कैलास मंदिर… विनीत वर्तक

कैलास मंदिर Kailas Temple… विनीत वर्तक

गेल्या आठवड्यात कैलास मंदिर ला भेट दिली. त्या रूपापुढे जेव्हा उभ राहिलो. तेव्हा साक्षात शंकराच्या त्या विश्वरूपाची जाणीव झाली. अदभूत, अवर्णनीय हे शब्द थिटे पडतील अस त्याच रूप बघून त्या शक्तीपुढे नतमस्तक झालो. “आधी कळस आणि मग पाया” हे कैलास मंदिराच रूप सगळ्यांना माहित आहेच. पण त्याच्या आकाराची तुलना आणि ते उभ करण्यासाठी लागणारी मेहनत ह्याचा विचार आपण करूच शकत नाही.

मनात विचार केला कि आज जर दुसर कैलास मंदिर उभ करायचं ठरवलं तर आधी त्याच सगळ डिझाईन बनवाव लागेल. त्यासाठी जगातील अत्याधुनिक थ्री डी सोफ्टवेअर आणि त्याच तोडीचे हाय टेक कॉम्प्यूटर लागतील. ह्याचा अंदाज घेऊन कि ते उभ केल्यावर कस दिसेल? त्यातील स्थापत्यकला साकारण्यासाठी कारागिरांना कुठे जागा सोडायची? कोणत्या बाजूने काम सुरु करायचं? आतल्या बाजुच बांधकाम कस करायचं? त्यातल गणित ह्या सगळ्याची गोळाबेरीज करावी लागेल. ह्याशिवाय अजून शेकडो निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर आधी शोधावी लागतील. ह्याची उत्तर शोधण्यासाठीच शेकडो ग्राफिक कलाकार आणि इंजिनियर ह्यांची गरज लागेल ते हि सर्वोत्कृष्ठ. हे सगळ करून सुद्धा नुसत डिझाईन बनवायला कित्येक महिने किंवा कित्येक वर्षाचा कालावधी लागेल.

नुसत डिझाईन करताना आपल्याला घाम फुटेल. त्यापुढे सगळ्यात चांगले आर्किटेक्ट ज्यांना वास्तू, वेदिक सायन्स आणि मंदिराचा मूळ आत्मा ह्याला धक्का न लावता प्लानिंग कराव लागेल. एक चूक आणि पूर्ण खडक निकामी. म्हणजे अजून एका तश्याच डोंगराचा किंवा दगडाचा शोध. ह्या शिवाय एक प्रोजेक्ट लीडर कि ज्याच्या डोक्यात मंदिर तयार असेल अगदी बारीक डीटेल्ससह आणि एक लीडर जो हजारो कारागीर, अभियंते ह्यांच्यावर लक्ष ठेवेल. कैलास मंदिरातील शिल्प ज्या सुबकतेने, ज्या कलात्मकतेने तयार केली गेली आहेत. त्याच्या आसपास पण फिरकणाऱ्या मशीन मानव अजून बनवू शकलेला नाही. हाताने ह्या गोष्टी तश्याच एका दगडातून फोडून मंदिर उभ करत कोरण्यासाठी १०,००० पेक्षा जास्त कारागिरांची गरज लागेल. हे सर्व संपायला किती वर्ष लागतील ह्याचा अंदाज हि आज आपण लावू शकत नाही. हे सगळ करून कैलासाच्या तोडीस तोड मंदिर निर्माण करण आजही अशक्य गोष्ट आहे अस जगातील बऱ्याच संशोधक आणि वैद्नानिकांच मत आहे. कारण मानवाच्या इतिहासामध्ये आजवर कैलासा शिवाय कोणत्याच मंदीराच इतक्या प्रचंड मोठ्या दगडातून निर्माण झालेल नाही आहे.

कैलास मंदिर Kailas Temple

कैलास मंदिर हे ३० मिटर खोल, ३३ मिटर रुंद आणि ५० मिटर लांबीच्या दगडातून बनवलं गेल आहे. जगातील एकमेव अस मंदिर आहे कि जे कट आउट मोनोलिथ टेक्निक ने बांधल गेल आहे (हे टेक्निक इतर टेक्निक पेक्षा प्रचंड कठीण मानल गेल आहे). हि टेक्निक म्हणजे मंदिर मागून सुरवात करून पुढे पर्यंत बांधल गेल. कैलास मंदिरातील स्तंभाचा विचार केला तर हे स्तंभ तब्बल १०० फुट उंच असून ते वरून खाली असे बनवले आहेत. त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण खडक हा काढून तो आकार दिला गेला आहे. आर्किओलोजीस्ट च्या मते कैलास मंदिरातून तब्बल ४००,००० टन इतक्या वजनाचा दगड बाहेर काढला गेला आहे. ( 3,62,873,896 किलोग्राम ). मंदिर कधी बांधण्यात आल ह्याबद्दल शाश्वत अस सांगता येत नसल तरी साधारण ८ व्या शतकात (७५६-७७३) अवघ्या १७-१८ वर्षात बांधल गेल असावं असा अंदाज आहे. तस असेल तर मंदिरातून २२,००० टन दगड प्रती वर्षी म्हणजे गणित केल तर ५ टन दगड प्रत्येक तासाला काढण गरजेच आहे. जे कि आत्ताची लेटेस्ट अभियांत्रिकी मशीन वापरून पण अशक्य आहे. हे झाल नुसत दगड फोडण्याच ह्यात त्यातली कलाकुसर आणि इतर सगळ्याच गोष्टी विचारात घेतलेल्या नाही आहेत. कैलास मंदिर हे एकाच दगडातून बांधण्यात आल्याने त्याच वय सांगण अशक्य आहे. म्हणजे डोंगराच्या दगडाच जे वय असेल तेच मंदिराच्या दगडांच आहे. सह्याद्री चे डोंगर तर कित्येक लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आले पण मंदिर त्या नंतर आल. कदाचित काही शेकडो वर्ष तर कदाचित हजारो वर्ष. पण एक आहे कि हे मंदिर एकाच दगडातून बांधल गेल आहे आणि तितकच अदभूत आहे.

कैलास मंदिर Kailas Temple

कैलास मंदिरात त्याकाळी फक्त चिझल आणि हतोडीचा वापर करून बांधण्यात आल. आरश्यांचा वापर करून दिवसाला १८ तास काम केल गेल असेल असा अंदाज आहे. अनेक संशोधना वरून असे तर्क मांडण्यात आले आहेत कि कैलास मंदिराच्या खाली एखाद शहर अस्तित्वात त्याकाळी असण्याची शक्यता आहे. हे साधसुध मंदिर मुळीच नाही आहे. ह्यात अनेक भुयार आणि दगडात होल केलेले आहेत ज्याचा तळ लागत नाही. हि भुयार आणि होलाचा वापर खाली वसलेल्या वस्तीला हवेचा तसेच पाण्याचा पुरवठा करत असतील असा अनेक वैज्ञानिकांचा होरा आहे. कारण हे इतके छोटे आहेत कि त्यातून माणूस आतवर जाऊ शकत नाही. पण त्याचवेळी हे कशासाठी आणि त्याकाळी एकसंध दगडात कसे बनवले गेले असतील ह्याबद्दल आजही वैज्ञानिक काही सांगू शकत नाहीत. हे मंदिर बनवताना पायऱ्यांच आणि भूयारांच जाळ तयार केल आहे. जगातील सगळ्यात मोठा क्यान्टीलिवर रॉक सिलिंग ब्रिज आजही इकडे मोठ्या दिमाखात इतके वर्षानंतर उभा आहे. कोणतीही उपकरण नसताना ह्यातले सगळे खांब हे एका लाईन मध्ये तंतोतत बनवले गेले आहेत. ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग ची योजना केली आहे. अतिशय नजाकत, सौंदर्य, आणि अदभूत शक्तींनी वसलेल्या ह्या मंदिराच्या मजबुती बद्दल अस बोलल जाते कि १६८२ मध्ये औरंगजेबाने आपल्या हजारो सैनिकांना हे मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिला. तब्बल ३ वर्ष हजारो सैनिक मंदिर नष्ट करण्यासाठी झटत होते. पण नष्ट तर सोडाच पण काही शिल्पानपलीकडे मंदिराला कोणताही धक्का पोहचवू शकले नाहीत. शेवटी औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचा नाद सोडून दिला.

कैलास मंदिर Kailas Temple

कैलास मंदिर हे एलोरा च्या सगळ्या मंदिरात आणि लेण्यात सगळ जुन आणि सगळ्यात सुंदर आहे. जर हे सगळ्यात जुन असेल तर आजूबाजूला असलेल्या तीन धर्मांच प्रतिनिधित्व करणाऱ्या लेण्या किंवा तिकडली कलाकुसर अजून सुंदर असायला हवी. कारण येणारी पिढी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजून जास्त प्रगल्भ असते असा इतिहास सांगतो. पण कैलास मंदिराचा आकार आणि तेथील सौंदर्य ह्याच्या आसपास जाणारी शिल्पकला तिकडे कुठेच दिसत नाही. कैलास मंदिर हे एकमेव मंदिर आहे जे आकाशातून दिसून येते. आकाशातून बघताना ह्याचा ठिकाणी X सारख चिन्ह दिसून येते. अनेक लोकांच म्हणण आहे कि परग्रहावरून आलेल्या एलियन लोकांना ओळखण्यासाठी अशी रचना केली गेली असावी. कारण कैलास मंदिरात जे तंत्रज्ञान वापरल गेल आहे ते आजही मानवाच्या कल्पनाशक्ती पलीकडच आहे.

कैलास मंदिर Kailas Temple

ह्या अदभूत मंदिराच्या मध्ये जी शिल्पकला आहे त्या बद्दल वेगळ लिहेन. पण इकडे येऊन आपण आज त्या मंदिरा मध्ये आणि त्या शिल्पांवर चढून सेल्फी काढतो हाच आपला करंटेपणा. ज्याच्या रचनेने भल्या भल्या वैज्ञानिक, संशोधकांना विचारात टाकल. ज्याच्या भव्यतेची कल्पना आजही आपण करू शकत नाही. अस दुसर मंदिर बांधण तर सोडा पण आज जे आहे ते समजून घेण्याची मानसिकता आपली नाही. ह्याहून दुसरी शोकांतिका काय? शाळेतून आलेल्या कित्येक सहलीतील मुलांना एकही शिक्षकाने ह्यातली एकही गोष्ट सांगितली नसेल हे पैजेवर सांगू शकतो. कारण आपण फक्त आकार दिलेले दगड पुढल्या पिढीला दाखवतो कि हे आमच्या पूर्वजांनी बांधले. पण ते बांधताना त्यात जे विज्ञान होत किंवा त्यात जे तंत्रज्ञान वापरल गेल. ह्याबद्दल आमचीच पिढी अनभिज्ञ आहे तर आम्ही पुढल्या पिढी ला काय सांगणार? पुढल्या वेळी कैलास मंदिर बघयला जाल. तेव्हा त्याच रूप बघून एकदा विचार आपण करावा कि मला जर कोणी हे बांधायला सांगितल तर? जेव्हा ह्या तर ची उत्तर शोधू तेव्हा त्या शक्तीपुढे आपण आपसूक नतमस्तक होऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here