मस्तानीबाईसाहेब यांची समाधी (कबर)

मस्तानीबाईसाहेब यांची समाधी (कबर)

मस्तानीबाईसाहेब यांची समाधी (कबर) पाबळ, पुणे…

पुणे शिरूर रस्त्यावर शिरूरपासून पाबळ या गावी जाणारा फाटा फुटतो. पाबळ गावी जाण्यासाठी पुण्याहून एस.टी सेवा उपलब्ध आहे. पुणे शिरूर रस्त्यावर असलेले ‘पाबळ’ हे गाव जरी इतर चार गावांप्रमाणे दिसणारं असलं तरी ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचं आहे. ‘बाजीराव पेशव्यांची’ द्वितीय पत्नी असलेल्या मस्तानीबाईसाहेब यांची समाधी या गावात आहे.

थोडेसे इतिहासात डोकावून पहिले तर बुंदेलखंडचा राजा ‘छत्रसाल बुंदेला’ यांच्यासारखा पराक्रमी पिता आणि ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ यांच्यासारखा महापराक्रमी जोडीदार लाभूनही आयुष्यभर उपेक्षिता अनुभवलेली लावण्यसुंदर ‘मस्तानी’ पाबळ या गावी आजही चिरनिद्रा घेत आहे आणि उपेक्षिता अनुभवत आहे. मस्तानीचा अंत केव्हा आणि कसा झाला याबाबत इतिहास आजही मुका आहे.

बाजीरावांच्या आयुष्यात १५ ते १७ वर्ष वय असलेली मस्तानी आली आणि वयाच्या उमेदीत अवघ्या ४० व्या वर्षी महापराक्रमी बाजीरावांचे निधन झाले. त्याच्यानंतर इ.स. १७४० साली मस्तानीने आपला देह ठेवला. मस्तानीला रहाण्यासाठी पाबळ येथे एक चौबुरुजी बळकट गढी ‘पाबळ’ या गावी बांधण्यात आली होती. अत्यंत सुंदर असलेली हि गढी आजही बघण्यासारखी आहे. या गढीच्या आवारातच लावण्यवती मस्तानीची  समाधी आहे.

मस्तानीची समाधी ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी समाधीच्या रस्त्याकडे असणाऱ्या बाजूने तीन दरवाजे आपल्याला पहायला मिळतात. त्यामध्ये उजव्या आणि आणि डाव्या बाजूस देखील आपल्याला दरवाजे दिसतात. मस्तानीच्या समाधीच्या चारही बाजूंच्या भिंती या घडीव चिऱ्यांच्या असून बाहेरच्या बाजूंनी फरसबंदी असलेला रस्ता आपल्याला पहायला मिळतो. तीन दरवाज्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस नमाज पढण्यासाठी आपल्याला एक बंदिस्त वास्तू नजरेस पडते तिच्या तीनही भिंतींना सुरेख कलाकुसर केलेल्या नक्षीदार कमानी आपल्याला पहायला मिळतात.

नमाज पढण्यासाठी बांधलेल्या वास्तूला वरच्या बाजूला जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून त्याच्यावर चिरे पहायला मिळतात.  त्याच्यावर पूर्वी नक्षीदार लाकडी खांब असावेत अशी शक्यता नाकारता येत् नाही.  पायऱ्या चढून जाताना डाव्या आणि उजव्या बाजूला लाकडांचे सुरेख खांब वरच्या बाजूस  नक्षीदार कमानींनी जोडलेले आजही आपले लक्ष वेधून घेतात. संपूर्ण बंदिस्त वास्तूवर जवळपास २ ते २.५ फुट उंचीची सुंदर नक्षीदार कमान देखील आपल्याला पहायला मिळते.  गावकऱ्यांनी थोडीशी या ऐतिहासिक वारश्याची डागडुजी केलेली आपल्याला बघायला मिळते. अशी हि उपेक्षित मस्तानीची समाधी आणि गढी आजही बघण्यासारखी आहे. ‘श्रीमंत मस्तानीबाईसाहेब यांची  समाधी बघायची असेल तर पाबळ गावाला नक्की भेट द्यावी.

माहिती साभार – ऐतिहासिक वाडे व गढी फेसबुक ग्रुप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here