मेणवली घाट – वाई (सातारा)

मेणवली घाट – वाई (सातारा)

मेणवली घाट

मेणवली घाट – ‘स्वदेस’ चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगण चे टायटल सॉंग, तसेच गंगाजल मधील पारावरील दुश्ये ही सगळी मेणवली घाटावरीलच आहेत.

या ठिकाणी छोटय़ा पडद्यावरील काही मालिका ही येथेच शूट झालेल्या आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया, गंगा, महाभारत, काशी. तसेच इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि बोल बच्चन अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी, निरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. येथे दोन मंदिरे आहेत. एक विष्णू देवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं (शंकराचं). या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे.

या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर १७०७ असा उल्लेख आहे. घंटा पंचधातूची असून त्यावर मदर मेरी ची प्रतिमा आहे.

नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले. एका बाजुला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here