कामणदुर्ग | Kamandurg Fort

By Discover Maharashtra Views: 3520 4 Min Read

कामणदुर्ग | Kamandurg Fort

ठाणे जिल्ह्यातील माहुली गड हा उंचीत सर्वप्रथम तर वसईजवळील कामणदुर्ग(Kamandurg Fort) हा उंचीने २२०० फुट उंचीचा दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. वसई-भिवंडी रस्त्यावर कामन गाव आहे. या गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर बेलकुंडी गाव आहे. या गावातून कामनदुर्गकडे जाण्यासाठी पायवाट आहे.

११व्या शतकात लिहील्या गेलेल्या महिकावतीच्या बखरीत या किल्ल्याचा उल्लेख ‘कामवनदुर्ग’ या नावाने केलेला आढळतो. प्राचिनकाळी कल्याण-वसई यांच्यात उल्हास नदीतून व्यापार चालत असे. वसई येथून अनेक जहाजे उल्हास नदीतून कल्याणकडे रवाना होत. या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि परिसरातील टेहळणी करण्यासाठी कामनदुर्गाची निर्मिती केली गेली. वसई लढ्याच्यावेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. उल्हास नदी व वसईच्या खाडी क्षेत्रात असलेल्या या किल्ल्यावर चढण्यासाठी तब्बल तीन ते साडेतीन तास लागतात. आजही अंगा खांद्यावर कडय़ात खोदलेल्या पायऱ्या, कोरडी पाण्याची टाकी अशा प्राचीन खुणा बाळगत हा किल्ला उभा आहे. ग

डाच्या पायथ्याशी असलेल्या बेलकुंडी गावातून दोन डोंगरांच्या मागून डोकावणारा कामणदुर्गचा माथा दिसतो. हे दोन डोंगरपार करुन आपण कामणदुर्गच्या डोंगराला भिडतो तेव्हा कातळात खोदलेल्या पायर्याे आपले स्वागत करतात. या पायर्यात चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. समोर १०० फूट उंचावर कामणदूर्गचा माथा आपले लक्ष वेधून घेतो. येथे कातळात खोदलेल्या ५ टाक्याचा समूह आहे. मार्च महिन्यापर्यंत यातील एका टाक्यात पाझरणारे जेमतेम पाणी असते. टाक्यांकडे जाताना वाटेत झाडाखाली एक दगडी मुर्ती ठेवलेली आहे. यात दोन स्त्रिया कोरलेल्या असून त्यांच्या कानावर कुंडलांसारखी आभूषणे घातलेली आहेत. टाक्यांच्या बाजूने एक वाट कामनदुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते.या वाटेवर दोन अर्धवट ढासळलेले बुरुज व थोडीशी तटबंदी यांचे अवशेष आहेत. वाटेत एक सातवाहनकालीन कोरड टाक लागत. त्याच्या पूढे कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. या पायर्यार चढून गेल्यावर किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो.येथे साचपाण्याचा तलाव असल्याचे दिसते पण यातही पाणी टिकत नाही.

किल्ल्यावर पाण्याची एकुण अकरा कोरीव टाकी असुन एकाही टाक्यात पाणी टिकत नाही. पाणी म्हणजे गडाचा आत्मा. ज्या गडावर पाण्याचा स्रोत जिवंत राहत नसेल, टाक्यामध्ये पाणी टिकत नसेल तो गड कधीच वसत नाही. कामणदुर्ग अनेक वेळा मोहिमांमध्ये यशस्वी ठरूनही अपयशाचा मानकरी ठरला. कारण पाण्याअभावी हा गड ब-याच वेळा सोडून द्यावा लागला. किल्ल्यावरुन तुंगारेश्वर, गुमतारा हे किल्ले दिसतात पश्चिमेला वसईची खाडी ते धारावी पर्यंतचा परीसर दिसतो.

सन १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी हा गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. १२ सप्टेंबर १६८५ रोजी कामणदूर्ग पोर्तुगिजांनी मराठ्यांकडून हस्तगत केला. पण पाणी नसल्यामुळे पोर्तुगिजांनी किल्ला सोडून दिला व तो ओस पडला. इ.स १७३७ मध्ये पोर्तुगिज व पेशवे यांच्यामध्ये वसई युध्द सुरु झाले. त्यावेळी शंकरजी केशव फडके यांनी पेशव्यांना हा किल्ला वसवण्यासाठी पत्र लिहिले, त्यात त्यांनी लिहिले की, किल्ला पोर्तुगिजांच्या परगण्याच्या मधोमध आहे, किल्ल्यावरुन कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवता येईल. यावेळी कामणदुर्गावरील दोन टाक खोदण्यात आली व जूनी दूरुस्त करुन किल्ला वसविण्यात आला. गडावर पाणी थांबावे म्हणून त्या काळी बरेच उपाय केले गेले. गड वसता ठेवावा म्हणून पेशव्यांच्या काळी खूप प्रयत्न करूनही पाणी थांबेना म्हणून पाण्याअभावी पेशव्यांनी देखील हा गड सोडून दिला. पाण्याअभावी ओस पडणारा हा एकमेव दुर्ग असावा.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment