महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

श्री बालाजी महाराज मंदिर, नगरदेवळा

By Discover Maharashtra Views: 2451 8 Min Read

श्री बालाजी महाराज मंदिर –

भुसावळ मनमाड या मध्य रेल्वेच्या मार्गावर चाळीसगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे नगरदेवळा . तिथून दक्षिणेला चार किलोमीटर अंतरावर असलेले नगरदेवळे ! 300 वर्षांपासूनची व्यापारपेठ असलेले हे गाव जहागिरीचे गाव असल्याने व्यापारी व लष्करी दृष्ट्या याचे महत्त्व पूर्वापार होते. आजूबाजूच्या परिसरात हेमांडपंथी मंदिरांचे अस्तित्व असल्याने हा परिसर प्राचीन काळापासून व्यापारी दृष्ट्या स्थिरस्थावर असल्याचे जाणवते. गाव व परिसरातील सुपीक जमीन असल्याने आर्थिक दृष्ट्या हा परिसर प्राचीन काळापासून संपन्न असा आहे. या गावात असलेल्या असंख्य मंदिरांपैकी अत्यंत महत्त्वाचे असलेले बालाजी महाराज मंदिर !

या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की, गावातील एक सत्पुरुष ह. भ. प. देवचंद बुवा चौधरी हे दरवर्षी पंढरपूर यात्रेला जात असत. वृद्धापकाळाने त्यांना जाणे जमत नसल्याने ते प्रतिपंढरपूर अशा पिंपळगाव हरेश्वर येथे जात असताना सावखेडे भैरवनाथ येथे पाणी पिण्यासाठी बहुळा नदीपात्रात उतरले,  व झरा खोदत असताना नदीपात्रातून बालाजी महाराजांची मूर्ती त्यांच्या हाती आली. त्यांनी मनोभावे नमस्कार करून मूर्ती घरी आणली व देव्हाऱ्यात तिची स्थापना केली.

योगायोग असा की त्याच दिवशी श्रीमंत सरदार शिवराव पवार दुसरे यांच्या स्वप्नात येऊन बालाजी महाराज यांनी त्यांना दृष्टांत दिला.त्यानुसार श्रीमंत सरदार पवार महाराज यांनी मंदिरासाठी जागा व नियमित पूजाअर्चा करण्यासाठी देवचंद बुवा यांना साडेआठ एकर जमीन दान दिली तसेच श्री बालाजी महाराजांच्या वार्षिक उत्सवासाठी रथ बनवून दिला. हा रथ  नगरदेवळे व पारोळा येथील कारागिरांनी घडविल्याचे सांगितले जाते. तसेच पारोळा व पाचोरा येथील रथ बांधकामात नगरदेवळे येथील कारागिरांचा देखील सहभाग होता असे सांगतात.

श्रीमंत सरदार पवार यांनी श्री बालाजी मंदिरासाठी गावाच्या पश्चिमेला अग्नावती नदी काठी पेठ भागात अशी जागा निवडली की सरदारांच्या राजवाड्यातून मूर्तीचे दर्शन व्हावे. सरदार पवार यांनी आपल्या वाड्यात दर्शनासाठी दगडी चबुतरा बांधून घेतला होता. प्रातःकाळी तिथून ते श्री बालाजी महाराजांचे नित्य दर्शन घेत असत व त्यानंतरच त्यांचे  दरबारात आगमन होत असे.

पूर्वी कार्तिक एकादशी पासूनच रथ उत्सवाला प्रारंभ व्हायचा. गावातील गोंधळी समाज बांधव कसलेले कलावंत होते. दररोज वेगवेगळी वेशभूषा करून त्यांच्याद्वारे  पौराणिक कथांचे गायन केले जायचे. त्यात रामपंचायतन, शिव पंचायतन, पांडवप्रताप, महिषासुर वध अशा प्रसंगाचे जिवंत प्रसंग सादर केले जायचे. ते बघण्यासाठी गावातील व पंचक्रोशीतील लोकांची प्रचंड गर्दी असायची.

पूर्वी गावातून पालखी फिरवण्याचा मान भोई समाज बांधवांकडे होता.कार्तिक शुद्ध त्रयोदशीला पालखी खालच्या गावातून फिरवली जायची.रात्री दहा वाजता पालखी निघायची ती सकाळपर्यंत मंदिरात यायची.

चतुर्दशीला सकाळी 11 वाजता सुरू झालेला रथ मार्गक्रमित करत रात्री अकरापर्यंत मूळ जागेवर यायचा. रथाच्या पुर्वापार विधीवतपूजा  परंपरेचा मान सरदार पवार घराण्याकडे प्राचीन काळापासून सुरू आहे. तो आजतागायत सुरू आहे.सरदार पवार घराण्यातील वंशजांच्या हस्ते मंत्रोच्चारात रथाचे पूजन व उत्सवमूर्तीची चल स्थापना केली जाते.  पेठ भागातील संकुचित झालेल्या गल्ल्यांमुळे जवळपास 1975 पासून रथाचा मार्ग खंडित करण्यात आला आहे. आज रथाचा आगमन व निगमनाचा मार्ग सरदार एस. के.पवार माध्यमिक विद्यालयापर्यंत व तिथून पुन्हा मंदिरापर्यंत ठरविण्यात आला आहे.

दिवाळीनंतर तेराव्या दिवशी गावातून पालखी मिरवणूक निघते पालखी मिरवणूकी नंतर  दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव असतो.रथ पूजनांतर  समस्त गावकरी गोविंदा गोविंदा या जयघोषात रथोत्सवात सहभागी होतात. विशेष म्हणजे जुम्मा मस्जिद ट्रस्ट कडून शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन बालाजी महाराजांचे स्वागत केले जाते. जामा मशीद व बालाजी मंदिर भिंतलागूनच आहे.एक धार्मिक सौहार्दाचे वातावरण येथे पाहायला मिळते. रथ उत्सवामध्ये  सर्वच जातीधर्माच्या बांधवांचा विशेष सहभाग असतो.

रथावर श्री बालाजी महाराज यांची चलस्थापना केली जाते. रथाच्या दर्शनी भागावर जय विजय या द्वारपालांच्या पाच फुटी उंचीच्या लाकडी मूर्ती स्थापन केल्या जातात. त्यांच्या मध्यभागी रथाचे सारथ्य सूर्य भगवान करतात. स्थानिक लोक मात्र या मूर्तीला अर्जुन म्हणून संबोधतात. रथावर वीर हनुमान यांची मूर्ती स्थापन केली जाते. तसेच वरच्या बाजूला श्रीगणेशाची स्थापना केली जाते. रथावर पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या दोन मुर्ती लक्ष वेधून घेतात. या मुर्ती स्थापन करण्याचा मान अमृत महाजन यांच्या परिवाराकडे पूर्वीपासून आजही चालत आलेला आहे. पूर्वी विद्युतरोषणाई नसल्याने टेंभा व मशाली चढविण्याचा मान विशिष्ट घराण्यांकडे असायचा.

रथावरील व अन्य वहनमुर्ती खूपच रेखीव व आकर्षक आहेत. संपूर्ण लाकडात कोरीवकाम करून या मूर्ती घडवल्या आहेत.तसेच रथा वरील नक्षीकाम अप्रतिम आहे. रथाची उंची साधारणतः 26 फूट आहे. संपूर्ण सागवानी लाकडात तयार केलेला हा रथ काष्ठशिल्पकलेचा सुंदर नमुना असून त्यावरील वहन व इतर मुर्ती उठावदार आहेत.  रात्री दहा वाजेपर्यंत मूलस्थानी आल्यावर फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी केली जाते. रथाला मोगरी लावण्याचा मान पाटील चौधरी माळी व भोई समाज बांधवांकडे पूर्वापार चालत आला आहे. रथ ओढतांना मोगऱ्या लावण्याचे कसब व त्यांची चपळता पहिली की अंगावर शहारे येतात.

रथ मूळ स्थानावर आल्यावर होणारी आतिषबाजी बघण्यासारखी असते. ही परंपरा श्रीमंत सरदार पवार महाराज यांनी सुरू केली. त्याकाळी नदीपात्र पूर्ण मोकळे असल्याने हा देखावा खूपच आकर्षक वाटत असेल. रथ मूळ स्थानी आल्यावर विधिवतपूजा होऊन बालाजी महाराज मुळस्थानी येतात.त्यानंतर सर्व मानकऱ्यांना श्रीफळ व केळीचा प्रसाद वाटप केला जातो. त्यासाठी नगरदेवळे व परिसरातील तसेच वाडे, गुढे, बहाळ या गिरणा काळच्या परिसरातील शेतकरी बांधव स्वयंस्फूर्तीने केळीचे घड मंदिरात अर्पण करतात.

दिवाळीला आलेल्या माहेरवाशिणी रथाला नवस बोलून आपली मनोकामना पूर्ण झाली की पाच किंवा अकरा किंवा एकवीस नारळांचे तोरण अर्पण करतात. ही प्रथा आजही प्रचलित आहे. त्यासाठी पूर्ण जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यातील भाविक देखील इच्छापूर्तीसाठी रथाला हजेरी लावतात. रथाला तेलपाणी चढविण्यासाठी 60 किलो तेल लागते. त्यासाठी अनेक दानशूर भक्त दरवर्षी सढळ हस्ते मदत करतात.

पूर्वी या रथयात्रेसाठी पंचक्रोशीतील लोक बैलगाड्या भरभरून यायचे. त्यानिमित्त नदीपात्रात छान पैकी यात्रा भरायची. त्यात खाण्यापिण्याची चंगळ असायची मिठाईची यात्रा म्हणूनच ही यात्रा प्रसिद्ध होती.यात्रा निमित्ताने नवजात बालकांच्या जाऊळ उतरविण्याचा कार्यक्रम आजही केला जातो.या यात्रेनिमित्त सर्वत्र पाहुण्यांची वर्दळ असायची.दिवाळीपासून आलेल्या लेकीबाळी यात्रेसाठी आवर्जून थांबयच्या. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये यात्रेनिमित्त उत्साह असायचा.

यात्रा उत्सव शिस्तबद्ध व्हावा, मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून मागील अकरा वर्षांपासून गो. शि. म्हसकर, मिलिंद दुसाने व विकास चौधरी यांनी प्रयत्न करत श्री बालाजी मंदिर संस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. कै. राजू शेठ वाणी यांच्या नेतृत्वात  नवीन मंदिर पायाभरणीचा प्रारंभ होऊन स्लॅप लेव्हल चे काम पूर्ण झाले आहे. अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व ह. भ. प. सखाराम बुवा महाराज यांच्या 6 व्या पिढीतील वंशज श्री विलास चौधरी व मंदिर ट्रस्टचे सदस्य मिलिंद दुसाने यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या दुर्दैवी धार्मिक दंगलीमुळे यात्रेची पार अवकळा गेली आहे. या दंगलीमुळे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात भरीत भर म्हणून नदीपात्रात वाढलेली प्रचंड अतिक्रमणे, वाहनांची वर्दळ, धुळीचे साम्राज्य, बेशिस्त पार्किंग यामुळे यात्रेचा जीव गुदमरायला लागलाय.

यात्रेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जातीय सलोखा निर्माण करून आनंदाने दोनशे पंधरा वर्षांची परंपरा असलेला हा रथ उत्सव भविष्यात आदर्शवत ठरेल यासाठी समन्वय निर्माण केला पाहिजे. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आपल्या गावाचे हे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी पुन्हा एकदा सहकार्य केले पाहिजे. यातच आपले हित आहे.

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

Leave a comment