खांडेश्वरी माता लेणी, भवाले

खांडेश्वरी माता लेणी, भवाले

खांडेश्वरी माता लेणी, भवाले –

आजची सफर एका अपरिचीत प्राचीन लेणीची. भारतातल्या एकूण १२०० लेणीपैकी एकट्या महाराष्ट्रात ८०० हुन अधिक हिंदू बौद्ध व जैन धर्मियांच्या लेण्या आढळतात. ठाणे जिल्यातील तालुक्याचं ठिकाण असलेल्या भिवंडी शहरापासून १७ किमी व कल्याण शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर भिवंडी तालुक्यातील भवाले ह्या गावाच्या पूर्वेला एका डोंगरावर ही प्राचीन बौद्ध लेणी स्थित आहे. ह्या खांडेश्वरी माता लेणी वर कोरलेल्या शिल्पांवरून ह्या लेणीच्या प्राचीनतेचे दर्शन घडते.

लेणीपर्यत पोहचण्यासाठी एक सुस्थितीत पण निर्जन असलेला रस्ता देखील ह्या गावापासून आहे. लेणी मध्ये प्रवेश करताच ह्या लेणीचे सौंदर्य आपल्या नजरेत भरते. साधारण ४०×४० फूट इतके क्षेत्र व १५ फूट उंचीची ही लेणी आहे. लेणीच्या सुरुवातीलाच डाव्या बाजूला  पिण्यायोग्य असलेलं ४×४ फूट व ८ फूट खोलीचं बारमाही पाण्याचं टांक पहायला मिळते. व उजव्या बाजूला ५×६ फूट आकाराचं एकूण १७ व्यक्ती असलेलं अतिशय सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे. ह्या लेणीचा पहिला भाग हा सहा कोरीव नक्षीकाम केलेल्या खांबावर आहे. त्यातील एक खांब हा तुटलेल्या स्थितीत आहे. आणि ह्या खांबाच्या वरच्या भागात साधारण ४० फूट लांब व २ फूट रुंद च्या आकारात अनेक कथांरुपी शिल्पे कोरलेली दिसतात. ही शिल्पे पाहताना आपल्याला अजिंठा लेणीच्या आठवणी ताज्या होतात. कारण ह्या लेणीची शिल्पे ही अजिंठा लेणीच्या शिल्पांशी मिळतीजुळती आहे.

लेणीला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत त्यावर देखील काही मुर्त्या कोरलेल्या आहेत. आत प्रवेश केल्यावर जवळजवळ ४०×३० फूट क्षेत्राचा गाभारा दिसतो. त्याच्या उजव्या बाजूला एक श्रीगणेशाची कोरलेली मूर्ती आहे. मधल्या भागातील खोलीत प्रवेश केल्यावर आपल्याला खांडेश्वरी मातेच्या मूर्तीचे दर्शन होते. ही माता म्हणजे येथील स्थानिकांचे एक श्रध्दास्थान आहे. याच बरोबर एक शिवलिंग देखील पहायला मिळते. आणि दर महाशिवरात्री च्या दिवशी येथे जत्रा ही भरते. पावसाळ्यात तर ह्या लेणीची सुंदरता ही अधिकच खुलून येते.

लेणीच्या वरच्या भागातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याने ह्या लेणीची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. ह्या लेणीबद्दल स्थानिकांशी चर्चा केल्यावरच मी हे मत मांडतो की ही एक बौद्ध लेणी असून काही काळ आधी ह्या लेणीत खंडेश्वरी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

Vikas Zanje 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here