महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,381,027

खानदेशातील भिल्ल भाग ३ | भिल्लांतील पोटजमाती

By Discover Maharashtra Views: 1428 10 Min Read

खानदेशातील भिल्ल भाग ३ | भिल्लांतील पोटजमाती –

स्वातंत्र्योत्तर भारतातील बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा भिल्लांच्या आदिवासी जीवनावर परिणाम झाला आहे. याशिवाय भारत सेवक, भिल्ल सेवा मंडळ आदी सामाजिक संस्थांनीही भिल्लांच्या आदिम जीवनात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. त्यामुळे भिल्लांच्या पोषाखात तसेच राहणीमानात आमूलाग्र बदल घडत आहेत. अनेक भिल्ल मुले-मुली त्यांच्या प्रदेशातील प्राथमिक शाळांत जाऊ लागली आहेत; तसेच भिल्लांमधील काही सुशिक्षितांनी जालोद (गुजरात) येथे १९५४ मध्ये आदिवासी भिल्ल पंच या नावाने एक परिषद भरविली आणि वधूमूल्याच्या रकमेवर नियंत्रण घातले. भिल्लांच्या विकासार्थ त्यांना वाजवी दराने कर्ज मिळावे, म्हणून काही को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या निघाल्या आहेत; तथापि या सुधारणांमुळे त्यांचे स्वच्छंदी जीवन व आदिवासी संस्कृती नष्ट होत आहे, अशी टीका व आरोप करण्यात येतो.(खानदेशातील भिल्ल भाग ३ | भिल्लांतील पोटजमाती)

बारडा –

भिल्ल जमातीचीच ही एक पोटजमात समजली जाते. त्यांना बरडा किंवा बरडे भिल्ल असेही काही ठिकाणी म्हणतात. त्यांची वस्ती प्रामुख्याने नासिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद व धुळे या जिल्ह्यांत आढळून येते. बारडा हे नाव खालच्या प्रतीचे समजले जाते. त्यामुळे हे लोक स्वतःला भिल्ल म्हणूनच म्हणवून घेतात. त्यामुळे १९७१ च्या जनगणनेत बारडा या नावाची स्वतंत्र नोंद केलेल्या भिल्लांची संख्या महाराष्ट्रात फक्त २०८ असल्याचे आढळून आले.

भिल्ल ह्या जमातीच्या अंतर्गत त्यांची गणना केल्याने त्यांची लोकसंख्या स्वतंत्र रीत्या उपलब्ध होत नाही. वस्तुतः महाराष्ट्रात बारडा भिल्लांची संख्या याहून जास्त आहे. महाराष्ट्रातील नासिक, धुळे (सिंदखेडा, साक्री व धुळे तालुका), जाळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, यांशिवाय सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व बीड या जिल्ह्यांत त्यांची वस्ती विखुरलेली आहे. त्यांची वस्ती मुख्यत्वे ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला लहान वस्त्यांवर किंवा शेताच्या बाजूला गावाबाहेर विखुरलेली आढळते. अशा वस्त्यांना ‘भिलाट्या’ म्हणतात. भिलाट्यांत गवताच्या आणि मातीच्या भिंतींच्या लहान झोपड्या असतात.

बहुतेक बारडांना स्वतःच्या जमिनी नाहीत ते शेतमजूर म्हणून वर्षानुवर्षे काम करतात व आपला चरितार्थ चालवितात. काही ठिकाणी हे लोक शेती आणि पीक यांची राखण करण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आढळून येते. साहजिकच बारडांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फारच कमी असून शेकडा ५% लोकदेखील शिकलेले किंवा साक्षर नाहीत. हे प्रमाण स्त्रियांमध्ये फारच कमी आहे. बारडा मराठी भाषिकांच्या सानिध्यात राहत असल्यामुळे ते मराठी भाषाच बोलतात. त्यांची स्वतंत्र अशी बोलीभाषा प्रचारात नाही. बारडा स्वतःच्या जमातीची उत्पत्ती महादेवापासून झाली असे मानतात व त्यांच्या आचारविचारांवर हिंदू धर्माचा प्रभाव असून हिंदू धर्मातील हनुमान, लक्ष्मी, म्हसोबा, भैरोबा, मरीआई, अरूण इ. देवतांचीही ते पूजा करतात. तसेच मुलाच्या जन्मानंतर पाचवीला सटवीची पूजा करतात. होळी, दिवाळी, दसरा, गुढी पाडवा, पोळा, नागपंचमी इ. हिंदूंचे सण ते साजरे करतात.

बारडांमध्ये एकाच कुळात विवाह होत नाहीत. मुलामुलींचे लग्ने वयाच्या साधारणतः १५ ते २० वर्षांच्या दरम्यान होतात. घटस्फोट व विधवाविवाह यांना जमातीत मान्यता आहे. पिशाच्च, जादूटोणा, चेटूक व मंत्रतंत्र यांवर त्यांचा दृढ विश्वास असून त्यांच्यात भगताचा प्रभाव आढळतो. मृताला जाळण्याची वा पुरण्याची अशा दोन्ही प्रथा त्यांच्यात रुढ आहेत. ते तिसऱ्या, पाचव्या व दहाव्या दिवशी दुखवटा पाळतात. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव आणि जुन्या सामाजिक रुढी व परंपरा यांमुळे सुधारलेल्या किंवा प्रगत भागात राहूनदेखील बारडांवर आधुनिकीकरणाचा प्रभाव दिसत नाही.

(संदर्भ गारे, गोविंद)

आदिवासी पावरा समाज –

पावरी, वारली आणि धानका ही अक्राणी भागात आहे. तर तळोदा आणि शहादा येथील  भागातही पावरी हे हे राजपूत वंशातील आहे. उदेपुर संस्थानच्या प्रमुखांने हाकलले आहे जे पालगड किल्ला ह़ोता. त्यांचा प्रवास मथवाड संस्थान जे नर्मदेच्या उत्तरेकडील बाजू ला आहे माथ्वाडीस म्हणून ओळखले जाते. जे पावरा भिलाल, पावरा नाईक, आणि पावरा कोळी म्हणून ओळखले जातात. ते कोकणातील कोळी आणि  भिल्ल यांच्याविषयी साम्य आहे. भाषा पावरी आहे जी गुजराती मराठी मिश्रित आहे.घरे बांबूची आणि प्रशस्त असतात गोठे वेगळे असतात. पावलू, रूंथी, पावी, मंडोल, ढोल ही वाद्ये वाजवण्याची कला आहे इतर आदिवासी प्रमाणे नृत्य आणि सण उत्सव परंपरा आहे. मोहाची फुले आणि चारोळ्या गोळा करतात. पूजा विधी वेगळी आहे देवळे किंवा मुर्ती नाही तर फक्त भावा कुंभ हा देव आणि राणी काजल ही देवता आहे. पवित्र झाड हेच प्रतिक आहे आणि जवळच ह्या देवता असते तिला बळी आणि नैवेद्य  द्यायची पध्दत आहे. वाघदेवाचीही पूजा करतात. जो त्यांच्यां पशुधनाची संरक्षण करतो. डाकिण ही संकल्पना आहे. जन्माच्या वेळी काही विधी नसतात. भुतीया, रात्रिया, मंगोतिया ही पुरूषांची नावे आहेत तर जुतनी, गुरी, बुडोल आणि चिनकी ही मुलींचे नावाने ओळखले जातात. दिवाळी, होळी आणि इंद्रज हे सण साजरे केले जातात. होळीला शिमगा म्हणतात. इंद्रज जमिनदाराच्या घरासमोर कदंब वृक्ष लावला जातो. मध्यरात्री पुजा केली जाते कोंबडी आणि बकरी कापून नाचगाणी केली जातात. सकाळी झाडाची फांदी नदीला वाहून खाणेपिणे केले जाते. दिवाळीला नागदिवाळी म्हणतात. शिमगा साजरा केला जातो.

पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे आहेत.

पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला असे म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.

पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पँट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.

पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी अगोदर बोंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात.

होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात.

पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरीष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात मोहाच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हुणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

पावरा समाज आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करुन लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या अगोदर १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बुद्या, वन्य प्राणी, चेटकीण वा काली इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात. राय: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्यांचा पेहरावात दोन ९ वारी साड्यांचे केलेले उपरणे असते. कंबरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तलवार व डोक्यावर रंगीत पागोटे असते. यांच्या सोबत साडी नेसलेले स्त्री वेषातील पुरुष असतात. या सर्वांना गेर नृत्यातील शिस्त चोखपणे पाळावी लागते. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यास मनमोहक असते.

बावा बूद्या: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढर्‍या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती दूधीभोपळ्याची फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. व कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा ढोलाच्या ठेक्यावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते. वन्यप्राणी: वेषात अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात. चेटकीण वा काली: प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते. पावरा जमात संपूर्ण निसर्गपूजक आहे.

(खानदेशातील भिल्ल भाग ३ | भिल्लांतील पोटजमाती | खानदेशातील भिल्ल भाग ३ | भिल्लांतील पोटजमाती)

माहिती संकलन  –

Leave a comment