महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

महिमानगड | Mahimangad Fort

By Discover Maharashtra Views: 3640 5 Min Read

महिमानगड | Mahimangad Fort

समुद्रसपाटीपासून ३००० फुट उंचीचा महिमानगड साताऱ्याच्या पुर्व भागातील माण तालुक्यात मोडतो. महिमानगड गावामार्गे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा – पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे 12 कि.मी अंतरावर असणा-या महिमानगड फाट्यावरून पुढे जातो. महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची सुरेख तटबंदी दिसते.

महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला असुन महिमानगडवाडी किल्ल्याच्या उत्तर पायथ्याला उतारावर वसलेली आहे. महिमानगड गावाच्या जिल्हापरिषदेच्या कायार्लयासमोरील वाडीतील मंदिरापासून एक पायवाट गडावर जाते. मंदिराशेजारी आपल्याला एका जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. या वाटेने वळणावळणाने थेट दरवाजापर्यंत जाताना गडाच्या दरवाजाचे बुरुज त्याच्या अभेद्यपणाची क्षणोक्षणी जाणीव करून देतात. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत तीन पाण्याची टाकी कोरलेली आहे. यातील एकात गच्च झाडी माजलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे पण तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळ वाटेवर येवू शकतो.

गडाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव व दगडात खोद्लेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने गड गाठण्यास अर्धा तास लागतो. इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. महिमानगडाच्या हे झाड म्हणजे एक नवलच आहे, हे झाड उभे न वाढता आडवे वाढुन जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे. येथून गडात उत्तरेकडून शिरणारा वळणदार मार्ग दिसतो. आतमधे Mahimangad Fort गडाचा पुर्वाभिमुख बांधलेला दरवाजा होता. महिमान गडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या दोन्ही बाजूला चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दरवाजासमोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले आहे असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.

प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूस समोरच छोट्या टेकडीवर हनुमानाचे देऊळ दिसते. मंदिराशेजारीच एक टाके आहे. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पाय-या दिसतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस उतारावर बारमाही पाण्याचे बांधीव खोल टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. याच्या शेजारी अजून एक कोरडे टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. याशिवाय बांधीव टाक्याच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. येथून किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड काढलेले असुन तो खडडा साच पाण्याचा तलाव म्हणुन वापरत असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. ही सोंडवजा माची गडापासून भक्कम तटबंदीने वेगळी केली आहे. या सोंडेवर थोडेफार बांधकामांचे अवशेष दिसतात. सोंडेच्या पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे. येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात.

तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन चोर दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील चोरदरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे. गडावर फार अवशेष शिल्लक नाहीत परंतु वाड्यांची काही जोती मात्र दिसतात.

गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर आणि ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर – पंढरपूर – सातारा – वाई – महाड असा व्यापारी मार्ग होता. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकी एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे. गड संपुर्णपणे फिरण्यास साधारण एक तास लागतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment