महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

काळा किल्ला | Kala Fort

By Discover Maharashtra Views: 3782 4 Min Read

काळा किल्ला | Kala Fort

मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाल्याने स्थानिक लोक या किल्ल्याला काळा किल्ला म्हणून ओळखतात. धारावी परिसरात असल्यामुळे हा किल्ला धारावीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवर ओ.एन.जी. सी. बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळा किल्ला गल्ली लागते. या गल्लीच्या टोकाला हा किल्ला आहे. काळा किल्ला धारावी झोपडपट्टीत असल्याने सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढलेला आहे.

काळा किल्ला भुईकोट किल्ला असून त्याचा आकार त्रिकोणी आहे. किल्ल्याच्या दोन बाजुस बाणाच्या फाळाच्या आकाराचे दोन त्रिकोणी बुरुज आहेत. आता अस्तित्वात असलेल्या अवशेषात प्रथम दर्शनी काळ्या दगडात बांधलेली किल्ल्याची भिंत व त्यावरील किल्ला १७३७ साली बांधल्याची दगडात कोरलेला शिलालेख दिसतो. शिलालेखावर Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737 म्हणजेच सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली ‘इंजिनीयर’ या नावाने स्वाक्षरी आढळते. किल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दरवाजा नसुन किल्ल्यात जाण्यासाठी ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग कचऱ्याने भरलेला आहे. तटबंदीस जादा संरक्षण देण्यासाठी आतील बाजुस तटबंदीस लागुन पायरीवजा रचना करण्यात आली आहे.

किल्ल्याच्च्या मध्यभागी एक छोटासा हौद असुन या टाक्यात पाणी साठवण्याची सोय केली असावी. याच टाक्याच्या आत वरील बाजुस एक छोटासा भुयारी दरवाजा दिसून येतो. या वाटेने आत शिरल्यावर हि वळणदार वाट आपल्याला एका छोटेखानी खोलीत घेऊन जाते. हे दारुगोळा साठवण्याचे कोठार असावे. भुयाराच्या या शेवटच्या खोलीत आत हवा येण्यासाठी भिंतीत एक छोटीसी खिडकीवजा रचना दिसून येते. किल्यावर एक भुयार असुन ते भुयार सायनच्या किल्यापर्यंत जात असल्याची वदंता असणारे ठिकाण ते हेच आहे.

इंग्रजांनी काळा किल्याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याची तटबंदी व तोफांच्या जंग्या आजही सुरक्षित आहेत. त्यात प्रवेशद्वार, जीना व फांजी यांचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वरील तटाला लागुनच बाहेरील बाजुस एक शौचकुप दिसून येते. किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी शेजारून मिठी नदी वाहत होती पण आता मात्र नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर घातल्याने काळा किल्ला नदी पासून दूर झालेला आहे. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगिजांच्या साष्टी बेटावर आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला.

माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला या चार एका रांगेतील किल्ल्यांमुळे मुंबई बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती. ब्रिटीशांच्या ताब्यात तेव्हा मिठी नदीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा प्रदेश होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश साष्टी इलाखा म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. इ.स. १७३७ मधील वसई मोहिमेत पोर्तुगीजांच्या ताब्यातील माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टी इलाखा मराठ्यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची दहशत ब्रिटीशांना बसली.

ब्रिटीशांना मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे रक्षणाकरता माहीम व सायन यांच्या मध्यावर सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर ह्याने मिठी नदीकाठी इ.स १७३७ मध्ये काळ्या किल्ल्याची बांधणी केली. एका अर्थाने काळा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment