श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर, पुणे –
टिळक चौकात अलका टॉकीज शेजारी लकडी पुलाच्या कोपऱ्यावर एक प्रशस्त, देखणं आणि सुंदर विठ्ठल मंदिर आहे. उत्तर प्रदेशातील झांशी शहरातील जोतीपंतबुवा महाभागवत यांनी पेशवाईच्या काळात १०८ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यातले लकडी पूल विठ्ठल मंदिर हे एक.
या मंदिरात सगळ्या देवदेवतांचा जणू संमेलनच भरलेल आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच उजवीकडे संत ज्ञानेश्वर आणि डावीकडे संत तुकाराम महाराज यांची भव्य तैलचित्र आहेत. पुढे प्रशस्त सभामंडप आहे. आतमध्ये विष्णू, गरुड, खंडोबा, देवी, दत्त आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. तसेच चार दिशांना चार मस्तक असणारी पशुपतेश्वर शंकराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या डाव्या भिंतीला पाठ टेकलेली काळ्या पाषाणाची गणेशमूर्ती आहे तर उजव्या भिंतीवर लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आणि नंदी असून थोड्या उंचावर काळया पाषाणाची सुंदर आणि देखणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. पूर्वी या मंदिरामागे स्मशान भूमी होती त्यामुळे त्याला मढ्या विठोबा सुद्धा म्हणत.
भर वर्दळीच्या चौकात असूनसुद्धा आपली शांतता जपणाऱ्या ह्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्यावी.
संदर्भ –
मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर
सफर ऐतिहासिक पुण्याची : संभाजी भोसले
पत्ता : https://goo.gl/maps/wB6pBBUVpZbyUYKY6