महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कमळगड, ता.वाई, जि.सातारा

By Discover Maharashtra Views: 1441 5 Min Read

कमळगड, ता.वाई, जि.सातारा –

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक गिरिदुर्ग आपले ऐतिहासिक अस्तित्व सांभाळून कणखरपणे निधड्या छातीने आपला गौरवशाली इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सांगत आहेत. काही गिरिदुर्ग परिचित आहेत ते तेथे घडलेल्या महत्त्वाच्या घटनांमुळे किंवा विशेष दुर्गावशेषांमुळे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या दुर्गांपैकी एक काहीसा अपरिचित असलेला व साधारणतः कमळपुष्पाच्या आकाराचा ‘कमळगड’ हा समुद्रसपाटीपासून ४५२२ फूट उंचीवर आहे. या गिरिदुर्गावर ना ऐतिहासिक घटनांचा उल्लेख, ना विविध दुर्गावशेषांचे वैभव तरीहि फक्त तरवार आकाराची कावेची विहीर व चौहोबाजूच्या नैसर्गिक वृक्षराईसाठी नक्कीच एकदा अनुभवने गरजेचे आहे.

भोरपासून जवळ असलेल्या कमळगड दुर्ग पाहण्यासाठी सकाळी ७ वा. भोरहून निघालो. भोर – आंबवडे – कोर्ले – ओहोळी – रायरेश्वर – घेरा केंजळगड – खावली – वाशिवली – वासोळे – तुपेवाडी अशा मार्गाने सकाळी नऊ वाजता पायथ्याशी पोहोचलो. वाहन उभे करून आपापले साहित्य घेऊन समोरील डोंगर चढण्यास सुरूवात केली. हिरवाईने नटलेल्या डोंगरातील खडी चढणीची पाऊलवाट शारीरिक क्षमतेची कसोटी लावणारी आहे. सुमारे दिड पावनेदोन तास चढून आल्यावर आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. तेथे पूर्वेस कमळगड व पश्चिमेस माडगणीकडे जाणाऱ्या फलकाचे दर्शन होते. माडगणी नावाची पश्चिमेस लोकवस्ति असावी असे वाटते. आतापर्यंत समोरच दिसणारे थंड हवेचे पाचगणी हे ठिकाण माहित होते पण याच पाचगणीच्या बरोबर समोरील डोंगरावर निसर्गसंपन्न थंड हवेचे माडगणी हे ठिकाण माहित नव्हते.

माडगणी का प्रसिध्द झाली नसावी असा मनात प्रश्न निर्माण होतो. कदाचित वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक येथे येत नसावेत आणि म्हणूनच येथील वनचर अधिवास व निसर्ग अबाधित राहिला असावा. पूर्वेस असलेल्या लहान टेकडीवर पोहोचल्यावर वासोळेचे ( परतवाडी) गोरक्षनाथ मंदिर आहे. उत्तराभिमुख मंदिर साधे असून पुढे लोखंडी पत्र्याच्या आच्छादनातील जमीन शेणाने सारवलेली आहे. काही वेळ येथे विसावून जवळच समोरच्या बाजूला असलेल्या खडकातील झ-याच्या पाण्याने तोंड धुऊन पाणी प्यायचे व थोडे सोबतहि घ्यायचे. मग घनदाट जंगलातून अर्धा तास पक्षी व वनचरांचे आवाज ऐकत चालत गेल्यावर मोठी शेती व एक कौलारू घर दृष्टीस पडते. ह्या धनगर समाजाच्या कुटुंबाच्या घरासमोरून झाडीतील पायवाटेने सुमारे दहा मिनिटांत तुम्ही किल्ल्यावर जाणाऱ्या खडकातील लोखंडी सिडीपर्यंत पोहोचता.

आजूबाजूला काही इमारतींचे अवशेष झाडीझुडुपात असल्याचे जाणविते. वर आल्यावर लगेचच दक्षिणोत्तर ३० मीटर लांब,२ मीटर रुंद व २५ मीटर कावेची तरवार आकारातील विहीर दिसून येते. या विहिरीत उतरण्यासाठी सुमारे पन्नास पायऱ्या असून तळात कावेचा खडक आहे. पूर्वीच्याकाळी ग्रामीण भागातील लोकांच्या घरांच्या भिंतींना सणासुदीला व शुभकार्य प्रसंगी कावेचा आणि चुन्याचा रंग दिला जायचे. काळ बदलला आणि काव हा रंग म्हणून वापरणे बंद झाले. ही प्रेक्षणीय विहिरी खेरीज येथे कोणतेहि दुर्ग अवशेष दिसून येत नाहीत. आकाराने अतिशय लहान असल्याने सुमारे अर्ध्या तासात विहिरीसहित हा किल्ला पाहून होतो. मध्यवर्ती ठिकाणी ध्वजस्तंभ असून त्याचे शेजारी खडकात लहान शिवलिंग कोरलेले दिसून येते. ताशीव काळ्याकातळाची नैसर्गिक तटबंदी लाभल्याने सुरक्षिततेसाठी कोणत्याहि बांधकामाची गरज पडली नसावी.

दक्षिणेस असलेल्या बुरूजावरून पाचगणी व धोम बलकवडी धरणाच्या विहंगम दृश्य दिसते. सभोवती असणारा डोंगरभाग वृक्षाच्या आच्छादनाने झाकून गेलेला आहे. हा किल्ला म्हणजे तत्कालीन लहानशी चौकी पहा-याचे ठिकाण असावे. पुरातन काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र घेऊन जाताना सरळ मार्गाने हेर किंवा दूत नक्कीच जात नसतील, तेव्हा ते  अशा अवघड वाटेने जाताना या ठिकाणी मुक्कामाला राहत असावेत. कमळगडचे दुसरे नाव ‘भेळंजा’ देखील आहे.

किल्ला पाहून होईपर्यंत दुपारची एक वाजला होता म्हणून आम्ही शिदोरी सोडण्यासाठी मंदिराजवळील पाणवठ्यावर आलो. सर्वांनी जेवण केले व थोडावेळ गोरक्षनाथ मंदिरात विसावा घेतला. दुपारी २ :३० वाजता परतीच्या वाटेला लागलो व दीड तासात वाहन उभे केले होते त्या तुपेवाडीत पोहोचलो. आता सपाटीवर सुद्धा पाय उचलाण्यास कष्ट जाणवते होते मात्र कमळगड पाहिल्याचे अलौकिक समाधान चेहऱ्यावर होते. परतीच्या वाटेवर असताना घेरा केंजळगड या गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या ओट्याहून चारपाच वर्षाच्या दोन आनंदी बालगोपाळांनी आमच्या चारचाकीवर दगड भिरकावून आनंद व्यक्त केला. त्यांचा आनंद त्यांच्या घरातील लोकांना कळायला पाहिजे म्हणून थांबलो तर आनंदी मुले घरात पळाली. आम्ही तेथील प्रौढ व्यक्तींच्या कानावर ही घटना घातली मात्र ‘ती पाहुण्याची मुले होती, पळून गेली’ अशी त्यांना समर्पक होणारी उत्तरे देऊन त्यांनी स्वतःचे समाधान करून घेतले. एकून या ग्रामीण भागातील बालकांची आनंदी कृती, त्यांचे पालनपोषण करणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व तर दर्शवित नव्हते काय ?

© सुरेश नारायण शिंदे,भोर

Leave a comment