धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०

.मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धूसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखोरीत दिसत होत्या.
सारे जण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभाऱ्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश-पहाऱ्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली बाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना नऊ पाकळ्यांची दोन डौलदार धर्मचक्रे
कोरली होती! त्या दोन धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते!! राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एकनजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जाते आहे असा त्यांना भास झाला! राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी धरून गेली.

व्याघ्रमुख! व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा! एक-एक पंजा पुढं-पुढं टाकीत येणारं, रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन! त्याच्या पाठीवर आरूढ झालेली, शस्त्रसभार उगारलेली,
आरक्त नेत्रांची रणदेवता भवानी! वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र!! व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्रं रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि – आणि ते रोखण्यासाठी दात ओठ खाऊन, बाह्या सरसावत येणारा खान! खान! खान!…

राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली! त्यांचे विस्फारलेले सूर्यपेट डोळे पुरते पेटून उठले! डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर-गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील
बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळव्यात तशी शिवलिंगावर उधळली! हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले- “जय शंभो$ हर, हर! जय भवानी!” राजांना कसलातरी ठेवणीचा कौल मिळाला होता! शिवलिंगावरचे अभिषेकपात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते!!

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस बारा मावळांचा डोंगरमाथा चढून वर आला. जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळढगांनी भरून आले. राजगडावरच्या देवमहालात बसून त्या एक-एक बेलपत्र समोरच्या शिवर्पिडीवर बाहू लागल्या. त्यांच्या शेजारी बाळशंभू एका पाटावर बसले होते. भिंतीची कड धरून धाराऊ जिजाऊंच्यावर नजर ठेवून उभी होती.

दिवस चढतीला आला. मनच्या शंका बेलपत्रावर चढवून एक-एक बिल्बदल शिवर्पिडीवर वाहून-वाहून जिजाबाई थकदिल झाल्या. बेलपत्रे सरतीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकांनी भरूनच राहिले! दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळुंकेवर टेकविले. त्यांच्या
चंद्रशांत डोळ्यांतून सरसरत पाणधारा उतरू लागल्या. उभे अंग थरथरू लागले. डोळ्यांतून ओघळत्या पाण्याबरोबर त्यांची वरकडची सगळी-सगळी नाती वाहून गेली होती. उरला होता तो फक्त एकच लागेबंध – ‘आऊपणाचा! ‘ एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुडीत कांडून टाकू लागला – ‘आता-आता माझे शिवबाराजे गड
उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील!! रात्रभर तोफांचे आवाज झाले ते का? ‘

जिजाबाई मान वर करीत नाहीत, त्यांचे उभे अंग थरथरते आहे, कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकताहेत हे पाहून शंभूबाळ भेदरले. त्यांनी पुढे होऊन जिजाऊंना गदगद
हलवीत हाक घातली – “थोरल्या आऊ! थोरल्या आऊ! ”

थोरल्या आऊंना काही-काही ऐकू येत नव्हते. त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी, नेसूचा पायघोळ फरफटवीत तरातरा आपल्या महालाकडे निघून गेल्या.

हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळशंभूंना धाराऊने पुढे होत थोपवून धरले. त्यांना संगती घेऊन ती आपल्या दालनाकडे निघून गेली. जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला. त्या पुरत्या-पुरत्या एकट्या झाल्या. धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले.

रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला. त्याने बाहेरून दरवाजावर तळहाताची तीन वेळा थाप भरली. आतल्या
देवडीवाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड, घोगऱ्या आवाजात म्हणाला, “आईचा भुत्या! रानचा वारा!” तो परवलीचा बोल होता.

देवडीवाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली. फकीर घाईने आत घुसला. तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला. सिदोजी
थोपट्यांनी फकिराला ओळखले. तो होता, हुन्नरबाज खबरगीर – विश्वास नानाजी मुसेखोरेकर! सिदोजी आणि विश्वास राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आले. सिदोजींनी
जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली.

जिजाऊ आपल्या महालात शंभूबाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या. दिवसभराच्या चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता. चिराखदानांच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता. सिदोजी आणि विश्वास जिजाऊच्या महालात गेले.

एका फकिराला सिदोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या. त्या मंचकावरून तडक उठल्या. सिदोजीने व विश्वासने त्यांना अदबमुजरे केले. जिजाऊ क्षणभर गोंधळल्या.
दुसऱ्याच क्षणी त्यांनी विश्वासला ओळखले. भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसेबसे म्हणाल्या – “विश्वा$स!…. ”

मुजऱ्यासाठी वाकलेला विश्वास ताठ खडा झाला. दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले -“मासाहेब, त्वांड ग्वाड
करा! जगदंबेनं तारलं समद्यांख्री. राजांनी चलाखीनं खानाचा सफै फोडला! वाघनख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटला भाईर काढला! संभाजी कावजीनं खानाचं गर्दन तेगीच्या एका फटक्यात धडागुणं क्‍्येलं! खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरंवर हाय! धड जनीच्या टेंब्यावर – गडाच्या पायथ्याला धूळ खात पडलंय! खानाचा पारावरचा बारा हजारांचा तळ जेधे-सिलींबकर, भोसले-पासलकरांनी येरगाटून टाकलाय! हातोहातीच्या हत्यारचालीला जावळीखोऱ्यात त्वांड फुटलंय! सरलष्करांची घोडी वाईच्या रोखानं दौड घेत गेल्यात! खान समद्या जमेतीनीशी पार बुडाला! आपली फते झाली!! ”

विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यांतून सर… सर आनंदाने अश्रू ओघळू लागले. मागे वळून शंभूच्या कानशिलाजवबळ हाताची बोटे नेत ती जिजाऊंनी
आपल्या कानशिलाजवळ आणून मोडली. शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या, “विश्वास, सदरेवर चल. तुझ्या या खबरीची कदर आम्ही करणार आहोत. ”

उचलून घेतलेल्या बाळराजांना जिजाबाई न राहवून म्हणाल्या – “खान म्हणजे काय म्हणून विचारता! जो सर्वांना खायला टपलेला असतो, पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांसह खाऊन जातो, त्याला “खान ‘ म्हणतात बाळराजे!” बाळशंभूंना ते काही उमगले नाही!

प्रतापगडावरून जिऊ महाला राजगडावर आला. वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले थिजल्या, काळपट रक्तओघळांचे खानाचे शिर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते.
जिजाऊंनी नजरेखाली घालावे म्हणून जिऊने ते एका तबकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले. एका चौरंगावर ते तबक ठेवून ठेवून तो चौरंग राजसदरेच्या फरसबंदीवर मांडण्यात आला. गडावरचा सारा लोक खान बघण्यासाठी बालेकिल्ल्याच्या सदरेवर लोटला होता.

डाव्या हाती शंभूंचा हात धरून जिजाबाई सदरदाखल झाल्या. साऱ्यांनी मुजरे झाडले. जिजाबाई शंभूंसह सदरबैठकीवर बसत म्हणाल्या, “जिवा, दूरची धावणी
घेतलीस. काही खाल्लंस? ” “न्हाई मासाब, प्वाट भरलंय माजं!” म्हणत जिवाने चौरंगावरच्या तबकाचा
सरपोस दूर सारला. कमरेत वाकून जिवा बोलला, “ही भेट धन्यानी मासाहेबांच्या रुजबातीला धाडलिया. ”

खानाचे रक्तओघळांत गोठलेले, डोळ्यांच्या कवड्या अर्धवट उघड्या टाकलेले, बासलेले शिर बघताच कपाळावरचे आडवे कुंकू ताणीत जिजाबाई बैठकीवरून तडक उठल्या. त्यांच्या नाकपुड्या विस्फारल्या गेल्या. श्वास चढा झाला. ओठ क्षणभर थरथरले.

“अफजलखान! जसं पेरावं तसंच उगवतं!” त्यांच्या ओठातून थरथरते बोल निसटले. या – याच खानाने गेली कैक वर्षे जिजाऊंच्या काळजाला मरणभयाच्या जळवा
जोडून दिल्या होत्या.

क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला. पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली, हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा. आठरा
कारखान्यांचे लोक त्याचं दर्शन घेतील. त्याची पूजा करून इतमामानानं त्याचं दफन करा. गनीम संपला – गनिमी संपली! ”

जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभूबाळ डोळे ताणून केव्हाचे खानाच्या शिराकडे
एकटक बघत होते. अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे जाले. “आबा या खानाच्या
भेटीला गेले होते. त्याला हातपाय काहीच नसता त्यांनी याची भेट कशी घेतली असेल?
थोरल्या आऊ म्हणाल्या – “जो दुसऱ्यास खायला टपतो, पण ज्याला कुणीच खात नसतो,
तो खान!” मग त्यांनी हे का नाही सांगितलं की, ज्यास हातपाय नसतात ते नुसते मुंडके
म्हणजे खान!! जो घोड्यावर मांड न घेता तबकावर बसतो, तो खान! ‘

शेवटी न राहवून बाळराजांनी जिजाबाईंना विचारलेच, “धाराऊ म्हणत होती खान मोठ्ठा आहे. तर मग हा एवढाच कसा?” त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हसली. बाळराजे गोंधळून गेले. जिजाऊ त्यांचा खांदा थोपटीत शांतपणे म्हणाल्या, “तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला. तुम्ही याहून मोठ्ठा आणा! ”

क्रमशः………..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here