करंजांची खूप मजेदार कातणी भाग १ | Karanji Cutter

Karanji Cutter

करंजांची खूप मजेदार कातणी भाग १ | Karanji Cutter

नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी,रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा !

गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली
” अरे, भावाला बहीण नको का ?”… किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे !
लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीला हे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच ” कातणे” !!

माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे.

काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cutter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात.
अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here