडा होता. पालकरांची काही घराणी गावामध्ये आहेत. त्यांचा नेताजीशी थेट संंबंध लागतोच, असे ठामपणे सांगता येत नाही.

शिवरायांच्या स्वराज्य उभारणीतील पहिल्या प्रत्येक संकटात नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजविला. म्हणूनच शत्रूंनी त्यांना प्रति-शिवाजी ही पदवी दिली. प्रत्येक मोहिमेत उत्तुंग यश मिळवीत असताना शिवरायांना मिर्झाराजा जयसिंहाने पुरंदरच्या युद्धात हार स्वीकारायला भाग पाडले. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकरांसह मोगलांच्या बाजूने आदिलशहाविरोधात लढत असताना दोघांमध्ये काही तरी गैरसमज निर्माण होऊन नेताजी पालकर निजामाला जाऊन मिळाले. या वेळी विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खमम परगण्यातील जमकोरची जहागिरी बहाल केली; परंतु मोगलांचे दक्षिणेतील सुभेदार मिर्झाराजांनी लगेचच नेताजीला आपल्याकडे वळवून ५ हजारांची मनसब आणि तामसा (ता. हदगाव, जि. नांदेड) या परगण्यातील ५५ गावांची जहागिरी दिली.

नेताजी पालकर मोगलांच्या सेवेत गेले त्याच वेळी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले. त्यामुळे नेताजी पालकर पुन्हा एकदा शिवरायांना जाऊन मिळाले तर…! औरंगजेबाला याची धास्ती होती. नेताजीचा मुक्काम या वेळी धारूर (जि. बीड) येथील किल्ल्यात असताना भूम, जि. उस्मानाबाद गावात तळ देऊन असणा-या मिर्झाराजा जयसिंहाच्या आदेशावरून नेताजी पालकरला अटक करून दिल्लीला नेण्यात आले. १५ फेब्रुवारी १६६७ साली औरंगजेबाने त्याला जबरदस्ती मुस्लिम बनवून त्याचे नाव महम्मद कुलीखान ठेवले.

नेताजीला तीन बायका असून पैकी दोन त्याच्यासोबत राहिल्याने त्यांनाही धर्म बदलावा लागला. एक जण महाराष्ट्रातच राहिल्याने तिने आपला धर्म राखला. नेताजी आपल्या प्रांतात परत जाऊ नये म्हणून औरंगजेबाने नेताजीला काबूल-कंदहार प्रांतात स्वारीवर नेमले. दहा वर्षे तो मोगलांच्या सेवेत होता. ‘असे होते मोगल’ या ग्रंथाचा कर्ता व मोगलांच्या तोफखान्याचा प्रमुख जातीने इटालियन असणारा निकोलाव मनुचीने नेताजीवर लेखन करताना म्हटले आहे की, मी स्वतः नेताजीसोबत मोगलांच्या चाकरीत असून नेताजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पकडला जाऊन त्याला जबर शिक्षा करण्यात आली. पुढे नेताजीने औरंगजेबाचा विश्वास संपादन केला. या दहा वर्षांच्या कालखंडात स्वराज्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. ६ जून १६७४ ला शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता बादशहाने आपला सेनापती दिलेरखानाला मोठी फौज देऊन शिवरायांवर पाठविले तेव्हा मराठी मुलुखाचा माहीतगार म्हणून बादशहाने त्याच्यासोबत महम्मद कुलीखान म्हणजेच नेताजीला पाठविले.

दहा वर्षांनंतर नेताजीचे पाय स्वराज्याला लागले आणि त्यांच्या मनात आठवणींचे काहुर माजले. या वेळी त्यांचा मुक्काम गोवळकोंडा परिसरात होता. जिवाची पर्वा न करता नेताजी थेट स्वराज्याकडे निघाले. ते थेट रायगड गाठून शिवरायांसमोर उभा राहिले. पुरंदर तहात हरल्यामुळे नेताजीला आदिलशाही चाकरीत पाठविणे हा राजांचा कदाचित डाव असू शकतो. परंतु राजे आग्र्यात अडकले तर नेताजी धर्मात अडकले. आता दोघांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. दोघांना आधार देणा-या जिजाऊसाहेब जगात राहिल्या नव्हत्या.

छत्रपती शिवरायांनी परत एकदा त्याला स्वधर्मात परत घेतले आणि महम्मद कुलीखान पुन्हा नेताजी पालकर म्हणून स्वराज्यात दाखल झाला. त्याला नरसोजी आणि कर्णसिंग ही दोन मुले होती. नरसोजीला नेताजी नावाचा मुलगा असून नेताजीचा विवाह शिवरायांना सकवार-बाईपासून झालेली कन्या कमळजाबाई यांच्याशी झाला होता. स्वराज्यात परत आल्यानंतर नेताजीला वाईजवळील पसरणी आणि इंदापूरची जहागिरी देण्यात आली होती. शिवरायांच्या कर्नाटक मोहिमेत नेताजी सोबत होते. पुढे संभाजी राजे छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीकडे आला तेव्हा अरबी, फारसी भाषा जाणणा-या आणि मोगली रीती-रिवाज माहीत असलेल्या नेताजीकडे अकबराची व्यवस्था होती. यानंतर नेताजींविषयी विशेष संदर्भ सापडत नाही. पुढे नेताजी पालकरांचे काय झाले याची सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही.

नेताजींची मुले नरसोजी व कर्णसिंग तर नरसोजीला नेताजी (आजोबाचे नाव)Ÿ व कर्णसिंगला नरहरसिंग ही मुले असून ती हैदराबादच्या निजामाकडे चाकरीला होती. याच ठिकाणी नेताजी पालकरांचा तामसा जहागिरीचा स्पष्ट पुरावा सापडतो. त्यानुसार इ. स. १७५० साली नेताजीच्या वारसदारांनी बादशहाकडे तक्रार करताना म्हटले आहे की, आमच्या आजोबाकडे तामसा परगण्यातील ५५ गावे परंपरेने असून त्याची व्यवस्था पुढे चालू ठेवावी. एवढेच नाही तर तामसा परगण्याचे जहागीरदार नरहरसिंग पालकर हे राक्षसभुवनच्या लढाईत निजामाकडून लढताना ठार झालेले आहेत.
( डॉ. सतीश कदम ९४२२६ ५००४४ )
पुढे पालकर घराण्यातील जानोजी आणि कर्ण सिंग यांच्या कारकीर्दीत पालकरांच्या साम्राज्यात घसरण होऊन त्यांच्या ताब्यात तामसा परगण्यातील तामसा, वडगाव, पाथरड, कंजार आणि उमरी राजाची ही फक्त ५ गावे राहिली. त्यामुळे पालकर घराण्यातील वाटणीचा वाद थेट हैदराबादच्या निजामाचा दिवाण चंदूलालपर्यंत पोहोचला. चंदूलालने वाटणीची व्यवस्थितपणे सोय लावून दिली. त्यानंतरच्या कालखंडात निजामशाहीत रझाकारांनी डोके वर काढले. त्यामुळे मुस्लिम जहागीरदार व देशमुख, कुलकर्णी, पाटील यांसारख्या वतनदारांनी पालकरांच्या जहागिरीचे खच्चीकरण करण्यास सुुरुवात केली. अंतर्गत कलहातून पालकर घराण्याने तामस्याचा त्याग करून जवळच पिंगळी येथे आश्रय घेतला.

नेताजी पालकरांनी निर्माण केलेले तामसाचे वर्चस्व कमी होताच स्वराज्याची कुठलीही चाड न ठेवता दुबळ्या लोकांनी पालकरांच्या जमिनी व वाड्यावर डल्ला मारून बुरुजाची मातीही शिल्लक न ठेवल्याने पालकरांचे तामस्यातील अस्तित्व संपुष्टात आले. काळ पुढे गेला की इतिहासाच्या पाऊलखुणा पुसायला लागतात. अर्थकारण बिघडले म्हणून थोरामोठ्यांची महती काही कमी होत नाही. पिंगळीमध्ये जाऊन पालकर पुन्हा उभे राहिले. या घराण्यातील राजे रेणुराव यांना नागपूरकर रघुजी भोसले ३ रे यांची भाची दिलेली होती. त्यामुळे या घराण्यातील लक्ष्मणराव व सदाशिवराव पालकर नागपूरला जाऊन स्थायिक झाले परंतु त्यांच्या मनात आपल्या जहागिरीची आस कायम होती. त्यामुळेच

लक्ष्मणरावांचे पुत्र बाळासाहेब परत पिंगळीला येऊन स्थायिक झाले. या बाळासाहेबांचे पुत्र लक्ष्मणराव पालकर राजकारणात सक्रिय होऊन महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.

आज पिंगळी आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी नेताजी पालकरांचे वंशज राहतात. त्याचप्रमाणे काष्टी (तांदळी,) ता. शिरूर, जि. पुणे येथेही पालकरांची काही घरे आहेत. नेताजी पालकरांची १० बाय २० फूट एवढी भव्य स्वरूपातील चिरेबंदी समाधी तामसा गावातील एका शेतक-याच्या शेतात आहे. अत्यंत दुरवस्थेत असलेल्या समाधीच्या भोवती गवत वाढलेले आहे. पालकर घराण्यातील माणूसच इकडे वर्षानुवर्षे फिरकत नसेल तर बाकीच्यां कडून काय अपेक्षा करणार? स्वराज्यासाठी खस्ता खाणा-या नेताजींची मरणोत्तर ही दुरवस्था शोचनीय आहे. म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते की, नेताजी पालकरांनी उगीचच स्वधर्मात येण्याची घाई तर केली नाही ना?

माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a comment