महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

घेवडेश्वर, महुडे ता.भोर

By Discover Maharashtra Views: 1205 4 Min Read

घेवडेश्वर, महुडे ता.भोर –

भोर तालुका पुणे जिल्ह्यातील एक तालुका असून,  सातारा व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आहे. कोकण व देश याला जोडणा-या या तालुक्याला सह्याद्रीच्या महादेव डोंगररांगांचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. भोरच्या पश्चिमेस असलेल्या महुडे खो-यातील भानुसदरा हे दळणवळणाची सोय असलेले शेवटचे गाव आहे. वेळवंड खोरे व महुडे खोरे याची विभागणी करणारी एक महादेव डोंगररांग पूर्व – पश्चिम असून ती महुडे येथे दक्षिण उत्तर असलेल्या डोंगरास संलग्न होते.घेवडेश्वर.

जिथे दोन डोंगर एकमेकांशी एकरुप होतात, तिथे घेवडेश्वराच्या शंभूमहादेवाचे प्राचीन पूर्वाभिमुखी शुष्कसांध्यातील मंदिर आहे. घेवडेश्वर मु-हा येथे चारपाच घरांची लोकवस्ती देखील आहे. दि.१९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी भोर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेचे विद्यमान सभापती व आमच्या भटकंती समुहाचे आनंद गोसावी ह्यांचेशी चलभाषवर संवाद झाला. आज तालुक्यातील घेवडेश्वर येथे जाण्याचे नियोजन सुरू झाले. दुपारी १२:३० वाजता मी, आनंद गोसावी, बाळासाहेब गायकवाड व सुरेशराव कंक हे दुचाकीवरुन घेवडेश्वरच्या दिशेने निघालो. बाजीप्रभूंचे शिंद, नांद, ब्राम्हणघर मार्गे महुडे येथे पोहोचलो. याच गावच्या मावळतीला थोड्याच अंतरावर असलेल्या डोंगरातून जाणारा कच्चा घाटरस्ता सुरू होतो. निसरड्या रस्त्याने सुमारे दोन किलोमीटर अंतर चढून गेल्यावर एक प्राथमिक शाळेची इमारत लागते. येथेच दुचाकीची साथ संपते म्हणून त्यांना तिथेच उभ्या करून डोंगराच्या सरळ दांडाने पायी प्रवास सुरू होतो. विद्युत पुरवठा करण्यासाठी विद्युत वाहक तारांचे लोखंडी खांब ज्या दिशेने घेवडेश्वरला जातात, त्याबरोबरच खडी चढणीची मळलेली पायवाट आहे.

दोन्हीबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या द-या तर कारवी वनस्पतींच्या मधून जाणारी पायवाट. समोरचा डोंगर अंगावर येत असताना, शक्यतो खाली पाहतच रस्ता चढावा लागतो कारण सह्याद्रीचे विराटरुप पाहून मानसिक दडपण येण्याची शक्यता असते. दुपारी तीन वाजता हातातील जेवणाची पिशवी सहीत घेवडेश्वर पठारावर पोहोचलो.पठारावर स्थानिक धनगर समाजाच्या लोकांची गवत कापणी सुरु होती,तर काही अंतरावर दिसणाऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी आमची पावले वेगाने पडू लागली. वाटेत सातआठ वर्षाचा ‘दाद्या’ नावाचा मुलगा भेटला. तो तेथील रहिवासी असल्याने तोही आमच्या बरोबर मंदिराकडे निघाला. घेववडेश्वर मंदिर परिसरास चोहोबाजूस पडझड झालेली दगडी पवळी आहे.

मंदिरासमोर नंदी शिल्प असून ऊन, वारा व पाऊस यांचा परिणाम त्याचेवर झालेला जाणवतो. मंदिर सभामंडप प्रवेशाद्वार लहान असल्याने नम्रपणे आत प्रवेश करावा लागतो. सभामंडपातील समोरच्या भिंतीच्या तीन कोणाड्यात तीन मूर्ती असल्याचे दिसून येते. या तीनही मूर्तींची बरीच झीज झाल्याने नीटपणे दिसत नाही. मात्र यातील दोन मूर्ती पार्वती नंदन गणपति आहेत.सभामंडपातून गर्भगृहात जाणेसाठी पहिल्या दरवाजाच्यापेक्षा लहान दरवाजा आहे.गर्भगृह हे सभामंडपाच्या समतल असून शिवपिंडीची पन्हळी उत्तरेकडे आहे. मनोभावे घेवडेश्वर दर्शनाने मन प्रसन्न होते.

मंदिरासमोरील नंदी मूर्तीच्या पाठीमागे दगडी दीपमाळ म्हणजे सुमारे सहा फूट उंचीचे एकावर एक दगडीशिळा रचलेल्या आहेत. समोरील बाजूस भोरपर्यतचा परिसर दृष्टीस पडतो तर पाठीमागे असणारा घेवडेश्वरचा उर्वरित डोंगर आहे.मंदिराच्या उजव्या बाजूला काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे गोलाकार टाके असून येथील तीनचार घरातील लोक पाण्याचा दैनंदिन वापर करीत असावे. आम्ही सर्वजण हे पाणी टाके व समोरील बाजूला असलेली दरी पाहून परत मंदिराच्या पाठीमागील झाडीत असलेल्या भव्य उंबराच्या झाडाखाली वनभोजनास बसलो.

इथपर्यंत तो सुरवातीला भेटलेला दाद्या होताच. आमच्या पंगती दाद्या व त्याची आठदहा वर्षाची मेव्हणी देखील होती. दाद्या हा नावाप्रमाणे बोलण्यात ही दादाच होता. काहीसा आक्रमक व ठाम विचारांचा हा पोरगा निर्भिड होता. शांत, निवांत अशा सह्याद्रीच्या शिखरावर असलेल्या घेवडेश्वर दर्शनाने नवीन उर्जा मिळाळी. येथील स्थानिक हे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असल्याने मुलभूत गरजाही दुर्मिळ असाव्यात असे वाटते. जेमतेम भात शेती, गायीगुरे, कोंबडी इत्यादींचे पालन करून निसर्गाच्या सानिध्यात राहणारी कुटुंबे एकवीसाव्या शतकातील हिंदुस्थानातील नागरिक कधी होणार ?

© सुरेश नारायण शिंदे, भोर

Leave a comment