शिवचरित्राची साधने बखर

शिवचरित्राची साधने - बखर

शिवचरित्राची साधने बखर.

पुस्तक लेखमाला क्रमांक – ११

“बखर”! १६ ते १८ व्या शतकातील त्यावेळेस च्या घडलेल्या प्रसंगांची माहिती लिहिण्याचे एक महत्वाचे साधन होते. बखर म्हणजेच फारशी मध्ये “खबर” किंवा संस्कृत मध्ये”बख” म्हणजे बोलणे. थोडक्यात बखर म्हणजेच त्या प्रसंगाची “हकीकत” सांगणे.शिवचरित्राची साधने बखर.

इतिहास अभ्यासकांना बखरी या संशोधनासाठी एक महत्वाचा आधार असतो.

मराठी बखरीचा प्रथम परिचय करण्याचे महत्कार्य श्री राजवाडे आणि साने यांनी केले आहे.

शिवछत्रपती राजांचा अभ्यास करताना आपल्याला अनेक बखरींचा आधार घ्यावा लागतो.

त्यातून आद्य आणि महत्वाची बखर ही “सभासद बखर” आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार कृष्णाजी अनंत  सभासद यांनी शिवरायांच्या समकाळानंतर लिहिलेली एक महत्वाची बखर आहे. ही बखर अंदाजे इ.स. १६९७ ला लिहिल्याचे उल्लेख आहेत.यात शिवछत्रपती यांच्या आद्य लढाई आणि स्वराज्यावर चालून आलेल्या अनेक प्रसंगाचा उल्लेख आहे.ही बखर हेरवाडकर यांनी संपादित केलेली आहे.

याच बखरची यु.म.पठाण यांनी पुनः संपादित केलेली आवृत्ती सध्या उपलब्ध आहे.

शिवचरित्रपर बखरींची संख्या मोठी असली , तरीही सभासद बखर ही शिवचरित्राचे अस्सल साधन म्हणून खूपच विश्वसनीय आहे.

त्यानंतर “श्री शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर” ही वाकसकर यांनी  लिहिलेली बखर पण प्रसिद्ध आहेच. यात त्यांनी अजून काही ठळक मुद्दे उल्लेख संक्षिप्त पद्धतीने मांडलेले आहेत. तसेच या बखरीमध्ये भोसले घराण्याची पूर्ण वंशावळ अगदी नीट लिहिलेली आढळते.पण ही बखर वाचण्यासाठी तुम्ही “सभासद बखरीचे” वाचन करणे आवश्यक आहे.नाहीतर काही संदर्भ लक्षात येतच नाहीत. या बखरीत आपणास शहाजी महाराज यांचे चरित्र प्रथम अभ्यासायला मिळते. त्यानंतर शिवछत्रपती यांचे चरित्र यामध्ये सविस्तर लिहिलेले आहे.

त्यानंतरची एक महत्वाची बखर म्हणजे “शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र. हे चरित्र श्री मल्हार रामराव चिटणीस यांनी दुसऱ्या शाहू छत्रपतींच्या आज्ञेनुसार लिहिले आहे.हे चरित्र अंदाजे इ.स.१८११ मध्ये लिहिले गेले आहे.याची हेरवाडकर यांनी संपादित केलेली आवृत्ती सध्या उपलब्ध आहे.

या सर्वांमध्ये माझ्या संग्रहात अजून एक दुर्मिळ बखर आहे .ती म्हणजे “मराठी दप्तर- रुमाल १”.

ही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली शके १८३९ ची बखर आहे.या बखरीची अस्सल प्रत सातारा वाड्यातून घेऊन त्यानंतर तेथून परवानगी घेऊन ही बखर विनायक भावे यांनी लिहिलेली आहे.

हा झाला बखर या शिवचरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरण्यात आलेल्या साधनांचा उहापोह.पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या अजून काही महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.

आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या पोस्ट मधील एकमेव उद्देश.

बहुत काय लिहिणे?अगत्य असे द्यावे.

किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here