वारसा

वारसा

वारसा –

आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या अनेक ज्ञात अज्ञात पूर्वजांनी स्वतःच्या जीवनात अनेक संघर्ष केले, जीवांचे बलिदान केले आहे, त्या संघर्षावरच आजचे आपले अस्तित्व आधारित आहे. आपल्या सर्वांच्या पुर्वजांपैकी अगणित लोक अस्तित्वासाठी कोणत्या ना कोणत्यातरी  लढाईवर गेले, कित्येक परत आले, कित्येक परत आलेच नाहीत, कित्येकांच्या नोंदीच नाहीत, झालेल्या नोंदी कागदपत्रांवरील आक्रमणात नष्ट झाल्या, काही पूर्वजांना वीरगळ किंवा समाधीस्थळाचे भाग्य मिळाले तर अगणित पुर्वजांना तेही भाग्य नाही मिळाले, आपण जेथे चालतो वावरतो फिरतो जगतो अशा अनेक ठिकाणी आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी अनेक संघर्ष केले आहेत. आपल्या पायाखालील भुमी या सर्व ज्ञात अज्ञात संघर्षाची साक्षीदार आहे, पण ती मुक आहे, ती सर्व काही बोलु शकत नाही, आज रोजी आपण जेवढे काही जाणतो त्यापेक्षाही कितीतरी जास्त आपण जाणत नाही. आपल्या पायाखालील मातीचा कण आणि कण आपल्या पूर्वजांच्या रक्तानें वारसा पवित्र झालेला आहे.

जगात मराठा/मराठी हाच एकमेव असा माणूस आहे कि ज्याच्या पूर्वजांनी सतत संघर्ष केलेला आहे. आजचा प्रत्येक मराठा/मराठी माणूस ऐतिहासिक संघर्षाचा वारस आहे, किंबहुना जगाच्या इतिहासात मराठी/मराठा माणसाएवढा संघर्ष आणि लढ्याचा इतिहास इतर कोणाकडेही नाही. या संघर्षाच्या खुणा जपणे आपले कर्तव्यच आहे.

म्हणून आपल्या परिसरातील गावातील गावाजवळील ऐतिहासिक वास्तू, वाडे, गढी, वीरगळ, बारव, किल्ले, गड, मंदिरे, समाधीस्थळे इत्यादीची आपण जपणूक केली पाहिजे. हे आपले सामूहिक कर्तव्यच आहे. हा वारसा ठेवा म्हणजे आपल्या सर्वांचे अस्तित्व आहे. हे जसे आहे तसे किंवा संवर्धन करून ते पुढील प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचेल हे पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक ठेवा आपल्याला आणि आपल्या भावी पिढीला स्फूर्तिदायक असा असेल.

म्हणून मी आपण सर्वांना विनंती आवाहन करत आहे कि आपल्या गावातील नगरातील शहरातील/ जवळील ऐतिहासिक वास्तू, वाडे, गढी, वीरगळ, बारव, किल्ले, गड, मंदिरे, समाधीस्थळे यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करावेत आणि —

(१) या वास्तू किमान आहे त्या अवस्थेत तरी पुढे राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

(२) किमान आहे त्या अवस्थेत  त्या वास्तुंची स्वच्छता ठेवावी.

(३) शासकीय नकाशे, शासकीय कागदपत्रे, पुरातत्त्व खाते यामध्ये      नोंद असेल याची खात्री करून घ्यावी.

(४) गुगल मॅप व इतर नकाशे ॲपवर या वास्तुंची दखल घेतली जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

(५) या वास्तुंची निर्मिती, यांच्या संदर्भात घडलेल्या घटना यांची माहिती शोधून तशी माहिती दाखवेल असा साजेसा फलक तयार करून तेथे योग्य जागेवर लावावा.

(६) या वास्तुंच्या संदर्भातील महत्वाच्या घटना शोधून माहिती घेउन   उपलब्ध तिथीनुसार अथवा तारखेनुसार त्यास साजेसे असे कार्यक्रम तेथे साजरे करावेत..

(७) संबंधित ठिकाणाची माहिती असलेला इतिहास आपल्या पुढील पिढीला सांगण्याची पध्दत निर्माण करून ती रुजवावी.

मोकदम पाटिल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here