महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मार्केण्डेय अनुग्रह

By Discover Maharashtra Views: 3540 4 Min Read

मार्केण्डेय अनुग्रह

मंदिर म्हंटल की पुराणकथा आल्या. प्रत्येक मंदिराची वेगवेगळी कथा. काही त्या देवाशी निगडित, तर काही मुर्तीकाराने मंदिराचं सोंदर्य वाढवण्यासाठी चितारलेल्या. थोडीफार मंदिर बघितल्यावर एक कळालं की काही प्रसंग हे शिल्पकलेत प्रसिद्ध होते. ज्यांना अनेक ठिकाणी कोरलं गेलं. असं असलं तरी प्रत्येक ठिकाणी त्या शिल्पाचं, त्या कलेचे वेगळं स्वरूप. आता ह्याच फोटोतलं शिल्पाच घ्या. काही शिल्प ही विसरता येत नाहीत, त्यातलं हे एक.

तर ही गोष्ट अशी की मार्कंड नावाचा ऋषी होता. ज्याने पुत्र प्राप्ती होत नसल्याने शंकराचा धावा केला. कठोर तपश्चर्या करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले. शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी ह्या मार्कंड ऋषींना कोणताही वर मांग म्हणून सांगितले. आपल्या वंशाला दिवा मिळू दे ही एक इच्छा मार्कंड ऋषींनी देवाला सांगितली. शंकराने मान्य केलं पण त्यात दोन पर्याय ऋषींपुढे ठेवल्या. त्यातला एक मार्कंड ऋषींना निवडायचा होता. पहिला पर्याय असा की तुला १०० मुले होतील पण ते सर्व निर्बुद्ध होतील. दुसरा पर्याय म्हणजे एकच मुलगा असेल जो सर्वज्ञानी असेल, पण त्याच आयुष्य हे फक्त १६ वर्ष असेल. विचार करून मार्कंडे ऋषींनी दुसरा पर्याय निवडला. एकच अल्पायुषी पण विद्वान मुलगा.

वर दिला तो खरा झाला. मार्कंडे ऋषींना मुलगा झाला. त्यांनी त्याच नाव ठेवलं मार्कंडेय. हा मार्कंडेय जन्मत मोठा शिवभक्त. दिवस जात होते मार्कंडेयाचं वयही वाढत होत. अखेर त्याने त्याची १६ वर्ष पूर्ण केली. लिखित नियमानुसार त्याचा मुत्यु जवळ आला. त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी यम आपल्या वाहन रेड्यासह निघाला. मार्कंडेयचा प्राण हरणं हे यमाचा प्रयोजन. ईथे नेहमीप्रमाणे मार्कंडेय मात्र आपल्या आवडत्या देवाची पूजा करण्यात मग्न होता. यमाने काहीही विचार न करता त्याचा भोवती फास टाकला. अचानक झाल्या प्रकाराने मार्कंडेय घाबरून जोर जोरात शंकराचा धावा करू लागला. त्याचा आर्तव इतका होता की साक्षात निलकंठाचं त्या आवाजाने लक्ष वेधून घेतलं. साहजिकच शंकर आपण दिलेला वर विसरला होता. त्याने बघितलं की आपल्या लहानश्या भक्ताचे यम निर्दयपणे प्राण हरतोय. त्याने शंकराचा भडका उडाला. मार्कंडेय पूजा करत असलेल्या लहानश्या पिंडीतून शिव प्रकट झाला. त्याने त्याचा रौद्र अवतार धारण केला व यमाच्या अंगावर धावून गेला. झाल्या प्रकाराने यमही बिथरला. आपला प्राण वाचवण्यासाठी त्याने शंकरापुठे लोटांगण घेतलं. आणि त्याला त्याच्या आशीर्वादाची आठवण करून दिली. मी आपल्याच आदेशच पालन करतोय हे सांगितलं. मागचा सगळा प्रकार लक्षात येऊन शंकराने यमाला अभय दिलं. दिलेला वर मागे घेऊ शकत नसल्याने त्याने मार्कंडेयला अजून एक वर दिला की दीर्घायुषी होशील.

ही झाली ह्या शिल्पमागाची कथा. आणि कोरक्याने ती हुबेहूब कोरली ह्या दगडावर. जणू काही ती इथेच होती त्याने फक्त वरचा नको असणारा भाग काढून टाकला. आणि निर्माण केलं एक अदभूत अशी कलाकृती. शंकराचे हात जरी तुटले असले तरी त्याच अष्टभुजाधारी रौद्ररूप कुठेही कमी नाही. मार्केण्डेय च्या चेहऱ्यावर भीतीचे भाव आजही जिवंत वाटतात. त्या खाली कोरलेली शिवपिंड तर अप्रतिम. यमाचा चेहरा तुटला असला तरी त्याची शरण जात असलेलं शरीर, त्याच वाहन रेडा हे सगळंच अफलातून आहे. हे जसं निर्माण झालं त्याच अवस्थेत बघायला मिळाले असतं ह्याच्या सोंदर्य वर्णन करण्यापलीकडे असतं. आजही इतकी नासधूस होऊन सुद्धा हे शिल्प अप्रतिमच आहे. शंकराचे हात जरी तुटले असतील तरी आपण काही कल्पना करू की त्याने पुढच्या हातात शंकराने त्रिशूल धारण केलेले असेल. एका हातात डमरू निनादत असेल. बाकी इतर हातात इतर आयुधं असतील. कदाचित रेड्याच्या चेहऱ्यावर सुद्धा कोरक्याने भीतीचे भाव कोरले असतील. आणि आपण हे कोणत्याही modern technology ने तयार केलेल्या वास्तू बद्दल नाही तर नवव्या, दहाव्या शतकात निर्माण झालेल्या कलेबद्दल बोलतोय. इथल्या चराचरात सोंदर्य आहे फक्त ते आपण उलगडलं पाहिजे. हे सगळं जपलं पाहिजे, जाणलं पाहिजे. चुकून जरी हे सगळं मातीमोल झालं तर पुन्हा निर्माण करणं तर कठीणच पण एका अद्भूत वारश्याला आपण मुकणार इतकं नक्की.

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a comment