बीबी का मकबरा

बीबी का मकबरा

बीबी का मकबरा…

मोगलकाळातील बीबी का मकबरा ही दख्खनमधील उत्तम वास्तू आहे. आग्रा येथे ताजमहालाच्या निर्मितीनंतर त्याच्याच धर्तीवर दख्खनमध्ये वास्तू असावी या दृष्टिकोनातून बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सिहांचल पर्वतरांगांच्या पायथ्याशी मकबरा उभारला आहे. मकब-यामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम सर्वांनाच भुरळ पाडणारे असून याच्या निर्मितीसाठी काही ठिकाणी मार्बलचा वापर करण्यात आला आहे. चारबाग पद्धतीवर मकब-याची निर्मिती झालेली आहे. मकब-याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.मोगलांच्या काळात पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे बहुतेक वास्तू नदीच्या काठी उभारण्यात आल्या.

यमुना नदीतीरी ताजमहाल तर बीबी का मकबरा खाम नदीच्या तीरावर उभारण्यात आला. बीबी का मकबरा कोणी बांधला यावरून अनेक मतप्रवाह आहेत. पुरातत्त्व खात्याने मकब-याबाहेर लावलेल्या माहितीफलकावर ही वास्तू औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने त्याची आई दिलरसबानो बेगमच्या आठवणीत उभारल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता शासनाच्या औरंगाबाद गॅझेटियरमध्ये व कॅम्पबेल क्लाऊड या लेखकाने १८९८ मध्ये लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ निझाम डोमिनियन’ या पुस्तकातही मकबरा आझमशहाने बांधल्याचे नमूद केलेले आहे. परंतु मोगल बादशहांवर विपुल लिखाण करणा-या यदुनाथ सरकार यांनी औरंगजेबावर लिहिलेल्या पाच खंडांमध्ये आझमशहाचा जन्म १६५३ झाल्याचे म्हटले आहे. शिवाय जिन ट्रव्हेरनिअर यांनी ‘ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात १६५३ मध्ये मकब-याच्या निर्मितीसाठी औरंगाबादजवळून ३०० बैलगाड्या मार्बल जात असल्याचे दाखले दिले आहेत.

जर मकब-याची निर्मिती १६५३ मध्ये झाली आणि आझमशहाही त्याच वर्षी जन्मला तर त्याने मकबरा कसा बांधला? इतिहास अभ्यासकांच्या मते १६३६-४४ दरम्यान औरंगजेब पहिल्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणून शहरात आला. औरंगजेबाचा १६३७ मध्ये दिलरसबानो बेगमशी निकाह झाला. त्यानंतर १६४४ ला औरंगजेबाला काबूल, कंदाहार येथे पाठवण्यात आले. १६५२ मध्ये पत्नी दिलरसबानो बेगमसह पुन्हा आग्रा येथे औरंगजेबाचे आगमन झाले. त्या वेळी नुकतेच ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. ही वास्तू दिलरसबानो बेगमला प्रचंड आवडली. त्यामुळे तिने याची प्रतिकृती दख्खनमध्ये उभारण्याचा आग्रह धरला. दरम्यानच्या काळात १६५३ मध्ये दुस-यांदा औरंगजेबाला दख्खनमध्ये सुभेदार म्हणून पाठवण्यात आले. त्या वेळी औरंगजेबाने शहाजहानकडून बीबी का मकबरा उभारण्याची परवानगी मिळवली आणि येथे येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. १६६० मध्ये मकब-याचे काम पूर्ण झाले,

असा आहे मकबरा (चौरस फुटांत)
० ५०० बाय ३०० – संपूर्ण मकब-याचा परिसर
० १८ बाय २८ – मकब-यात प्रवेश केल्यानंतर पहिल्या हौदाचे क्षेत्रफळ
० ७२ बाय ७२ – मकब-याच्या प्लॅटफॉर्मचे क्षेत्रफळ
० ७२ फूट- मिनारची उंची
० ६१ – लांब हौदातील कारंज्यांची संख्या
० ४८८ x ९ x ३ फूट हौदाची लांबी x रुंदी x खोली
* मकबरा हा अरबी शब्द आहे. मकबरा म्हणजे कबर असा त्याचा अर्थ होतो
* ताजमहाल उभारणा-या उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अताउल्ला खान याने बीबी का मकब-याचे काम केले या वास्तूच्या निर्मितीवेळी हसपतराय हे इंजिनिअर होते
* बीबी का मकब-याच्या निर्मितीसाठी 6 लाख 68 हजार 203 रुपये सात आणे खर्च आला
* काश्मीरमधील शालिमार गार्डननंतर मकब-यात सर्वात जास्त लांब पाण्याचे हौद आहेत
* दिलरसबानो बेगमला राबिया-उल- दौरानी असेही म्हटले जाते
* मकब-यातील बागांना पाणी देण्यासाठी नहर-ए-अंबरी, थत्ते हौद, हाथी कुआ यातून पाणी पुरवले जायचे

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 
खांदेरीचा रणसंग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here