महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

आज्ञापत्र

By Discover Maharashtra Views: 1378 3 Min Read

आज्ञापत्र –

“तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामी (छत्रपति शिवाजी महाराज) यांणी हें राज्य कोणे साहसे वा कोणे प्रतापे निर्माण केले… तीर्थरूप कैलासवासी महाराज साहेब (शहाजीराजे) यवनाश्रये असतां त्यापासोन पुणे आदिकरून स्वल्प स्वास्ता स्वतंत्र मागोन घेऊन पंधरा वर्षांचे वय असतां त्या दिवसापासोन तितकेच स्वल्पमाचे स्वसत्तेवर उद्योग केला.”(आज्ञापत्र)

“तैसेच ‘उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:’ या दृढ बुद्धीने शरीरास्था न पाहता केवळ अमानुष पराक्रम, जे आजपर्यंत कोण्हे केले नाहीत व पुढे कोण्हाच्याने कल्पवेना यैसे स्वांगे केले. येकास येक असाध्य असता स्वसामर्थ्ये सकळांवरी दया करून येकाचा येकापासून उपमर्द होऊ न देता, येकरूपतने वर्तवून त्या हातून स्वामिकार्ये घेतली. दक्षिणप्रांते इदलशाही, कुतुबशाही, निजामशाही ही महापराक्रमी सकलार्थे समृद्धिवंत संस्थाने, तसेच मोगल येकेके सुभा लक्ष लक्ष स्वारांचा, याविरहित, शामल, फिरंगी, इंगरेज, जवार-रामनगरकर, पालेकर, सोंधे, बिदनूर, म्हैसूरवाले, त्रिचनापल्ली आदिकरून संस्थानिक तैसेच जागा जागा पुंड पाळेगार व चंद्रराव, सुर्वे, सावंत, दळवी, वरघाटे, घाटगे, माने आदिकरून देशमुख कांटक सकलहि पराक्रमी, सजुटे, समानपुर असतां बुद्धिवैभवे व पराक्रमे कोण्हाची गणना न धरितां, कोण्हावरी चालोन जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिलें. कोण्हावरी छापे घातिलें, कोण्हांस परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केले, कोण्हाचे डेरियात शिरोन मारामारी केली, कोण्हासी येकांगी करून पराभविले, कोण्हासि स्नेह केले, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिलें…

जलदुर्गाश्रयित होते त्यांस नूतन जलदुर्गच निर्माण करून पराभविले. दुर्घटस्थळी नौकामार्गे प्रवेशले. यैसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रु त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले, तैसेचि जलदुर्ग व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली. चाळीस हजार पागा व साठ-सत्तर हजार सिलेदार व दोन लक्ष पदाती, कोट्यवधी खजाना तैसेच उत्तम जवाहीर सकळ वास्तुजात संपादिले. शहाण्णवकुळीचे मराठयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थानी स्थापून याजनादि षटकर्म चालविली. तस्करादि अन्यायी यांचे नाव राज्यांत नाहीसे केले. देशदुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करून येकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली. औरंगजेबासारखा महाशत्रु स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंत विख्यात कीर्ति संपादिली ! तें हे राज्य !”

– रामचंद्रपंत अमात्य विरचित ‘आज्ञापत्र’.

पाच छत्रपतिंच्या कारकिर्दी पाहिलेल्या रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्राच्या सुरुवातीला शिवछत्रपतिंच्या अद्वितीय कर्तृत्वाचे सार थोडक्यात लिहिलेले आहे त्यातील हा भाग. भाषा तीनशे वर्षांपूर्वीची असली तरी नीट वाचले तर सहज समजून जाईल. जरूर वाचा. महाराजांच्या स्फूर्तिदायक स्मरणाने ‘प्रत्येकवेळी’ रोमांचित होऊन जाते. आजचा दिवस आपल्या भाग्याचा.

संकलन – प्रणव कुलकर्णी.

“…मऱ्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाहीं !”

Leave a comment