महाभारतापूर्वीचे महाभारत
मिट्ट काळोखात मुसळधार पाऊस कोसळत असताना, मुळातच हिमालयातील उगमाने हिमवत थंड झालेल्या पाण्याचे लोट घेऊन येणारी परुष्णी नदी आज तिचे भलतेच प्रलयंकारी रुप दाखवत होती. एखादा चवताळलेला केसरी भयंकर गर्जावा आणि त्याच्या त्या गर्जनेने जंगलात गोंधळ माजण्याऐवजी स्मशान शांतता पसरावी तशीच शांतता लाटांच्या आणि मेघांच्या निरंतर गर्जनेतही परुष्णीच्या काढावर दाटली होती.
परुष्णीच्या लाटा जणू काठावरील महाकाय खडक भेदू पाहत होत्या, पण तरीही त्या खडकांना खऱ्या अर्थाने भेदत होती ती एक करारी नजर.. त्या नजरेत साठला होता विश्वासघात, अपमान आणि..
आणि प्रतिशोध..!
परुष्णीच्या काठावर ऋषीच्या वेशात तो पुरुष पर्वतासारखा पाय रोवून निश्चल उभा होता. त्याचा वेश जरी ऋषीचा असला तरी चेहऱ्यावरचे तेज मात्र त्याच्या क्षत्रियत्वाची ठळक ग्वाही देत होते. तो होता..
क्षत्रिय महर्षी विश्वामित्र..!
भरतवंशाचा भूतपूर्व पुरोहित… हो भूतपूर्वच !
कारण नुकतेच भरतवंशी राजा सुदासने दरबारातील सर्वात प्रमुख असलेले (प्रधानमंत्री) पुरोहित पद विश्वामित्राकडून काढून घेत तिथे महर्षी वशिष्ठाची नियुक्ती केली होती.
काही काळापूर्वी आपल्याच मार्गदर्शनाखाली ज्या नवख्या सुदास राजाने अश्वमेध यज्ञ करुन ‘चक्रवर्ती’ उपाधी धारण केली होती, त्याच सुदासाने आपले पद अशा रितीने काढून घेतल्याने चवताळलेला विश्वामित्र उफाळती परुष्णी लांघून एक अभूतपूर्व इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला होता…
तर, हि कथा आहे आजपासून ३५०० (साडेतीन हजार) वर्षांपूर्वीची. अर्थात पूर्व वैदिक काळातील प्रसिद्ध दशराज्ञ युद्धाची..!
ऋग्वैदिक काळात सप्तसिंधुंच्या खोऱ्यात वैदिक संस्कृती आपला विस्तार करत होती. नद्यांच्या काठांवर विविध समुहांच्या (कुळ) रुपात अनेक लहानमोठी राज्ये उदयास येत होती. त्यातील प्रमुख पाच वैदिक राज्ये ‘पंचजन्य’ म्हणून ओळखली जात असत. ज्यात पुरु, अनु, दृह्यू, तुर्वश आणि यदु यांचा समावेश होता. तसेच आणखी एक प्रबळ वैदिक राज्य होते ते म्हणजे भरत. याचसोबत त्या परिसरात अनेक अवैदिक राज्ये देखील होती. या सर्वच राज्यांची आपापसात अनेक कारणांवरून लहानमोठी युद्धे होत असत, ज्यात सुपिक जमीन व नद्यांच्या पाण्यावरील अधिकार हे एक प्रमुख कारण होते.
अशाच एका युद्धादरम्यात भरतवंशी राजा दिवोदस याने पुरुवंशी राजा संबर यास हरवून त्याची हत्या केली आणि पुरुंची ९९ शहरे नष्ट केली.
याच राजा दिवोदसचा पुत्र सुदास याने आपला पुरोहित विश्वामित्र याच्या मार्गदर्शनाखाली अश्वमेध यज्ञ करुन पंचजन्यासह सप्तसिंधूंवर आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भरतवंशी त्रुत्सू कुळातील सुदास पैजवान हा शूर, महत्वकांक्षी आणि विस्तारवादी होता. अश्विनीकुमारांनी त्याचा विवाह आपली कन्या सुदेवी सोबत केला होता.
त्याच्या अश्वमेध यज्ञाने आर्यावर्तात भरतांचे वर्चस्व सिद्ध झाले होते आणि तेच वर्चस्व सप्तसिंधुंच्या पाणी वाटपातही त्यास हवे होते. त्याच्या विस्तारवादी धोरणास सुरुवातीस विश्वामित्राचीही साथ होती पण सुदासचे धोरण जसजसे आणखी तिक्ष्ण होऊ लागले तेव्हा दोघांमध्ये अनेकदा मतभेद होऊ लागले व परिणाम स्वरूप त्याने राजाच सर्वोच्च असतो हे विश्वामित्रास दाखवून दिले.
पण आता झालेल्या अपमानाचा डाग मनात घेऊन त्याचा भूतपूर्व पुरोहित पुरुराज्यात दाखल झाला होता. सप्तसिंधूच्या खोऱ्यात भरतांनंतर सर्वात प्रबळ शक्ती पुरु राज्याची होती. हे तेच पुरु होते ज्यांच्या राजाचा वध करुन भरतांनी यांच्या राज्यातील शहरे नष्ट केली होती. पुरु आपला हा अपमान अजूनही विसरु शकले नव्हते आणि आता भरतांची वाढती ताकद पुरुंना पुन्हा आव्हान देत होती. परुष्णी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातच पुरु आणि भरत ही दोन्ही राज्ये पसरलेली होती व त्यामुळे या नदीच्या जल वाटपावरुन सुरु असलेला सुप्त संघर्ष आता उघड रुप धारण करु लागला होता.
संवरण हा आता पुरुंचा नवा राजा होता. तो भरतांचा राजा सुदासचा समवयस्कच होता आणि तितकाच शक्तीशाली आणि महत्वकांक्षी सुद्धा..!
चिडलेला विश्वामित्र थेट पुरुंच्या दरबारात आला. त्याला पाहून सभेतील सर्वच मंत्रीगण आश्चर्यचकित झाले. संवरणाने लगबगीने उठून महर्षींना प्रणाम केला. त्यांचे आदरातिथ्य झाल्यानंतर विश्वामित्राने उघडपणेच आपल्या येण्याचे प्रयोजन सभेस स्पष्ट केले, तसेच भरतांचे वाढते सामर्थ्य पुरुंच्या ताकदीस व पंचजन्यांच्या स्वायत्ततेस कसे आव्हान उभे करत आहे हे देखील पटवून दिले. संवरणास या गोष्टी पटल्याने त्याने त्वरित पंचजन्यांची महासभा आयोजित केली. यदु, अनु, दृह्यू, तुर्वश व पुरु अशा पंचजनांनी एकमतानेच भरतांचा कायमचा बिमोड करण्याचा ठराव मंजूर केला, तसेच यासाठी स्वतः विश्वामित्रांनीच आपल्याला मार्गदर्शन करावे अशी त्यास विनंती केली. पंचजन एकत्रितपणे आता युद्धास सज्ज झाले होते. पण भरतांची वाढती ताकद पंचजन्यांसह सप्तसिंधुतील इतरही अनेकांना धोकादायक वाटत होती.
पंचजनांनी भरतांविरुद्ध ठोकलेल्या शड्डूचा आवाज लवकरच संपूर्ण सप्तसिंधूत गरजला आणि एकेक करुन अलिन, पख्त, भलान, वैशनिन आणि शिव ही अवैदिक राज्ये (कुळे) देखील या युद्धात सामील झाली आणि अशा प्रकारे पंचजनांचा हा लढा आता दहा राजांचे युद्ध अर्थात ‘दशराज्ञ युद्ध’ म्हणून प्रसिद्ध झाला. पण भरतांविरुद्धचा रोष एवढ्यावरच थांबणार नव्हता. यात लवकरच वैकर्ण, मत्स्य, सिम्यू, दास इत्यादी आणखी अवैदिक राज्ये सहभागी झाली. तसेच भृगू व कवश या वैदिक राज्यांनी (कुळांनी) युद्धविजयासाठी यज्ञाहूती देत दशराज्ञ गटाच्या बाजूने युद्धात उडी घेतली. अशा रितीने संपूर्ण आर्यावर्तच सुदासच्या आणि त्याच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात आता एकवटले होते.
आपल्याविरुद्ध एवकटलेली ही प्रचंड ताकद पाहून सुदास घाबरला नसता तरच नवल..! अशावेळी वसिष्ठ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आपल्या मंत्रोच्चारांच्या बळावर आपण तुला नक्कीच विजय प्राप्त करुन देऊ असे आश्वासन त्याने सुदासास दिले. खरेतर युद्धाचे एक प्रमुख अंग वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यातील सुप्त संघर्षाचे देखील होते. दोघेही वैदिक ‘मंत्रद्रष्टे’ ऋषी होते. तथापि वसिष्ठ अधिक तपोसिद्ध होता आणि म्हणूनच सुदासने त्यास आपला पुरोहित नेमले होते. आता आपल्या मंत्रोच्चारांच्या जोरावर या दोघांपैकी जो कोणी इंद्र व वरुण या सर्वश्रेष्ठ वैदिक युद्धकर्त्या देवतांना प्रसन्न करुन घेणार व त्यांचा आशीर्वाद मिळवून युद्धास विजयाची दिशा देणार तोच आर्यावर्तातील सर्वात श्रेष्ठ व ताकदवान ऋषी ठरणार होता.
संदर्भ: ऋग्वेद मंडल ७ व ऋग्वेद मंडल ३
स्वप्नील महेंद्र जाधवरावतुम्हाला हे ही वाचायला आवडेल

