महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,64,405

सुपे येथील मल्लिकार्जुन मंदिर स्तंभ लेख

Views: 3
9 Min Read

सुपे येथील मल्लिकार्जुन मंदिर स्तंभ लेख !!!!

उपलब्धी व स्थळ :- हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मौजे सुपे येथील सुपे काऱ्हाटी रस्त्यालगत असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या एका स्तंभावर कोरलेला आहे.सध्या तो खांब याच रस्त्यावर असलेल्या श्री गिरमे यांच्या घरासमोर एक झाडाखाली आणून ठेवला आहे . सदर शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून १० ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील मजकुराची अक्षरे सुवाच्च रेखीव, व एकसारखी असून त्यांचा रेखीवपणा आजही कायम आहे.लेख उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून काही अक्षरे पुसट झाली असून काही ठिकाणी अक्षरे तुटली आहेत. थोडया प्रयत्नाने शिलालेख अगदी सहजपणे वाचता येतो.
==================================
शिलालेखाचे वाचन :
१.श्रीगणेशायानमः स्वस्ति
२.श्रीनृप शालिवाहन शके
३.द्वेपंचसाइंदु कीं॥ हे साधा
४.रण आद्धमास दुसरा शुक्ल
५.त्रितीया नी की ते काळी म
६.लिकार्जुनालय सुपा ग्रामि
७.सुमंतें किजे॥ हृत्कोसी रघुना
८.थ नंदन सिवाओ नंदना त्वा
९.किजें॥१॥ छ

संहिता
श्रीगणेशायन्मः
स्वस्तिश्रीनृपशालीवाहनशकेद्वेपंचसःईदुकीं ॥
हेसाधारणआद्धमासदुसराशुक्लत्रितियानिकी ॥
तेकाळीमलिकार्जुनालयसुपःग्रामिसुमंतेंकिजे ॥ हृत्कोसीरघुनाथनंदनसिवाआनंदनात्माभजे ॥१॥ छ

अर्थ.
श्री गणेशाला नमन करून शालिवाहन शके १६५२व्या वर्षी साधारण नाम सवंतसरात अदमासे म्हणजे अधिक महिना असलेल्या भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच १९ ऑगस्ट १७३० बुधवार या दिवशी मौजे सुपे गावात रघुनाथचे पुत्र आनंदराव सुमंत (डबीर )यांनी श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराची (देवालयाची) उभारणी करून. प्रभु रामचंद्राला आणि गणपतीला हृदयाच्या कोशात ठेवा अशी विनंती करून शिलालेखाचा शेवट करण्यात आला आहे.

शिलालेखाचे महत्व : देवाला आपल्या हृदयात ठेवा याचा अर्थ असा आहे की देवावर पूर्णपणे विश्वास ठेवावा श्रद्धा ठेवावी. त्याच्यावर भक्तिभावाने प्रेम करा.आपल्या जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करा.त्यांच्या शिकवणी आणि तत्वांनुसार जीवन जगा केवळ धार्मिक अर्थाने नाही तर भावपुर्ण भक्तीने प्रार्थना करा.अडचणीच्या काळात देवावर विश्वास ठेवा तो तुम्हाला मदत करेल.जेव्हा तुम्ही चांगल काम कराल तेव्हा तो तुम्हाला बळ आणि शक्ती देऊन योग्य दिशा दाखवेल,देवाच्या उपस्थितीची आणि त्याच्या प्रेमाची जाणीव सतत आपल्या हृदयात ठेवली तर जीवनात आनंद आणि शांती टिकून राहील.
शिलालेखाची सुरवात गणेश स्तुतीने झाली आहे . लेख शक सवतसर मास तिथीने युक्त असून शक लिहण्याची पद्धत ही शशांक अक्षर स्वरूपात आहे . शिलालेखात आलेले सुमंत (डबीर )हे नाव शिवकाळापासून प्रचलित असून या घराण्यातील सोनोपंत डबीर(सुमंत) हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते .या घराण्याने स्वराज्याची खूप मोठी सेवा केलेली आहे .श्री सुमंत आनंदराव यांनी सुपे गावात श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर बांधून श्री रामाला आणि गणेशाला स्वतःच्या हृदयात ठेवा असा संदेश दिला आहे .यावरून हे घराणे सामाजिक व आध्यात्मिक आणि धार्मिक वृत्तीचे दिसून येते ..आजही सुपे गावात सुमंत आडनावाची लोक राहतात.एखाद्या ठिकाणी मंदिर बांधून त्याची द्वारे जनमाणसा साठी खुली करून त्यांच्या हृदयात देवाचे स्थान निर्माण करून त्या माहितीची लेखी स्वरूपात नोंद करून ठेवणे हे या शिलालेखाचे विशेष महत्व आहे…

===================================
गावाचे नाव : मु पो.सुपे, ता.बारामती, जि.पुणे.
जी.पी.एस. : N-१८. ३२५८७४,W-,७४.३८१६८९
शिलालेखाचे स्थान : पूर्वी मल्लिकार्जुन मंदिरात स्तंभांवर कोरलेला होता सध्या तो स्तंभ श्री गिरमे यांच्या घरासमोर ठेवलेला आहे.
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा : देवनागरी – लिपी मराठी भाषा
प्रयोजन : अधिक महिन्यात श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर बांधकाम पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : शके १६५२ साधारण नाम संवत्सरी भाद्रपद शुद्ध तृतीया
काळ वर्ष : अठरावे शतक पूर्वाध– १९ऑगस्ट १७३० बुधवार
कारकीर्द:छत्रपती थोरले शाहू महाराज
ग्रामनाम:सुपे
ग्रामदेवता :- श्री गणेश, ,श्री मल्लिकार्जुन
व्यक्तिनाम : श्री सुमंत ,रघुनाथ आनंदराव
शिलालेखाचे वाचक :- .श्री. अनिल किसन दुधाणे. अथर्व पिंगळे
संक्षेप :- द्वेपंचसाइंदु –दोन पाच सहा एक(१६५२), शुक्ल-शुद्ध , ग्रामि-गाव ,नंदन –पुत्र ,हृत्कोसी-हृदयात

सुमंत डबीर घराण्याच्या इतिहासात आलेल्या नोंदी आणि त्यांचे कार्य

शिवकाळ :-
१.शके १५८३ सन १६६१ इसवीचे सुमारास शिवाजीमहाराजानी आपले लष्करात व्यवस्थे करतां अष्टप्रधान केले त्यांत सोनोपंत म्हणून त्याचे लष्कारांत होता त्यास डबीर हें पद दिले. सोनोपंत हा शिवाजीचे लष्करात शके १५६३ सन १६४१ पासून होना.
२.शके १५८५ सन १६६४ इसवीचे सुमारास शिवाजीमहाराज दिल्लीकडे गेले त्याजबरोवर सोनोपंत यांचा मुलगा त्रिंबक सोनदेव हा होता त्याणें शिवाजीमहाराजा बरोबर पुष्कळ हाल सोसून परत आला शके १५९६ सन १६७४ इसची साली राज्याभिषे-क झाला तेव्हां अष्टप्रधानांची नांवें संस्कृतभाषेत ठेवि लीं त्यांत डबीर यांस सुमंत असे पद ठरवून तेपद् जनार्दन नारायण हणमंते यांस दिलें.
३.सुमंत यांचे राजमंडळांत असें काम होते की त्याणीं परराज्यातील वकिलाचे काम करावें आणि राज पत्रावर दरखाचे संबंधानें समत सुमंत हे निशाण करावें राजानें यांस पत्र लिहिणें त्यावर राजश्री नाव लिहून पंडित असें लिहून शेवटीं बहुतकाय लिहिणें सुज्ञ असा असें लिहिण्याची चाल होती .
सुमंत पदांची वस्त्रे खालीं लिहिल्या प्रमाणें महाराजाकडून होत होती.

वस्त्रे :
१ प्रथम भेटीचे वेळेस चादर छडीदार
१ पदाची वस्त्रे – मंदील, जामेवार, चादरछडीदार किनखाप, पटका.
१ शिक्के करार
१ शस्त्रे –ढाल, तलवार.
१ हत्ती, घोड़ा.
१ जवाहिर – शिरपेच, चौकडामोत्याचा कंठीमो-त्याची, तुरा मोत्याचा
१ चौरीरुप्याचे दांडीची.
१ कलमदान नाडीचे.
या प्रमाणे देण्याची चाल होती सुमंत याणी महाराजास भेटीचे वळेस कांहीं मोहरा नजर कराव्या लागत
बहुत करून दहा मोहरा नजर कराव्या लागत

छत्रपती संभाजी महाराज काळ :-
१.शके १६०२ सन १६८० चेसुमारें जनार्दन नारा यण याणें संभाजीमहाराजांस कोल्हापुरचे किल्ल्यावर वर कैद करण्याची मसलत केली म्हणून संभाजीनी त्यास रायगडास आल्यावर कैद करून त्याचे पायांत बेडी घातली.
२.संभाजीमहाराज यांस मोगलानी धरून नेल्यावर राजाराममहाराज कर्नाटकांत गेले तेव्हां त्यांणी
जनार्दन नारायण यांस कैदेतून सोडविलें तो महाराजां बरोबर कर्नाटकांत गेला.
३.शके १६१४ सन १६९२ साली राजाराममहाराज याणी जिंजी मुकामी अष्टप्रधान केलें त्यांत महादजी जनार्दन हणमंते यांस सुमंत पद दिलें. आणि जनार्दन नारायण यांस आमात्य पदवी दिल्ली.
४.शाहुमहाराज मोंगलाचे कैदेतून सुटून दक्षणेत येत असतां शके १६२८ सन १७०६ इस सन सुमारें औरंगाबाद मुकामी आनंदराव रघुनाथ भोपळे हे औरंगाबादेत सुखवस्तु राहात होते ते येऊन भेटले तेव्हां ते हुशार व चतुर असें पाहून शाहुमहाराजांनी त्यांस आपणाबरोबर आणले.
५.शके १६२९ सन १७०७ साली ताराबाईसाहेव यांजकडील सातारा वगैरे किल्ले शाहु महाराजानी घेतलें तेव्हां आनंदराव याणे चांगला शूरपणा व हुशारी दाखविली.
६.महादाजी जनार्दन ताराबाईसाहेब यांस मिलाफी होते म्हणून त्यांजला काढून शके १६३२ सन १७१० चे सुमारे शाहुमहाराजानी आनंदराव यांस सुमंत पदाची वस्त्रे दिलों व कऱ्हाड प्रांतापैकी नाङगोंडीचें-वतन रुपये ५००० आणि खेरिज इनामीसरंजाम १००४१२॥ रुपयांचा दिला.

छत्रपती थोरले शाहू महाराज रोजनिशी यात आलेल्या सुमंत डबीर पदाच्या नोंदी :-
१. बाळकृष्ण वासुदेवः- अशर मया अलफांत यांस सुमंत असे लिहिल्याचे कागद आहेत.
२. महादाजी गदाधरः- इसने अशरीन सालीं यांस सुमंत असे लिहिल्याचे कागद आहेत.
३. अनंदराव रघुनाथः पासी सुमंती सांगून पांच सनंग दिले, छ २३ रबिला अर्बा अशरीन पौष बहुल दशमी भृगुवासर. (म्हणजे सन१७२५ साल)
४विठ्ठलराव – यांस पद दिल्याबद्दल वगैरे कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशा-विषयी प्रतापसिंह महाराज यांनीं एक यादी केली आहे त्याजवरून समजते.
५. मल्हारराव कृष्णः- यांस पद दिल्याबद्दल वगैर कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशाविषयीं प्रतापसिंह महाराज यांनीं एक यादी केली आहे त्याजवरून समजते.
६. जिवनराव विठ्ठलः- यांस पद दिल्याबद्दल वगैरे कागद दप्तरी नाहींत, परंतु हे सुमंत होते अशाविषयीं प्रतापसिंह महाराज यानीं एक याद केली आहे त्याजवरून समजतें.
७. महिपाजी आनंदरावः- इहिदे सलासिन सालीं.
८.सुमंत यांचे दिमतीचे व फडणिशीचे व मुतालकीचे वगैरे इतर लोक होते तेः- १ यादो-
गोपाळ मुतालिक, १ नारोराम फडणीस, १ नारो काशी.पारसनीसः- १ घनःशामदास कावन, १ भगीरथ, १ लाला भगीरथ.
९.इ. स. १७४०-४१.इहिये अर्खेन मया व अलफ.मोहरम २०.छ २३ रोजी सोमवारी मंत्री राजश्री आनंदराव सुमंत यांची रवानगी नबाब किलीब खान याजकडे केली, शिरपाव दिल्हा.

संदर्भ :-
१.(IE VI -२६३)
२.सुपे परगणा-श्री विश्वास देशपांडे.पान –नो १२२
३. छत्रपती शाहू महाराज रोजनिशी
४. सातारा छत्रपती घराणे :-

©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
सदर कार्यात मराठा इतिहासाचे संशोधक श्री प्रवीण भोसले सर ,श्री विश्वास देशपांडे,श्री विनोद खटके,श्री मनोज कुंभार श्री जयराम सुपेकर यांचे महत्वाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment