महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,64,840

आडम किल्ला | Aadam Fort

By Discover Maharashtra Views: 3681 4 Min Read

आडम किल्ला | Aadam Fort

आडम म्हटले कि आपल्याला आठवतो तो आंग्ल संस्कृतीतील प्रथम पुरुष. आपल्या महाराष्ट्रात देखील आडम नावाचा असाच एक प्रथम पुरुष आहे पण हा पुरुष मानव नसुन गडपुरुष आहे. महाराष्ट्रातील आजवर ज्ञात असलेल्या सर्व किल्ल्यामधील सर्वात प्राचीन किल्ला म्हणजे आडम किल्ला(Aadam Fort). नागपुरजवळ असलेला आडम किल्ला(Aadam Fort) इ.स.पुर्व ५ वे शतक ते इ.स.पुर्व २ ऱ्या शतकाच्या दरम्यान बांधला गेला होता. आडमचा किल्ला नागपुरपासुन ५० कि.मी.अंतरावर तर कुही या तालुक्याच्या ठिकाणापासुन १० कि.मी. अंतरावर आहे. आडमला जाण्यासाठी नागपुर-महालगाव-वाडोदा-कुही-आडम असा एक गाडीमार्ग असुन नागपुर- व्हीरगाव– दावलीमेट- कुही- आडम असा दुसरा गाडीमार्ग आहे. दोन्ही मार्गांनी हे अंतर ५० कि.मी असुन या भागात वाहनांची फारशी सोय नसल्याने खाजगी वाहन वापरणे जास्त सोयीचे आहे.

आडम किल्ला गावाबाहेर पुर्व बाजुला असुन आजचे किल्ल्याचे स्वरूप म्हणजे मातीचा ढिगारा असलेली तटबंदी आहे. गावाबाहेर पडल्यावर समोरच एक तलाव असुन या तलावाच्या मागील बाजुस आडम किल्ल्याचे अवशेष आहेत. या तलावाशेजारी नव्याने बांधलेले एक मंदीर असुन या मंदिराशेजारी मध्ययुगीन काळातील विहीर आहे. या मंदीर परिसरात काही जुन्या समाध्या असुन या समाधीवर किल्ला भागात सापडलेले काही मातीत घडवलेले अवशेष आहेत पण ते नेमके काय असावे याचा बोध होत नाही.

साधारण लंबवर्तुळाकार आकाराचा हा किल्ला ३० एकरवर पसरलेला असुन ५ एकर परिसरात पाण्याचा तलाव तर उर्वरित भागात किल्ल्याचे अवशेष आहेत. हा तलाव म्हणजे येथे असलेली दगडमाती उकरून नगराभोवती दगडमातीची ढिगाऱ्याच्या स्वरूपातील तटबंदी बांधली गेली. खालच्या भागात पाणी जाण्यासाठी जागा असलेली अर्धगोलाकार चिखल-मजल्यांच्या स्वरुपाच्या संरचनेची ही तटबंदी आहे. तटबंदीच्या या टेकाडाची उंची ८ मीटर म्हणजे जवळपास २५ फुट आहे. इ.स.१९८७ ते १९९६ दरम्यान डॉ.अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व खात्याने या किल्ल्याच्या अंतर्गत भागात पूर्व-पश्चिम पाचशे मीटर आणि उत्तर-दक्षिणेस आठशे मीटर असे उत्खनन केल्याने आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. येथे केलेल्या उत्खननानंतर हा किल्ला पुर्व मौर्यकालीन असल्याची बाब समोर आली. हा किल्ला म्हणजे नगराभोवती कवच असलेला नगरदुर्ग आहे. या उत्खननात दगडी तटबंदी तसेच भाजलेल्या विटांचे बांधकाम अशा दोन्ही गोष्टी दिसुन आल्या. लंबवर्तुळाकार आकारात असलेल्या दगडी तटबंदीखाली नाली पुर्व बाजुस दरवाजा तसेच चार गोलाकार रचना (बुरुज) असल्याची गोष्ट समोर आली.

तटबंदी बाहेर विशेषत: पुर्वेला पुष्कळसे दफन झालेले अवशेष दिसुन आले. ताम्रयुगानंतर लोहयुगाच्या काळात लोखंडाचा वापर वाढल्यावर तटबंदीची उंची कमी करून त्याभोवती एक लहान खंदक खणण्यास सुरवात झाली. दगडी तटबंदीला चिखलाचा लेप करून मजबुती दिली गेली. या उत्खननाचा वृतांत पुरातत्व खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इ.स. पुर्व ६ व्या शतकात म्हणजेच गौतम बुद्धाच्या काळात भारतात जी सोळा महाजनपदे होती त्यात असक जनपदाचे नाव आढळते. या असक जनपदाची राजधानी आसिक नगर म्हणजेच आजचे आडम असावे कारण आडम येथील उत्खननात असक जनपदस्य असा ब्राह्मी लिपीत लेख असलेली मुद्रा सापडली आहे.

आडम येथील किल्ला भेटीत तेथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेस जरूर भेट द्यावी. तेथे या उत्खननासंबंधीची माहिती, उत्खनन केलेल्या वास्तुची तसेच उत्खननात सापडलेल्या वस्तुंची छायाचित्रे तर काही वस्तू प्रत्यक्षात पहायला मिळतात. या संग्रहालयासाठी तेथील शिक्षक व पुरातत्व अभ्यासक डॉ.मनोहर नरांजे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment