देवी भ्रामरी –
भ्रमरास प्रेमाचा दूत म्हटले जाते. पण याच भ्रमरास स्वतः चे अस्त्र करणाऱ्या देवी पार्वती च्या भ्रामरी रुपाबद्दल जनमानसांत फारसे ज्ञात नाही. देवी पुराणात अनेक जीवा संबंधी महत्ती सांगताना तिचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी देवी चे स्वरूप षडपाद असून तीस मधमाश्यांची देवता असे म्हटले जाते. देवी सती च्या 51 शक्तिपीठांपैकी च एक देवी भ्रामरी,
हिच्यासंबंधी एक कथा प्रचलित आहे ती अशी, ‘अरुण’नामक दैत्य होता, त्याने त्याच्या कठोर तपश्चर्येने ब्रम्हदेवास प्रसन्न करून वर प्राप्ती केली, की त्याचा मृत्यू ना युद्धात व्हावा, ना कोण्या स्त्री-पुरुषांकरवी व्हावा, ना कोण्या दोन चार पायांच्या प्राण्यांकरवी व्हावा, तसेच देवतांवर ही विजय मिळावा, अशी वरदाने प्राप्त करून सामर्थ्याच्या बळावर त्याने स्वर्गप्राप्ती केली , त्यामुळे व्यथित देवतांनी भगवान शिवकडे जावून विनवनी केली ,त्यावेळी आकाशवाणी होउन, देवी भगवतीची आराधना करण्याचे सुचवले गेले. आराधने पश्चात देवी प्रसन्न झाली. ती षडपाद असून भ्रमर हेच तिचे अस्त्र होते, हातांच्या मुठीत ही केवळ भ्रमरच होते. ती पूर्णतः भ्रमरांनी घेरलेली असल्याने तिस ‘भ्रामरी देवी’असे उल्लेखिले गेले. तिच्या आगमनाने संपूर्ण ब्रम्हांड भ्रमरांनी व्याप्त झाले, तिने तिच्या असंख्य भ्रमरांसहीत अरुण नामक दैत्याचा नाश केला.आणि पुनश्च देवतांना स्वर्गप्राप्ती करवून दिली.
शिव पुराणानुसार, श्रीशैलपर्वतावर शिवपार्वती निवास करत होते, आणि हा श्रीशैलपर्वत आंध्र प्रदेशातील कर्नुल राज्यात असून येथे भ्रमराम्बा शक्तीपीठ आहे. त्यासोबतच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ही आहे. माता सतीची ग्रीवा या ठिकाणी पडली होती, त्यामुळे हे शक्तीपीठ निर्माण झाले असावे असा मतप्रवाह आहे. तसेच पश्चिम बंगाल, हरियाणा, आंध्र प्रदेश, इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुद्धा देवी भ्रामरी चे मंदिर आढळते.
भ्रमर हे त्या स्वभावाचे प्रतीक आहे ज्याचे वर्णन तुकारामाने वज्राहुनी कठोर आणि मेणाहुनी मऊ असे केले आहे.
– Shrimala K. G.

