महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,337

गरुडाचे घरटे तोरणा!

By Discover Maharashtra Views: 1435 11 Min Read

गरुडाचे घरटे तोरणा!

पुणे-बंगलोर महामार्गावरील पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून पश्चिमेला कानद खोऱ्यात एक वाट जाते. या वाटेवरचे शेवटचे मोठे गाव वेल्हे! या वेल्हय़ाच्याच डोक्यावर एका उंच जागी बसला आहे, शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार गरुडाचे घरटे तोरणा! ऊर्फ प्रचंडगड!

पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर. स्वारगेटहून वेल्हय़ासाठी थेट एस. टी. बससेवा आहे. स्वत:चे वाहन असेल तर आता पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे घाटमार्गेही वेल्हय़ाला जवळच्या रस्त्याने जाता येते. वेल्हे हे आजचे तालुक्याचे ठिकाण, पण पूर्वी भोर संस्थानच्या काळात प्रचंडगड हा तालुका होता आणि वेल्हे ही त्याची बाजारपेठ होती. काळाने हे चक्र पूर्ण उलटे फिरवले. असो! तर या वेल्हय़ापर्यंत पोहोचलो, की तोरणा त्याचा हा प्रचंड आकार, उंची घेऊन समोर उभा ठाकतो. त्याच्या या दुर्गमतेकडे पाहताच कचदिलांचे पाय इथेच गळतात, तर जातीच्या मावळय़ांचे रक्त सळसळू लागते. या ऊर्मीतूनच वेल्हय़ातून निघणाऱ्या या वाटेवर स्वार व्हायचे.

खरेतर तोरण्याच्या उभ्या पर्वताला भिडण्यापूर्वीच काही टेकडय़ांचा खेळ अगोदर पार पाडावा लागतो. एक चढली की दुसरी, मग तिसरी असे हे टेकडय़ांचे कंटाळवाणे खाली-वर होते. मग यानंतर आपण मुख्य डोंगराला भिडतो. तोरण्याची उंची ४६०६ फूट आणि सारी वाट उभ्या धारेवरची. यामुळे थोडय़ाच वेळात घाम गाळायला सुरुवात होते. एक-दोन ठिकाणी उभ्या कडय़ात कठडय़ांचा आधार घेत वाट वर सरकते.

इतिहासात अशा दुर्दम्य चढाईबरोबर गडाभोवतीच्या संरक्षक मेटांचाही सामना करावा लागे. कुठल्याही डोंगराच्या उताराच्या दिशेने काही शिरा खाली उतरतात. या डोंगरशिरांवरूनच गिरिदुर्गावर जाणाऱ्या वाटा धावतात. गडांवर चढणाऱ्या या वाटा रोखण्यासाठी या डोंगरशिरांच्या सपाटीवरच काही लढाऊ जमातींची वस्ती वसवली जायची. यांना ‘मेट’ म्हटले जाई. ही अशी मेटे विशिष्ट गाव, जात किंवा आडनावांच्या लोकांच्या प्रतिष्ठेची असत. जेव्हा शत्रूचा हल्ला होई त्या वेळी ही मेटेच अगोदर प्राणपणाने लढत. तोरण्याभोवतीही अशी सात मेटे होती. यातील वरली पेठ, वाघदरा, भट्टी, बार्शी माळ, पिलवरे ही मेटे आणि त्यावरील अनुक्रमे भुरूक, देवगिरीकर, कोकाटे, भुरूक, पिलवरे ही घराणी आजही या भागात प्रचलित आहेत.

असो! वर्तमानातही तोरण्याची ही चढाई आपला कस लावते आणि मगच बिनी दरवाजातून गडप्रवेशास अनुमती देते.

या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला तोरणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. याशिवाय हा गड जिंकत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण लावले असाही एक मोठा गैरसमज समाजात रूढ आहे, पण खरेतर शिवरायांनी तोरणा घेण्यापूर्वीच रोहिडा, कोंढाणा जिंकत स्वराज्याची घौडदौड सुरू केलेली होती.

झुंजार माची, बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप! बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण बालेकिल्ल्यात शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्टय़ आहे.

आत शिरताच समोर दोन टाक्या दिसतात. गरुडाचे घरटे तोरणा आणि खोकड अशी त्यांची नावे. इथेच तटावर तोरणजाईच्या घुमटी आहेत. इथे यायचे आणि तोरण्याच्या ‘त्या’ इतिहासात शिरायचे.

.. इसवी सन १६४७चा तो प्रसंग! स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेऊन शिवराय इथे तोरण्याच्या पायी अवतरले होते. गड विजापूरच्या बादशाहकडे, पण किल्लेदार मराठा! त्याला बोलावणे पाठवले गेले. त्या रात्री राजांनी त्याला काय सांगितले हे त्या काळ आणि काळोखालाच ठाऊक . पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही निशाण खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडकू लागला. राजे विजयी मुद्रेने गडावर आले. गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश सुटले आणि त्या दुरुस्तीतच एकाजागी मोहरांनी भरलेले २२ हंडे मिळाले. स्वराज्यासाठी हा दुसरा शुभसंकेत! मग त्याच जागी या तोरणजाईची स्थापना झाली आणि या संपत्तीतून शेजारच्याच मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी राजगड आकारास आली. शिवकाळातील हे असे भारावलेले प्रसंग आठवायचे आणि गडदर्शनास निघायचे.

बालेकिल्ल्याच्या मधोमध गडदेवता मेंगाईचे मंदिर. सध्या उपेक्षित असलेले हे मंदिर एकेकाळी मात्र सतत गजबजलेले होते. नवरात्रात इथे मोठा उत्सव व्हायचा. कथा, कीर्तन, गोंधळ असा मोठा थाट या देवीपुढे उडत असे. भोर संस्थानकडे हा किल्ला असेपर्यंत मेंगाई भोवतीचा हा थाटमाट सुरू होता. पण पुढे ‘स्वराज्य’ जाऊन ‘स्वातंत्र्य’ आले आणि या गडांचे मात्र जणू ‘पारतंत्र्य’ सुरू झाले. देवच जिथे उघडय़ावर आले तिथे देवळांची ती काय व्यथा? अलीकडे काही वर्षांत जीर्णोद्धाराचे हात लागले आणि मेंगाईचे रूप पालटले आहे.

मंदिरासमोरच किल्लेदाराच्या दिवाणघराचे अवशेष आहेत. पं. महादेवशास्त्री जोशी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात लिहिलेल्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात तोरणागडाचे वर्णन दिलेले आहे. यामध्ये संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होत असल्याचे आणि गडावर त्याचा कारभार पाहणारे किल्लेदार, गुरव राहात असल्याचा उल्लेख आला आहे. स्वत: जोशी यांनी ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर किल्लेदाराच्या या दिवाणघरातच मुक्काम केल्याचाही उल्लेख आहे. आज केवळ अवशेषांच्या रूपात दिसणाऱ्या किल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर हा सारा तपशील वाचताना खूपच मजेशीर वाटतो.

मेंगाईच्या मंदिराशेजारी गडावरील महादेव, तोरणेश्वराचे मंदिर आहे. या देवळासमोर काही वीरगळ, सतीशिळा दिसतात. इथून पूर्वेला जाऊ लागलो, की कोठी दरवाजा ते झुंजार माचीपर्यंतची उत्तरेकडची अखंड तटबंदी म्हणजे चीनच्या भिंतीचेच एक छोटे रूप भासते. वाटेत शिबंदीची घरटी, दारूगोळय़ांची कोठारे, म्हसोबा टाके, ढालकाठीची जागा असे बरेच काही दिसते. आता हे सारे निव्वळ अवशेष, पण तेच त्यांची ही नावे, त्यांचा उपयोग समजला, की जणू या प्रत्येकामध्ये पुन्हा जीव संचारतो. हे सारे पाहात शेवटच्या भेल बुरुजावर आलो, की खालच्या टप्प्यावर, डोंगररांगेवरून पूर्वेकडे उधळलेला झुंजार माचीचा देखावा अचानक समोर उभा राहतो.

राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची. यातील झुंजार विस्ताराने छोटी, पण आक्रमक! राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीणच! सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी!

या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम. ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे. तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना दरारा वाढवणारे. शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले, की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते.

दरम्यान, या माचीवर सध्या उतरणे हेही एक आव्हानच आहे. जुनी वाट दगड-मातीने बुजल्याने ढालकाठीजवळ तटावरून बाहेरील कडय़ावर उतरत, तटाकडेने चालत माचीवर यावे लागते. खालचे खोल कडे पाहता ही सारी जिवावरची कसरत ठरते. त्यापेक्षा पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गप्रेमींच्या श्रमदानातून माचीवर उतरणारा हा मूळ दरवाजा मोकळा करता आला तर सामान्यांनाही या माचीवर उतरता येईल.

गडाच्या पश्चिमेला सारे कोकण मांडले आहे. हे कोकण पाहण्यासाठी मग बालेकिल्ल्याच्या कोकणदरवाजातून बुधला माचीवर उतरावे. विस्ताराने मोठी असलेली ही माची पश्चिमेला दूपर्यंत पसरली आहे. अगदी शेवटी तिला दक्षिणेला एक फाटा फुटला आहे. या पश्चिम आणि दक्षिण फाटय़ाच्या मधोमध टेकडीवर एक भलामोठा सुळका आहे. दूरवरून हा सुळका एखादा तेलाचा बुधला उपडा ठेवल्याप्रमाणे दिसतो, म्हणून या माचीला ‘बुधला’ असे नाव देण्यात आले. या माचीवर उतरण्यासाठी जसा कोकण दरवाजा तसेच खालून वर माचीत येण्यासाठी भगत, महा, चित्ता आणि वळंजाई असे चार दरवाजे आहेत. यातील दक्षिण फाटय़ावरील भगत दरवाजातून डोंगरदांडय़ाने एक वाट थेट राजगडाला जाऊन मिळते. या माचीवर स्वतंत्र सदर, दारूगोळय़ाची कोठारे, विशाळा, घोडय़ाचे जिन, गंगजाई मंदिर तसेच काही पाण्याच्या टाक्या आहेत. यातील काही टाक्यांची कापूर, खांब, महाळुंगे, शिवगंगा, पाताळगंगा ही अशी नावे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. हे सारे अवशेष, त्यांच्या नोंदी आजही तो काळ उभा करतात. इतिहासात शिरायला लावतात.

बुधला माची पाहून पुन्हा बालेकिल्ल्यात यावे. बालेकिल्ल्यातूनच गडाचा भलामोठा विस्तारही नजरेत येतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवरायांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. ही प्रचंड उंची आणि विस्तारामुळे मग गड पाहण्यास एक दिवस अपुरा पडतो. यासाठी सर्व तयारीनिशी गडावर मेंगाईच्या मंदिरात मुक्कामासाठीच यावे लागते. पण तोरण्यावरील या मुक्कामाबाबत काही दुर्गप्रवाशांनी त्यांना झालेल्या चित्रविचित्र भासांबद्दल लिहून ठेवले आहे. स्थानिक लोक याबाबत धानेबच्या दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाच्या पिशाचाचा दाखला देतात. गंमत अशीस की, या अशा भुतासाठी वेल्हय़ाच्या तहसील कार्यालयाकडूनही नैवेद्यासाठी काही खर्च मंजूर असल्याचे समजले. खरेखोटे काय ती मेंगाईच जाणे! पण आम्ही मात्र इथे एकदा चक्क अमावास्येच्या रात्री मुक्काम ठोकला. त्या रात्री, चांदण्यांत बुधल्यापासून-झुंजार माचीपर्यंत सारा गड फिरलो. तट-बुरूज आणि इमारतींबरोबर गप्पा मारल्या. पण त्या काळोखातही ती फक्त ‘शिवरात्र’च वाटली..!

बालेकिल्ला ही गडावरची सर्वात उंचावरची जागा. इथे आलो, की दोन्ही अंगांचा मोठा प्रदेश नजरेच्या टापूत येतो. उत्तरेकडे कानद आणि दक्षिणेकडची वेळवंड नदीची खोरी लक्ष वेधून घेतात. या नद्यांच्या काठावरची छोटी छोटी खेडी-गावे पाहताना मोठी गंमत वाटते. भोवतालच्या डोंगररांगांतील सिंहगड, राजगड, लिंगाणा, रायगड हे तोरण्याचे भाईबंद खुणावतात. तसे ते तोरण्याच्या उंचीपुढे धाकुटलेच वाटतात. यातही दक्षिण अंगाला दरीतून वर उसळी घेत उगवलेला ‘लिंगाणा’ त्याचा धाक दाखवतो. आकाश स्वच्छ असेल तर त्यापाठीमागच्या रायगडावरील वास्तूंचाही अंदाज येतो.

तोरण्याच्या या आभाळातील उंच जागीच्या घराबद्दल जेम्स डग्लस हा इंग्रजी लेखकही कौतुकाने म्हणतो,

”र्रल्लँंॠं ्रि२ ‘्रल्ल’२ीिल्ल, ३ँील्ल ळ१ंल्लं ्र२ एंॠ’ी’२ ल्ली२३.”

-‘सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल!’

इसवी सन १८८०मध्ये हा डग्लस तोरणा भेटीवर आला होता. तो पुढे लिहितो, ‘शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला. या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला. ज्या मराठी राज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याचे हे उगमस्थान आहे. या ठिकाणी एकेकाळी कितीतरी लढाया झाल्या. पण आज इथे काय दिसत आहे? जिकडेतिकडे दगडांचे ढीगच्या ढीग पडले आहेत. पडक्या इमारतींवर उंच गवत वाढले आहे.’

..काळाच्या ओघात थकलेला गरुडाचे घरटे तोरणा पाहून या विदेशी डग्लसचेही मन हेलावले.

तोरण्याची ही दुर्गमता-उंचीबद्दल मुघलांच्या नोंदीतूनही काही माहिती मिळते. १० मार्च १७०४ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले- ‘फुतूहुल्घैब’! म्हणजे ‘दैवी विजय’! मग हा ‘दैवी विजय’ घेत हातमखान नावाचा किल्लेदार इथे काम करू लागला, पण काही दिवसांतच त्याला या ‘फुतूहुल्घैब’मधील भयाणता टोचू लागली. एका पत्रात तो लिहितो,

‘दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी तोरण्यात येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. भुतांचे आणि राक्षसांचे निवासस्थान आहे. किल्ल्याभोवतीच्या दऱ्या सप्तपातळातील नरकासारख्या दिसतात.’

हातमखानला सतावणारी ही सारी भयाणता आजही या उंच जागी आले, की जाणवते. भोवतीचा तळ पाताळाप्रमाणे खोल वाटू लागतो. तोरणा खरोखरच एखाद्या उंच जागीचे गरुडाचे घरटे भासू लागते.

लेखक अज्ञात

Leave a comment