शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा

शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा

शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा –

३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर शिवरायांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर  रायगडावर महाराजांची समाधी बांधण्यात आली. संभाजी महाराजांच्या निधनानंतर ३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगड मोगलांच्या ताब्यात गेला व मोगलांकडून सिद्दीच्या ताब्यात आला. ५ जून १७३३ रोजी रायगड परत मराठ्यांच्या ताब्यात आला . रायगड ४३ वर्षे परकीय राजवटीत होता.  परंतु समाधीच्या  बांधकामाविषयी किंवा तिच्या देखभालीविषयीचे कोणतेही उल्लेख तत्कालीन  कागदपत्रे किंवा बखरीमध्ये आढळून येत नाहीत . शिवरायांच्या समाधीचा प्रथम उल्लेख येतो तो १८८३ साली.(शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा)

सन १८१८ साली रायगड इंग्रजयांच्या ताब्यात गेल्यानंतर  रायगड किल्ला आणि शिवसमाधी हि इंग्रज सरकारच्या जंगल खात्याच्या ताब्यात आली. जंगल खात्याच्या कायद्यानुसार झाडाची फांदी तोडायची किंवा एक फूट खोल खड्डा  खणायला परवानगी नव्हती.  रायगडावर त्यावेळी दोन चार धनगरांच्या पावसाळी वाड्यांनपेक्षा जास्त  वस्ती नव्हती . सर्वत्र निगडीचे जंगल माजले होते. १८१८ पासून १८८१ पर्यत  रायगडास कोणी भेट दिल्याची  नोंद आढळून येत नाही.

जेम्स डगल्स हा इंग्रज अधिकारी इ स १८८२ साली रायगडावर आला त्याने शिवसमाधीचा नक्षा करुन ठेवला. जेम्स डगल्सने  १८८३ साली  त्याच्या  “A BOOK OF BOMBAY “  या पुस्तकात  शिवसमाधीच्या दुरावस्थेबद्दल शिवरायांचे वंशज सातारा आणि कोल्हापूर गादि तसेच पुण्याचे पेशवे याना दोष दिला. तो  लिहितो, “No man now cares for Sivaji. Over all those wide domains, which once owned him lord and master, acquired by so much blood and treasure, and which he handed down with care to the Rajas of Kolapur, the Bhonslas of Satara and their Peshwas in Poona, not one man now contributes a Rupee to keep or repair the Tomb and temple of the founder of the Maratta Empire.”    जेम्स डगल्स त्याच्या पुस्तकात लिहितो “ कालपर्यंत एकाच इंग्लिश स्त्रीने रायगडचा प्रवास केला होता ’’ परंतु ती स्त्री कोण , ती कशासाठी आली होती हे मात्र स्पष्ट करत नाही.

३ एप्रिल  १८८५ साली गोविंदराव बाबाजी जोशी यांनी रायगडास भेट दिली व १ जून १८८५ साली “रायगड किल्याचे वर्णन ” नावाचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी समाधीच्या  दुरावस्ते बाबत लिहिले  . समाधीवर केर कचरा व झाडांचा पाला कुजून पडलेला  आढळला  . समाधीचे चिरे देखील कोणीतरी उखडून काढलेले आणि  त्याखाली पोकळीत माती मिश्रित रक्षा पडलेलली आढळली . श्री जोशी यांनी जनार्दन नावाच्या शिल्पज्ञ इंजिनिअरला रायगडावर पाठवून समाधीच्या दुरुस्तीसाठी आणि समाधीवरील छत्रीसाठी  ४५ हजार ४६ रुपये  अंदाजे  खर्च अपेक्षित असल्याचे मांडले . व मदतीसाठी सर्वांस पार्थना केली .

सन १८८५ साली मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल गडावर आले त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या एका इंग्रजी अधिकाऱ्याने  “our travels in poona and deccon “ या पुस्तकात रायगड भेटीचे वर्णन केले. त्यावेळी त्यांचा मार्गदर्शक कोणी ओंगळवाणा, वेडसर व्यक्ति होता. रायगड व शिवाजी महाराज्यांबद्दल अनेक असंबंध दंतकथा सांगत असे. त्यामुळे टेम्पल साहेबांनी चुकीच्या महितीमुळे एका चौथऱ्याचे चित्र देऊन ते शिवरायांचे दहन स्थळ असल्याचे लिहिले. टेम्पल साहेबांनी रायगडाची व समाधीची दुरावस्था पाहून कुलाब्याच्या कलेक्टरला तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या ह्या इतिहास प्रसीध्द स्थळाची दुरुस्ती ठेवण्याकडे तुम्ही का लक्ष पुरवले नाही असे पत्र पाठवून विचारले. टेम्पल साहेबांच्या या आदेशामुळे जंगल अधिकाऱ्याने मुंबई सरकारकडे समाधीच्या दुरुस्तीसाठी  पैश्याची मागणी केली.

इंग्रज अधिकारी लॉर्ड रे यांनी समाधीच्या जिर्णोधारचे काम सरकारतून व्हावे अशी शिफारस केली. त्या दरम्यान दरसाल ५ रुपयांची मंजूरी समधीच्या किरकोळ दुरुस्तीला मिळाली

इ. स. १८८५ साली न्यायमूर्ती रानडे व कोल्हापूरचे छत्रपती गादीचे रिजन्ट आबासाहेब घाटगे यांच्या पुढाकाराने पुणे येथे शिवसमाधी जिर्णोधारासाठी सभा झाली. आबासाहेब घाटगे यांनी रायगडावर मनुष्य पाठवून शिवसमाधीवरील छत्रीसाठी सुमारे २५००० खर्च असल्याचे अंदाज वर्तवला होता . परंतु १८८६ साली त्यांच्या मृत्यूमुळे समाधी जिर्णोधाराचे काम होऊ शकले नाही. शिवसमाधीच्या या चळवळीला चांगले स्वरूप येण्यासाठी १० वर्षाचा काळ जावा लागला

एप्रिल १८९५ साली लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाबाबत लेख लिहिण्यास सुरवात केली. ३० मे  १८९५ रोजी पुण्यात हिराबागेत सभा झाली त्यात स्मारकासाठी मदत करणे व कमिटी नेमणे असे ठराव समंत झाले टिळकांनी भाषणामध्ये “कोल्हापूरच्या महाराजांनी  मनावर घेतल्यास ते एकटेच  समाधीची दुरुस्ती करू शकतील पण सर्व दर्जाच्या व सर्व जातीच्या लोकांकडून वर्गणी गोळा करून त्याद्वारे समाधीचा जीर्णोद्धार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे” असे जाहीर केले. व कोल्हापूरच्या छत्रपतींकडे शिष्टमंडळ पाठवण्याचे ठरले. इतक्यात छत्रपतींकडून सहानभूतीचा संदेश आला. सयाजिराव महाराजांकडून यासाठी १००० रुपये रोख वर्गणी आली .

पुण्यातील रे मार्केटच्या मैदानात श्री. बाबू सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकासंबंधी सभा भरवली. त्यात रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले  ई. स. १८९६ रोजी शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी १६००० रुपय एवढी मोठी रक्कम जमा झाली.

शिवजयंतीच्या उत्सवाला कुलब्याचे कलेक्टर लॅब साहेब यांनी परवानगी नाकारली परंतु लोकमान्य टिळकांनी महाबळेश्वरचे गवर्नर यांना विनंती करून शिवजयंतीसाठी परवानगी मिळवली. १५ एप्रिल १८९६ रोजी पहिल्या शिवजयंतीचा उत्सव रायगडावर साजरा करण्यात आला. तानाजी  मालुसरे, येसाजी कंक अश्या वीरांच्या वंशजांना मानाचा नारळ देण्यात आला. पोवाडे गायले गेले. मध्यरात्री वाजत गाजत जगदीश्वराच्या देवळापासून छबिना काढण्यात आला.  इ.स. १८९७ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालून त्यांना १८ महिन्यांची शिक्षा झाली,त्यानंतर १९०६ मध्ये परत एकदा रायगडावर उत्सवाचे आयोजन करण्यात आले . त्यावेळी उत्सवाचे अध्यक्ष  असणाऱ्या  श्री. दाजी आबाजी खरे यांनी इंग्रज सरकारला पत्र पाठवून समाधीच्या जीर्णोधारासाठी परवानगी मागितली.

२ मे १९०७ रोजी सरकारी ठराव नं. ४४५४ नुसार इंग्रज सरकारने ५००० रुपय देण्याचे मान्य केले . इ.स. १९०८ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालून त्यांना ६ वर्षांची शिक्षा झाली. इ.स. १९११ रोजी श्री. खरे यांनी सरकारकडे चौकशी केली असता सरकार पैसे देण्यास तयार असून  नकाशे, अंदाजपत्रक व स्मारकाचे प्रत्यक्ष काम सरकारमार्फत झाले पाहिजे हि अट ठेवण्यात आली .  त्यामुळे लो. टिळक येईपर्यंत स्मारकाचे काम तहकूब ठेवले गेले. या दरम्यान स्मारक कमिटीकडे २५००० रुपय जमा झाले व ते पैसे डेक्कन बँकेत ठेवले गेले होते.  परंतु डेक्कन बँके बुडीत गेल्याने  सर्व सामन्यांचे पैसे बुडाले. टिळक तुरुंगातून सुटून आल्यानातर ते विलायतेस गेले व परत आल्यानंतर सन १९२० साली निधन पावले.

टिळकांच्या मृत्यू नंतर नानासाहेब देशमुख स्मारक कमिटीचे अध्यक्ष झाले. चार वर्ष सतत पत्रव्यवहार केल्यानंतर  सरकारी ठराव नं. ७०२३ ता. ०६/०२/१९२५ अनुसार समाधीच्या जीर्णोद्धाराची परवानगी मिळाली  अंदाजे खर्च १९००० रुपये ठरवला गेला त्यातील १२००० रुपय स्मारक समिती, ५००० रुपये  मुंबई सरकार व २००० रुपय पुराणवस्तू खाते यांनी द्यावे असे ठरले

मुंबईचे श्री. तात्यासाहेब सुळे यांनी शिवसामाधीच्या जीर्णोद्धाराचे शिवधनुष्य उचलले. समाधीचा पाया  खोदण्याचे काम चालू असताना साधारण सहा फूट खोदल्यानंतर राख व एका प्राण्याची कवटी मिळाली. तत्कालीन स्मारक कमिटीने हि कवटी कलकत्याला झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडे परीक्षणासाठी पाठवली .  या संस्थेने १२ जाने.१९२६ रोजी पाठविलेल्या त्यांच्या अहवालानुसार हि कवटी व हाडे उदमांजराची असून ती जळलेली नाहीत असे पत्र समितीस पाठविले . या उदमांजराचा मृत्यू शिवसमाधी जेव्हा दुर्लक्षित आणि भंगलेल्या स्तिथीत होती त्यावेळी घडून आला होता .

खोदण्याचे काम चालू असताना  १२ फूटावर पहार  अडली असता श्री. तात्यासाहेब सुळे  यांनी आसपासचा भाग मोकळा केला त्यांना दोन कमानीवर एक शिळा आणि आत पेटीसारखे काही आढळले . या पेट्यांनमध्ये शिवरायांच्या अस्थी आणि रक्षा जपून ठेवल्या होत्या. आजूबाजूला राखेचे ढिगारे पडलेले होते.  तात्यासाहेब सुळे  यांनी  अस्थी आणि रक्षा पुन्हा आत ठेवल्या . परंतु बाकीची राख ब्रिटीश सरकारने पेट्यातून भरून गडाखाली आणली परंतु त्या राखेचे पुढे काय झाले त्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही.

शिवरायांची रक्षा  त्यावेळेची हजर असणाऱ्या काही जणांनी शिवरायांची पवित्र स्मृती म्हणून आपल्याजवळ घेतली . महाडाचे गजानन वडके यांच्याकडे हि रक्षा पितळेच्या डबीत सुरक्षित ठेवलेली आहे.   गजानन वडके यांच्यामार्फत हि पवित्र रक्षा काहीजणांना मिळाली अश्या रीतीने हि पवित्र रक्षा महाड, कोल्हापूर , पुणे या ठिकाणी विखुरली गेली .

पुढील एक वर्षात १९२७ मध्ये समाधीचे बांधकाम पूर्ण झाले मूळच्या अष्टकोनी चौथऱ्यावर तश्याच अष्टकोनी छत्रीची उभारणी केली गेली . या छत्रीच्या गाभाऱ्यात शिवरायांची ब्राँझ धातूची प्रतिमा जगदीश्वराकडे तोंड करून बसवण्यात आली . अश्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला.(शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा)

संदर्भ :-
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकातून.
शिवछत्रपतींच्या समधीचा शोध व बोध :- इंद्रजीत सावंत

छायाचित्र साभार गुगल – शिवसामाधीच्या इतिहासाचा मागोवा.

श्री. नागेश सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here