लक्ष्मी नृसिंह मंदिर, पुणे

लक्ष्मी नृसिंह मंदिर, पुणे

लक्ष्मी नृसिंह मंदिर, पुणे –

महाराष्ट्रात लक्ष्मी-नृसिंहाची मंदिरं तशी थोडीच आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या पुण्यात आहे. खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर एक जुन्या पद्धतीचा दगडी पायऱ्यांचा लाकडी दरवाजा दिसतो. आतल्या बाजूस असलेल्या श्री नृसिंह मंदिराचे ते प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पेशवेकालीन मराठा शैलीतील लक्ष्मी नृसिंहाचे लहानसे मंदिर आहे.

सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत १७८८ मध्ये येथील नृसिंह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १८ व्या शतकात बांधलेल्या तुळशीबाग व बेलबाग या मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची रचना केलेली आहे. हे मंदिर चिरेबंदी असून मंदिराला सुंदर कळस, कोरीव छत व महिरपी असलेला लाकडी दिवाणखाना आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पिंपळाचा भव्य पार आहे. या पारावर पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती, नागदेवतेच्या शिळा व दगडात कोरलेल्या अज्ञात पादुका आहेत. या पारानजीक असलेल्या खोलीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काही काळ वास्तव्य होते. क्रांतिकारक दामोदरपंत चाफेकर तसेच समर्थभक्त श्रीधरस्वामी यांचेही या मंदिरात काहीकाळ वास्तव्य होते.

मंदिराचे सभामंडप लाकडी आहे आणि त्याची लांबी ६० फूट व रुंदी २० फूट आहे. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत.  उजव्या बाजूला ओवरीच्या भिंतीत कोरीव महिरपी असलेल्या खिडक्या आहेत. सभामंडप व ओवऱ्यांच्या लाकडी छताच्या कडेने पानाफुलांच्या वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत. सभामंडपाचे महिरपी असलेले खांब लाकडी पट्ट्यांनी जोडलेले आहेत. या पट्ट्यांवर उत्सवप्रसंगी दिवे लावण्याची सोय आहे. मंदिराच्या शिखरावर कलात्मक नक्षी आहे. मागच्या एका ओवरीतून शिखरावर जाण्याकरिता मार्ग आहे. मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर डाव्या बाजूस भिंतीमध्ये सूर्यनारायण व उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती आहेत.

गर्भगृहातील लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती संगमरवरातील असून रेखीव, मोहक व ठसठशीत आहे. या मूर्तीस ‘शांत’ रूपातील नृसिंह म्हणतात. हिरण्यकश्यपूचा वध करणारी नृसिंहाची मूर्ती उग्र स्वरूपातील समजली जाते. पेशवाई पद्धतीच्या भव्य कोरीव मखरात आरशापुढे ही मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात ‘पंचायतन’ पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंतीमध्ये पेशवेकालीन संगमरवरी गणेशमूर्ती आहे तर उजव्या बाजूला नंदी व शंकराची पिंडी आहे. सभामंडपाच्या टोकाला नृसिंहासमोर प्रल्हादाची संगमरवरी मूर्ती असलेलं भक्त प्रल्हादाचं लहान मंदिर आहे.

वेदशास्त्रसंपन्न गणेशभट्ट जोशी यांनी श्री नृसिंहाची ही मूर्ती, अत्यंत भक्तिभावाने उत्तर प्रदेशातून पुण्यात आणली आणि आपल्या बागेत लहानसे पण देखणे मंदिर बांधून त्यात तिची विधीपूर्वक स्थापना केली. मंदिर झाल्यावर त्याच्या सान्निध्यामुळे आणि आजूबाजूच्या निसर्गसंपन्नतेमुळे मोहून काही पुणेकरांनी मंदिर ते खजिना विहीर या भागात आपली घरे, वाडे बांधले आणि बघता बघता पाच पंचवीस घरांची छोटी वस्ती तयार झाली. या वस्तीला विस्ताराला भरपूर वाव आहे हे बघून, या जागी पेठ वसवल्याने हा परिसर गजबजून जाईल, पेठ मोठी होईल. हा हेतू मनाशी ठेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इ.स. १८०५ च्या आधी या वस्तीला स्वतंत्र पेठेचा दर्जा दिला आणि नाव ठेवले पेठ नृसिंहपुरा.

संदर्भ:
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले

पत्ता : https://goo.gl/maps/5Ru7TPtqsA8wg8es7

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here