हबशी महल

By Discover Maharashtra Views: 3684 5 Min Read

हबशी महल – हापुसबाग, जुन्नर
(असंख्य पर्यटकांपासून वंचित इतिहास जुन्नरचा)

जुन्नर प्राचीन ऐतिहासिक कालखंडात जुन्नर हे राजधानीचे केंद्र होते. सातवाहनांचे राजकीय प्रतिस्पर्धी शकक्षत्रप यांची राजधानी होती. टॉमेली या प्रसिद्द ग्रीक लेखकाने जुन्नरला ओमनगर म्हटले असून नंबनस म्हणजे ‘नहपान’ हे आता सिद्ध झाले आहे. अशा या जुन्नर शहराच्या पुर्वेकडे अगदीच दोन कि.मी अंतरावर असलेल्या हापुसबाग गावाच्या उत्तरेस असलेली ही देदीप्यमान वास्तू जवळपास 400 वर्ष ऊन, वारा, पावसाच्या नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही हा हबशी महल तेवढ्याच दिमाखात उभा असलेला पहावयास मिळतो. साधारणतः 60×150 फुट चौकोनाकृती ही वास्तू कोरीव शिळेतील व चुन्याच्या नक्षिदार बांधकामात तयार केलेली आहे . ही वास्तू, वास्तू शास्त्राचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. या वास्तूच्या चारही बाजूंनी संरक्षणासाठी मोठमोठ्या भिंती होत्या आज त्या जमीन दोस्त जरी झाल्या असल्यातरी चार बाजुच्या चार दरवाजांचे पुरावे पहावयास मिळतात. चारही बाजूंनी असलेली 200 वर्षाच्या आसपास असलेली मोठमोठी चिंचेची झाडे येथील इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करतात.

हबशी महल

महलाच्या दक्षिणेस असलेली साधारणतः 30×30 फुटाची चौरसाकृती टाकी व तीचे बांधकाम येथील इतिहास हा वेगळाच असल्याचे संकेत दर्शवीत आहेत.महलाची रचना तीन टप्प्यात केलेली असून त्यामध्ये आपण उत्तरेकडून प्रवेश करतो. प्रथम आपण मध्य दालनात प्रवेश करून मग पुर्व व पश्चिम दालनात प्रवेश करतो. आतुन तिनही दालने अनेक पद्धतीने चुन्याच्या बांधकाम लेपाने सजवलेली आहेत. पुर्व व पश्चिम दालनाच्या दक्षिणेकडून दोन साधारण दगडी बांधकामातील 25 पायर्‍या चढून वर छताकडे जाण्याचे मार्ग दर्शविलेले आहेत व या इमारतीस उत्तम प्रकारे दुमजली बनविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वरील दुमजला व त्यातील खोल्यांचे दरवाजे अतिशय नक्षिदार कोरलेल्या लाकडाच्या चौकटीत केलेले असुन ते आपण किती वेळा न्याहाळून पहाव अस वाटत.

सध्याच्या घडीला या वास्तूचे अनेक ठिकाणी परीवर्तन केलेले असून त्याचे मुळ रूपाचे विदृपीकरण झालेले पहावयास मिळते. या पाठीमागचे काय कारण असावे हे निश्चित माहित नाही. सध्या हे स्थान मालकीचे सांगितले जात आहे. जरीही हे स्थान मालकीचे असले तरी तो एक इतिहासाचा ठेवा म्हणुन नक्कीच जपला जायला हवा अस मला वाटत. कारण याचा इतिहास असा सांगितला जातो कि, सन 1490 च्या कालखंडात बहामनी सुलतानाचा सरदार मलिक अहमद याने जुन्नर परिसरात निजामशाहिची स्थापना केली होती. त्यानंतर वाढत्या साम्राज्याला सोयीस्कर अशा राजधानीसाठी पुढे निजामशाहिची राजधानी नगरला नेण्यात आली. हीच ती इतिहास प्रसिद्ध निजामशाही. निजामशाहितील मातब्बर सरदार शहाजीराजे यांच्याशी अंतर्गत वर्चस्वातून शत्रुत्व पत्करणार्या निजामशहाचा वजीर मलिकांबर याचा संबंध सौदागर मुंबज व हबशी महल या वास्तूशी असल्याचे सांगीतले जाते.

हबशी महल

निजामशाहाचा वजीर असलेल्या मलिकांबर हा आफ्रिकेतून भारतात आला होता. तत्कालीन जुन्नर शहरापासून जवळ असलेल्या हबशीबागेत (सध्याचे हापुसबाग ) त्याचे वास्तव्य याच हबशी महलात होते. जुन्नर शहरात त्याने आदर्श अशी मलिकांबर पाणीपुरवठा योजना त्या काळात राबविली होती. त्याचे अवशेष आजही जुन्नर शहरात पहावयास मिळतात. गृहकलहामुळे पित्याविरूध्द बंड करणार्‍या दिल्लीचा शहजादा शाहजान पत्नी मुमताज आणि दोन वर्षाचा औरंगजेब यांच्यासह याच महलात मलिकांबराकडे आश्रयार्थी म्हणुन आल्याचा, राहिल्याचा इतिहास सांगतो.

या राजवाड्याच्या तळ मजल्याची बांधकाम शैली हि मुघल पद्धतीची आहे व पहिल्या मजल्याचे दरवाजे हे पेशवे कालीन बांधकाम शैलीचा नमुना आहे। हबशी घुमब्ज आणि हा महाल यांच्या मध्ये अजूनही काही बांधकाम असण्याची शक्यता आहे। हापूस बाग मधील हा महाल मुघल आणि निजाम शाहितील स्त्रियांच्या जलक्रीडेची जागा म्हणून वापरात होता। मुळचा दक्षिण आफ्रिकेतील हबसाना प्रांतातील गुलाम पण जलतज्ञ असा मलिक अंबर या महालाचा करविता। त्या काळी जेव्हा या राज स्त्रीया जलक्रीडेसाठी इथे उतरायच्या तेव्हा कुठल्याही पुरुषाने पंचक्रोशीत उभे राहू नये म्हणून वाद्य वाजविले जायचे। शिवाजी महाराजांच्या जन्मा आधी 10-12 वर्ष 2-3 वर्षाचा औरंगजेब इथे 2 वर्ष राहिला होता। जुन्नरच्या या मातीने या लहानग्या औरंगजेबाचे पाय जोखले म्हणूनच नियतीने याच मातीत शिवाजी महाराजांना जन्माला घातले.

हबशी महल

अशा या वास्तूचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून पहायला व जपायला हवे अस मला वाटत.
या वास्तूच्या बाबत मी एक 74 वर्षे वय असलेल्या वृद्ध श्री. सिताराम बोर्हाडे यांच्याशी विचारणा केली तर त्यांनी सांगितले की मी ती वास्तू पासष्ट वर्षे झाली तेव्हा पाहीली होती. आज काहीच आठवत नाही. परंतु खुप सुंदर व सुरेख कलाकुसर केली आहे.
मित्रांनो जर आपणास थोडा वेळ असेल तर ही वास्तू पाहण्याची संधी सोडू नका. कदाचीत जुन्नर मध्ये राहून आपण ही कलाकृती जर पाहीली नाहीत तर निश्चितच आपण एका चांगल्या इतिहास पाहण्यास मुकलात असच म्हणाव लागेल . जुन्नर मधुन अगदीच दहा मिनिटांत आपण येथे दुचाकीवरून सहज पोहचु शकता. परंतु येथे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये हीच सदिच्छा व्यक्त करतो.

 

लेखक / छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश, वनरक्षक
( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका
Leave a comment