महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

प्रथम दगडूशेठ गणपती

By Discover Maharashtra Views: 1211 3 Min Read

प्रथम दगडूशेठ गणपती –

२४५, शुक्रवार पेठ, परांजपे वाडा, हा मध्य वस्तीतला रहदारीचा भाग. हा भाग पूर्वी काळे वावर म्हणून ओळखला जात होता. सदर ठिकाणीपेशवाईतील अखेरचे सेनापती सरदार बापू गोखले यांनी वाडा बांधला. आज बापू गोखलेंचा वाडा शिल्लक नाही. परंतु त्यांनी बांधलेले राममंदिर अजूनही दिमाखात आहे. आज हे मंदिर परांजपे राम मंदिर म्हणून ओळखले जाते.

हे मंदिर सुमारे २०० वर्ष जुने आहे. या मंदिराच्या बांधकामाला बापू गोखलेंनी सुरूवात केली होती, पण इ.स. १८१८ सालच्या फेब्रुवारी महिन्यातइंग्रजांविरुद्धच्या आष्टीच्या लढाईत बापू गोखलेंना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या नंतर या मंदिराचे काम त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांनी पूर्णत्वासनेले. यमुनाबाईंनी मिरज प्रांतातील करोली हे गाव व पुण्यातील बाग मंदिराच्या खर्चास लावून दिली होती. सदर मंदिर सुमारे अर्धा एकर परिसरातअसून इ.स. १८२४ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. मंदिराला भव्य सभामंडप असून तो लाकडी नक्षीदार कमानींनी सुशोभित आहे. सभामंडपाच्या एका बाजूला श्री रामांच्या समोर दास मारुतीची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. सभामंडपासमोर अंदाजे १०x १० फुटाचा दगडी गाभारा आज असून,त्याला लाकडी जाळी बसवलेली आहे. गाभाऱ्यात नक्षीदार दगडी चौथऱ्यावर श्रीराम,लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. सदर मूर्ती  पश्चिमाभिमुख आहेत. चौथऱ्याच्या चारही बाजूंना नक्षीदार लाकडी खांब असून, त्यावर सुंदर लाकडी छत्र आहे. श्रीरामाच्या मूर्तीची उंची अंदाजे दोनते अडीच फूट असून, सीता व लक्ष्मणाची उंची अंदाजे दीड फूट आहे. गाभाऱ्यात काचेची हंड्या झुंबरे छताला टांगलेली आहेत. या राम मंदिरासमोर एक अकरा मारुतींचे पुरातन मंदिर आहे.

या परांजपे राम मंदिरामध्ये प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पहिली मूर्ती ठेवण्यात आली आहे. सदर मूर्ती दगडूशेठहलवाई यांनी इ.स. १८९३ साली तत्कालीन मूर्तिकार बाबुराव नाईक यांच्याकडून बनवून घेतली. गुळाची ढेप, कागदाचा लगदा व रांध्यापासून तयारकेलेल्या या गणेशमूर्तीचे पूजन इ.स. १९०१ पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवात होत होते. सदर मूर्ती घडवण्यासाठी २२ रुपये बिदागी दिली होती. यामूर्तीच्या पोटात विधिवत गणेश यंत्र बसविण्यात आले आहे.

 इ.स. १९०२ मध्ये पहिली मूर्ती बदलण्याचा निर्णय झाला. दुसरी मूर्ती इ.स. १९८४ मध्ये कोंढवा येथील बालसंगोपन केंद्राकडे सुपूर्द केली. तर इ.स. १९६७ मध्ये तिसरी मूर्ती तयार करण्यात आली. ही तिसरी मूर्ती सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात पाहायला मिळते. परांजपे राम मंदिरामध्ये असलेल्या प्रथम दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची नित्य नेमाने पूजा केली जाते.

संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पुणे वर्णन – ना. वि. जोशी
पुणे शहराचा ज्ञानकोश – डॉ. शां. ग. महाजन
फोटो : जीमित शाह

पत्ता :https://maps.app.goo.gl/hSBWNctQegE74Uhh8

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment