गिरवी येथील गोपाळकृष्ण –
आमच्या तळजाई भ्रमंती मधील मित्र मंडळींनी फलटण जवळील गिरवी या गावी असलेल्या श्री गोपाळकृष्ण मंदिर दर्शनाचा घाट घातला आणि आम्ही पंधरा जण या दर्शनासाठी रवाना झालो. फलटणपासून जवळच असलेल्या या छोट्या गावात एक सुंदर साधारण सहाशे वर्ष जुने श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराचे विशेष म्हणजे इथे असलेली एका मोठ्या शाळीग्राम दगडातून साकारलेली चार साडेचार फूट उंचीची नितांत सुंदर गोपाळकृष्णाची मूर्ती.
गिरवी गावात रस्त्याच्या बाजूस थोडेसे आत एक सुंदर वृक्ष नजरेस पडतो आणि त्याशेजारी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असून त्यासमोरच एक छोटेखानी मंदिर आहे. या छोट्या मंदिरात पहिले तर आपणास आश्चर्य वाटते की श्रीकृष्ण मंदिरासमोर हा नंदी विराजमान असलेला नंदीमंडप कसा. नंदी शिल्पाच्या मागे श्री हनुमान (राम) आणि गरुड (विष्णू) या मूर्तीसुद्धा विराजमान आहेत. तर या नंदी बद्दलची आपली जिज्ञासा मूर्ती पाहिली की पुरी होते. येथील दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो आणि महाराष्ट्रीयन शैलीतील इतर मंदिराप्रमाणे दोन्ही बाजूस ओसरी असलेला दरवाजा ओलांडून आपण प्रशस्त प्रांगण आणि मंदिराभोवती असलेल्या सुंदर दगडी प्रदक्षिणा मार्ग येथे प्रवेश करतो. समोरच असलेल्या दगडी मंदिर आणि प्रशस्त सभामंडप. समोर दोन तीन पायऱ्या चढून गेले की सुंदर देव्हारा. आत एका शाळीग्रामातून घडविलेली नितांत मनोहर गोपाल कृष्ण. सुंदर आणि रेखीव देहबोली, दोन्हीबाजुस तन्मयतेने बासरी वादन ऐकणाऱ्या दोन धेनु. हातांची मुद्रा अशी की हातात बासरी ठेवली की त्यातून कधीही सूर उमटतील इतके सुंदर शिल्प. मूर्तीच्या पायाशी असलेल्या चार व्यक्ती म्हणजे जय विजय आणि दोन मूर्तिकार.
सर्वात महत्वाचे म्हणजे गोपाळकृष्ण हे शिवपिंडीच्या साळुंखे वर विराजमान आहेत. अशा रीतीने ही मूर्ती हरिहर प्रतिकच आहे आणि यामुळेच समोरील छोट्या मंदिरात गरुड आणि नंदी दोन्हीही विराजमान आहेत. या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन आपण मंदिरास प्रदक्षिणा घालताना बाजूस आपण ओसरी पहातो आणि मंदिराच्या मागच्या बाजूस तळघरात जाणारा छोटासा दरवाजा दृष्टीस पडतो. दाराशेजारी सुंदर हनुमान मूर्ती भिंतीवर कोरलेली दिसते. दरवाज्यातून काही पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या गर्भगृहाखाली पोहोचतो जेथे बाबुराव महाराज यांची समाधी आणि छायाचित्र याचे दर्शन होते. समोरच एक शिवलिंग स्थापित केलेले आहे.
तेथून बाहेर आल्यावर उजव्याबाजूस एका कमानीतून आपण मंदिराच्या दुसऱ्या नूतन भागात पोहोचतो जेथे एक छोटे सुंदर गणेश मंदिर असून अंबाबाई आणि अजून एक बहुतेक म्हसोबा अश्या दोन मूर्ती आहेत. समोरच एका चौथऱ्यावर शिवलिंग आणि चरण पादुका असलेली समाधी आहे. बाजूस ओसरी आहे.
थोडासा इतिहास –
संतश्रेष्ठ श्री बाबुराव महाराज देशपांडे यांना झालेल्या दृष्टांताने त्यांना एक प्रचंड शाळीग्राम शिळा मिळाली त्यातून सुंदर आणि मनोहर गोपाळकृष्ण मूर्ती बनविण्याचा त्यांचा मानस होता. त्याप्रमाणे त्यांनी मूर्तिकार शोधण्याचा प्रयत्न केला. कोणीही मूर्तिकार या कामास तयार होत नव्हता आणि एके दिवशी दोन अनोळखी व्यक्ती महाराजांना भेटून आपण मूर्ती घडवून देतो असा आग्रह धरला. विशेष म्हणजे या दोन व्यक्ती पैकी एक अंध तर दुसरी थोटी म्हणजे हात नसलेली होती. जरा नाखुशीनेच महाराजांनी त्यांना मूर्ती घडविण्याची परवानगी दिली. त्यावर त्यांनी मूर्ती बनविताना त्यांना एकांत हवा आणि कोणीही तेथे येऊ नये अशी अट घातली. मनासारखी मूर्ती पूर्ण झाल्यावर त्यांनी मागील बाजूस असलेल्या विहिरीवर स्नान करून येतो आणि मग भोजन करतो असे सांगून ते विहिरीवर गेले. काही वेळातच ते विहिरीवरच अंतर्धान पावले. असे म्हणतात की ही मूर्ती श्रीकृष्णांनी स्वतः आंधळा आणि थोटा अशा रूपात येऊन घडवली आहे आणि म्हणूनच ही मूर्ती फारच मनोहर आणि सुंदर आहे.
मंदिराच्या मागील बाजूस दोन प्रचंड चिंचेच्या झाडाखाली सुंदर चौकोनी खाली उतरण्याच्या पायऱ्या असलेली पूर्ण दगडी बांधकाम केलेली विहीर आहे. या विहिरीवरच दोन्ही शिल्पकार अंतर्धान पावले होते. आता त्याजागी एक समाधी बांधली आहे. या समाधीचे दर्शन घेऊन आपण या मंदिर आणि परिसराचे दर्शन पूर्ण करतो.
सुकुमार शहा
फोन 9822192294
मेल – sukumarshah221@gmail.com
