Durgbharari Teamइतिहासमहाराष्ट्र दर्शनमहाराष्ट्राचे वैभवमहाराष्ट्रातील गडकिल्ले

अनघाई

अनघाई

जिल्हा – रायगड
श्रेणी  –  मध्यम
दुर्गप्रकार- गिरीदुर्ग

प्रत्येक किल्ल्याचे स्वतचे असे काही न काही वेगळेपण असते आणी त्याच्या या वेगळे पणामुळे तो किल्ला कायमचा आपल्या लक्षात राहतो. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अनघाई नावाचा असाच एक वेगळेपणा जपणारा अपरीचीत किल्ला आहे. हा किल्ला आपल्या लक्षात रहातो तो त्याच्यावर चढाईसाठी पार कराव्या लागणाऱ्या घळीच्या वाटेमुळे. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला तब्बल २०० ते २५० फुट उंच तीव्र चढाई असलेली घळ चढुन जावे लागते. भौगोलिकदृष्टया हा किल्ला जरी पुणे जिल्ह्यात असला तरी यावर जाणारी वाट मात्र रायगड जिल्ह्यातील खोपोली-पाली रस्त्यावरील जांभूळपाडा जवळ असलेल्या कळंब गावातुन जाते. मुंबई पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला आजही अनेक दुर्गप्रेमीना अपरीचीत असुन हा किल्ला उजेडात आणण्याचे श्रेय आनंद पाळंदे यांना जाते.

स्थानिक लोक या किल्ल्यास अनघाई देवीचा किल्ला म्हणुन ओळखत असले तरी त्यांचा देखील या किल्ल्यावर फारसा वावर नाही. कळंब हे गाव मुंबईहुन १०० कि.मी.वर तर पुण्याहुन ११० कि.मी.अंतरावर आहे. खोपोली-पाली रस्त्यावरील जांभूळपाडा गावात शिरल्यावर रेस्ट इन फोरेस्ट या हॉटेलकडून डावीकडील वाट भेलीव या मृगगड पायथ्याशी असलेल्या गावात जाते तर उजवीकडील वाट सह्याद्रीच्या पुर्व पायथ्याशी ५ कि.मी. वर असलेल्या कळंब गावात जाते. कळंब गावातुन समोर पाहीले असता सह्याद्रीच्या रांगेपासून सुटावलेले तीन सुळके दिसुन येतात. यातील डावीकडील सुळका म्हणजे अनघाई किल्ला असुन हा किल्ला व त्याला लागुन असलेला डोंगर यामधील घळीतून किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. एकदा का गावकऱ्याकडून वाट समजुन घेतल्यावर हि घळ डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास चुकण्याची शक्यताच उरत नाही.

गावाबाहेर असलेली शेती व नदीचे पात्र पार करून दहा मिनिटात आपण टेकडावर असलेल्या आंब्याच्या बागेत येतो. या बागेत असलेल्या घरामागुन एक मळलेली वाट पठाराकडील जंगलात शिरते. या वाटेची खुण म्हणजे हि वाट दोन नारळांच्या झाडाकडून जाते शिवाय या वाटेवर सफेद रंगाने बाणाच्या खुणा दर्शविल्या आहेत. या बाणाच्या खुणा आपल्याला घळीच्या वाटेखाली असलेल्या पठारापर्यंत आणुन सोडतात पण तेथुन पुढे घळीच्या तोंडापर्यंत जाण्यासाठी खुणा नसल्याने व अनेक ढोरवाटा असल्याने घळ नजरेसमोर ठेवत आपला मार्ग आपणच काढावा लागतो. एकदा का रानातुन घळीच्या पायथ्याला आलो कि पुन्हा बाणाच्या खुणा दिसण्यास सुरवात होते. येथुन पुढे जाणारी वाट दाट जंगलात शिरते व पाचोळ्यातून वाटचाल करत अर्ध्या तासात आपल्याला नाळेच्या सुरवातीस असलेल्या एका नैसर्गिक गुहेपाशी आणून सोडते.

गावातुन इथवर येण्यास दीड तास लागतो. येथुन किल्ल्याचा माथा दिसण्यास सुरवात होते. या गुहेच्या वरील बाजुस असलेल्या घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट असुन वाटेच्या सुरवातीला काही पायऱ्या व त्याशेजारी बांबु रोवण्यासाठी खळगा पहायला मिळतो. हि वाट अरुंद अशा नाळेतून ६०-७० अंशात असलेल्या कातळ-शिळा चढत अर्ध्या तासात आपल्याला किल्ला व त्याशेजारी असलेला डोंगर या मधील खिंडीत आणुन सोडते. या खिंडीच्या दोन्ही बाजुला रचीव दगडांची तटबंदी बांधलेली आहे. या खिंडीत अनघाई किल्ल्याच्या कातळात ५-६ फुट उंचीवर वर चढण्यासाठी खाचा केलेल्या असुन २०-३० फुटांचा खोबण्या असलेला हा भाग कातळारोहण करत सावधपणे पार केल्यावर खोदीव पायऱ्या लागतात. पावसाळ्यात हा कातळ चढणे धोकादायक आहे.

सुरवातीला हि वाट उजवीकडे जात नंतर डावीकडे वळते. या वाटेवर आपल्याला कातळात खोदलेले एक लहान गोलाकार टाके पहायला मिळते. या टाक्यात पाणी उतरण्यासाठी पन्हाळी खोदली आहे. हे टाके पार करून आपला गडावर प्रवेश होतो. या ठिकाणी डोंगर उतारावर दोन टाकी खोदलेली असुन यातील एक टाके अर्धवट खोदलेले आहे. वाटेच्या पुढील भागात उघडयावर असलेली अनघाई देवीची अनगड मुर्ती पहायला मिळते. गोलाकार आकाराचा किल्ल्याचा परीसर साधारण दीड एकरवर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची १२१० फुट आहे. किल्ल्याच्या माचीवर सुरवातीची तीन टाकी वगळता अजून पाच टाकी पहायला मिळतात. यातील दोन टाकी अर्धवट बुजलेली असुन उर्वरित तीन टाक्यांचा समुह आहे. यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. पण ते केवळ मार्च महीन्यापर्यंत टिकत असावे.

किल्ल्याच्या पठारावर खडक फोडण्यासाठी केलेले खळगे तसेच एका घराचा कातळावर कोरलेला पाया पहायला मिळतो. किल्ल्याचा छोटेखानी आकार पहाता अनघाई किल्ल्याचा वापर कोरीगड आणि खोपोली, पाली परिसरावर टेहळणीसाठी होत असावा. किल्ला फिरण्यास १५ मिनिटे पुरेसी होतात. किल्ल्यावर जाऊन परत गावात येण्यासाठी साडेचार तास लागतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
www.durgbharari.com
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close