महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,57,595

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा देदीप्यमान वारसा

Views: 1
4 Min Read

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा देदीप्यमान वारसा

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांनांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली.मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर संस्थान आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते.या निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता.हैदराबाद संस्थानात तेलंगणा,मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.या भागातील जनता निझाम आणि त्याचा सेनापती कासीम रझवी यांचे अनन्वित अत्याचार सहन करत होती.अत्याचारी राजवट,गरिबी,धार्मिक सहिष्णुता,शिक्षणाची दुरावस्था यामुळे समाज त्रस्त होताआणि याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येथील जनतेने एक जनआंदोलन उभे केले याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू,गोविंदभाई श्राॅफ,बाबासाहेब परांजपे,यांसारख्या अनेक नेत्यांकडे होते.आंदोलनाचाच एक भाग म्हणून स्वामी रामानंद तीर्थांनी हिप्परगा येथे कुलकर्णी बंधू व अन्य राष्ट्रभक्तांच्या सहाय्याने राष्ट्रीय शाळेची स्थापना केली आणि हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग फुंकले.नंतर आर्य समाज संघटना,प्रादेशिक परिषदा व हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना झाली व आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले.

मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला.यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.अशा प्रकारे विविध प्रकारच्या बलिदानाने सुरू झालेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामात हजारो लोकांनी प्राणार्पण केले आणि शेवटी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ऑपरेशन पोलो च्या माध्यमातून हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि येथील जनता खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाला पूर्णत्वाकडे नेणारे एक दैदीप्यमान पान आहे.स्वामीजींसह त्याकाळच्या अनेक नेत्यांनी हैदराबाद संस्थानाला निजामाच्या तावडीतून मुक्त करून येथील सर्वंकष विकास साधण्यासाठी या लढ्यात उडी घेतली होती.आज या भागाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण झाली तरीही येथील पायाभूत सुविधांमध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती झाली नाही आणि हा भाग विकासाच्या बाबतीत उपेक्षित च राहिला.आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आपण स्वामी रामानंद तीर्थ व त्यांचे तपस्वी त्यागी जीवन जगणारे सहकारी,स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झालेले हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिक यांना आपण कृतज्ञ वंदन करूया.

एकेकाळी हैदराबाद संस्थानचा भाग असलेला मराठवाड्याचा भूगोल हा बालाघाटच्या डोंगरांनी व्यापलेला आहे.मराठवाडा हा भाग जरी विकासाच्या बाबतीत मागासलेला असला तरीही याच मराठवाड्याला संतांच्या पुण्याईचा ठेवा म्हणूनही ओळखतात.वेरूळची लेणी,नांदेडचा गुरुद्वारा, दौलताबादचा किल्ला यांसारख्या अनेक गोष्टी मराठवाड्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात.स्वामी रामानंद तीर्थंसारखे राष्ट्रवादी भक्त हेच या भागाच्या निस्सीम राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत.

अनेक शतके मोगलांचे राज्य,सव्वादोनशे वर्ष निजामाची एकछत्री,जुलमी गुलामगिरी व इंग्रजांचे अधिपत्य या सर्वांमुळे मराठवाड्याचा विकास अनेक शतके खुंटला होता.स्वातंत्र्यानंतर या भागाने शिक्षण,आरोग्य,सिंचन,कृषी या सर्वच क्षेत्रात वाखाणण्याजोगा विकास केलेला आहे.औरंगाबाद व नांदेड येथील विद्यापीठे ही मराठवाड्यातील विद्यार्थांसाठी शिक्षणाची माहेरघरे आहेत.स्वातंत्र्यानंतर जायकवाडीसह अनेक मोठे सिंचन प्रकल्प मराठवाड्यात झाले यातून कृषीसह अनेक क्षेत्रांना याचा मोठा फायदा झाला आहे.वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमुळे आरोग्य क्षेत्रातही अनेक बदल झाले.हा विकास जरी एका बाजूला असला तरीही आज या भागाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण होत आहेत तरीही मराठवाड्यातील शिक्षण व रोजगाराच्या अपुऱ्या संधी व त्यासाठी होणारे स्थलांतर यासारख्या गोष्टी या भागातील विकासासाठी मुख्य अडथळा आहेत.सततचा ओला-कोरडा दुष्काळ हा येथील शेतकऱ्यांसाठी मोठे संकट आहे यासर्वांवर आपल्याला मात करायची असेल तर एकतेची वज्रमूठ आवळून आपल्याला शासन दरबारी पाठपुरावा करावा लागेल.मराठवाड्याच्या विकासाचा वेध घेताना संघटितपणे प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते.आज मराठवाड्यापुढे सर्वात मोठे आव्हान जर कोणते असेल तर ते विकासाचे आव्हान आहे आणि मराठवाड्याचा मूलभूत विकास करायचा झाला तर सर्वांनाच संघटितपणे प्रयत्न करावा लागेल.
आजपासून हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचे अमृतमहोत्सवीवर्ष सुरू होत आहे यानिम्मिताने आपण या स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञ वंदन करून मराठवाड्याच्या विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करूयात.

प्रणव गजानन रुद्रवार (रा.लोहा,नांदेड)

Leave a Comment