महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,745

इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा… 

By Discover Maharashtra Views: 2448 4 Min Read

इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा…

गेल्या १,२ वर्षापासून इतिहासाचा सविस्तरपणे अभ्यास करताना अनेक गोष्टी निरीक्षणाअंती कळून आल्या. त्यानुसार हे मत आपणासमोर मांडतोय, सोशल मीडियावर हल्ली काही दिवसांपासून भावनिक फॉरवर्ड पोस्ट्स सातत्याने फॉरवर्ड होत असतात त्या अनुषंगाने खूप दिवसांपासून लेख लिहायचा होता,इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा…

दररोज व्हाट्सअप, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यावर अपलोड होणारे हजारो स्टेट्स. मुळात स्टेट्स टाकणं वाईट नाहीच ज्याची त्याची आवड असते. पण इतिहासाशी संबंधित काही गोष्टी असतील मग त्या स्टेट्सवर असो किंवा पोस्ट्स असो त्यामध्ये विकृतपणा, अतिरंजितपणा अधिक पसरवल्या जातो. ऐतिहासिक व्यक्ती, घटना, किंवा काही प्रसंग यांची योग्यरित्या सांगड घालत इतिहास सांगताना इतिहासकाराचा कस लागत असतो. इतिहासकारांनी त्यासाठी घेतलेले अपार कष्ट, त्या क्षेत्रासाठी वाहून घेतलेले जीवन, समकालीन संदर्भांची केलेली चाळाचाळ आणि या सगळ्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघाल्यावर एक ज्वलंत इतिहास आपल्यासमोर उभा राहतो, एका मोठ्या अग्निदिव्यातून उभा राहिलेला इतिहास विकृत होण्यासाठी काही क्षण सुद्धा पुरेसे असतात.

हा लेख खंडन करणारा नाही तर समाजात जी इतिहासाची विकृती पसरवल्या जाते आहे त्यावर जळजळीत प्रकाश टाकणारा आहे. वास्तव मांडणारा आहे. आजकाल लोकांना खरा इतिहास काय आहे आणि तो कुठून घ्यायचा हेच माहीत नाही. ज्या माध्यमातून तो त्यांच्या नजरेस पडेल त्यावर ते ठामपणे विश्वास ठेवतात. मग ते दूरचित्रवाणी वरील असो किंवा दंतकथा, कादंबऱ्या, फेसबुक, व्हाट्सअप्प फॉरवर्डेड पोस्ट इ. मुळात इंटरनेटवर सहजरित्या उपलब्ध असणारी माहिती हा खरा इतिहास असूच शकत नाही. अगदी काही बोटावर मोजण्याइतके माध्यम किंवा व्यक्ती असतील ज्या की ससंदर्भ अभ्यास करून खरा इतिहास मांडत आहेत.

इतिहास हा रुक्ष असतो, त्याला भावना नसतात. म्हणून इतर माध्यमातून रुक्ष इतिहासाला भावनेचा ओलावा देऊन, अतिशयोक्ती आणि अतिरंजितपणाचा साज देऊन त्याला रुचकर बनवल्या जातं. पण इथूनच त्याच्या विपर्यासाला सुरुवात होत जाते. सुरुवातीस रंजक वाटणाऱ्या माहितीला पुढे भावनेच्या भरात, नको असलेले प्रसंग आणि नायकाच्या तोंडी घातलेले प्रसंगाला अजिबात अनुरूप नसलेले संवाद घातले जातात तेव्हा इतिहासाची विकृती सुरू होते.

वाचकांना मग संदर्भ हे रटाळ वाटू लागतात, संदर्भांना योग्यरीत्या फाटेवर मारून खोट्याचं खरं केल्या जातं. मग जो तो आपला हेतू आणि सोयीसाठी कसाही इतिहास मांडतो कारण संदर्भ देणं त्यांच्यासाठी आवश्यक झालेलं नसतं. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून स्वतः च्या वैयक्तिक राजकीय किंवा इतर फायद्यासाठी इतिहासाची मोडतोड करून नसलेले प्रसंग इतिहासात घुसडवल्या जातात.

छत्रपती संभाजी महाराजांच्या आहाराविषयी कुठलीही नोंद उपलब्ध नसताना त्यांच्या भाकऱ्या मोजल्या जातात, शिवछत्रपती महाराजांना स्वतःच्या सोयीसाठी सेक्युलर दाखवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्या जातो, महाराजांचं राज्य निधर्मी दाखवण्याचा प्रयत्न केल्या जातो, कुणाला परमेश्वराने इतिहास सांगितलेला असतो, तर काही कम्युनिस्ट आणि पिवळे मीपणाची शेखी मिरवत महाराजांच्या हिंदुत्वाला तिलांजली देण्याचा प्रयत्न करून जातीयवादाला खतपाणी घालताना दिसून येतात.

गुढीपाडवा साजरा करा हे आम्हाला आमच्याच लोकांना ओरडून सांगावं लागतं, वाईट वाटतं तेव्हा जेव्हा आम्हाला राजा शिवछत्रपती महाराजांच्या निधनाविषयी लोकांना संदर्भ देऊनसुद्धा पटत नाही. खूप मुद्दे आहेत मांडण्यासारखे. लोकं एक वाक्य किंवा स्टेट्स टाकून इतिहास विकृत करून टाकतात आणि इतिहासकारांना ते मुद्दे खोडून काढण्यासाठी संदर्भांच रान तुडवून खंडनपर पुस्तकं लिहावी लागतात इतर महत्वपूर्ण विषय बाजूला ठेवून. हीच शोकांतिका आणि तळमळ होती म्हणून हा लेखनप्रपंच.

शेवटी एकच सांगावं वाटतं, मागे शिवछत्रपतींच्या निधनाची पोस्ट मी ब्लॉगवर लिहली तेव्हा अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला एवढे समकालीन संदर्भ देऊन सुद्धा, त्यावर एका सद्ग्रहस्थांनी मला एक सकारात्मक वाक्य सांगितलं म्हणाले, भाऊ दारूच्या जमान्यात दूध विकायला बसले तुम्ही, जिथे दारूच्या दुकानाबाहेर रांगा लागतात आणि आपलं दूध आपल्याला घरोघरी जाऊन विकावं लागतं पण आरोग्यासाठी हे दूधच चांगलं असून आपण ते कार्य शेवटपर्यंत चालू ठेवायचं.

लेखन : रोहित पेरे पाटील

Leave a comment