सरदार देवकाते घराण्याचा इतिहास भाग २
सुभेदार बळवंतराव देवकाते- संभाजीराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर स्वराज्यातील कित्येक सरदार वतनाच्या लालसेने मोघलांना मिळाले. अशा बिकट प्रसंगी संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीरास लावण्याचे काम सेनापतींच्या दिमतीला राहून देवकाते यांनी पार पाडले. जे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा सरदारांना राजाराम महाराजांनी इ. स.वी सन १६९० मध्ये वतने दिली. त्यात देवकाते घराण्याचाही समावेश आहे.
यात धर्मोजी बळवंतराव देवकाते यांना प्रांत कडेवळीत मधील ८ महालांचे सरपाटील हे वतन दिले. धर्मोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुञ सुभानजी यांना “बळवंतराव” तर मकाजी यांना “हटकरराव” असे किताब व सरंजाम देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने घोरपडे यांचे सेनापती पद काढून घेण्यात आले. व त्यांच्या दिमतीला असलेली स्वराज्याची फौज ही काढून घेण्यात आली.
ही घटना १६९६ साली घडली तेव्हा सेनापतींच्या दिमतीला असलेले मकाजी हटकरराव आपले भाऊबंद व फौजेसह जिंजी येथे राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्याच्या व नंतर साम्राज्याच्या अनेक महत्वपूर्ण लढायांत देवकाते सरदारांचे योगदान बहुमूल्य राहिले.
* सरदार देवकाते यांचा सरंजाम- शाहूने देवकाते यांना लष्करी खर्चासाठी एकूण १६ महाल व २१ गावे सरंजाम म्हणून दिली होती. हा सरंजाम बळवंतराव व हटकरराव यांच्यात ३:२ प्रमाणात विभागला गेला. पुढे दोघांच्याही सरंजामात वारसांच्या संख्येच्या प्रमाणात भाग होत गेले.
* बळवंतराव घराण्याच्या ३ तकसीम (भाग) सरंजामापैकी २ तकसीम चव्हाजी बळवंतराव बाळगून असत तो असा.-
प्रांत सुपे बारामती : ६ गावे
प्रांत कडेवळीत : ३९ गावे
प्रांत बालेघाट : अर्धा महाल
सरकार नांदेड: १महाल व ३ गावे
सरकार पाथरी : १ कसबा
सरकार माहूर : ६ महाल दीड कसबे व १ गाव
एकूण : साडे सात महाल अडिच कसबे व ४९ गावे.
सरंजामातील संबंधीत प्रांत,गाव व गावांवरील एकूण हक्काची सविस्तर माहितीही सरंजामपञात दिलेली असे. सरंजाम हा वंशपरंपरेने चालणारा अधिकार नसे. त्यामुळे त्या सरंजामात वारंवार बदल ही होत असत. अनेकदा सरंजाम जप्त अथवा कमी करण्यात येई. तसेच तो वेळप्रसंगी वाढविण्यातही येई.सरंजामातील काही गावे इनाम करून दिली असल्यास अशा गावांवरील संबंधित सरदारांचा अधिकार माञ वंशपरंपरेने चाले. देवकाते यांना बारामती येथील कन्हेरी,सोनगाव व निरावागज तर कडेवळीत मधील कोंढार चिंचोली,कवढणे व दिगसल अंब अशी ६ गावे शाहूने व पेशव्यांनी प्रांत गंगथडी मधील सेंदूरजने अशी ७ गावे वंशपरंपरेने इनाम होती.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे
संदर्भ: शाहू व पेशवा दफ्तर
सरदार देवकाते घराण्याचा इतिहास भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

