शिवरायांचे आरमार : डच साधनांमधला तपशील –
यंदाची २०२६ ची शिवजयंती ३९६ वी आहे. अर्थात चारशेव्या शिवजयंतीला फक्त चार वर्षे उरलीत. शिवकाळानंतर इतकी अफाट स्थित्यंतरे होऊन आलेल्या सद्यकाळात आपण शिवचरित्राकडे कसे पाहणार आहोत, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याचे एकच एक उत्तर नाही. राजकीय अजेंडे काय, पक्षपरत्वे आणि सोयीपरत्वे बदलत राहतात. मात्र अजेंडा अर्थात दृष्टी कोणत्याही प्रकारची असली तरी काही मूलभूत तथ्ये महत्त्वाची आहेत, ती कधीही विसरता कामा नयेत. तीनेक वर्षांपूर्वी मी शिवजयंतीनिमित्त दै. लोकसत्तेत एक लेख लिहिला होता. त्यात हाच विषय मांडला होता की शिवछत्रपती त्यांच्या हयातीतच ग्लोबल झाले होते, हे आपण मुलांना कधी शिकवणार ? लंडन गॅझेटसारख्या तत्कालीन वृत्तपत्रातला उल्लेख असो, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नोंदी असोत, या गोष्टींचे महत्त्व स्वयंस्पष्ट आहे आणि सध्याच्या ग्लोबल युगात इतर कशापेक्षाही यांना अधोरेखित करण्याची गरज आहे. आजही माझे याविषयीचे मत आजिबात बदललेले नाही. पण गेल्या वर्षभरात डच साधनांमधला एक नवा तपशील हाती आला, ज्यामुळे आरमाराचा आणि एकूणच स्वराज्याचा दरारा किती दूरवर पसरला होता, याची जोरकस प्रचीती येईल.
ते साल होते इ.स.१६६५. सुरतेच्या पहिल्या लुटीनंतर वर्षभर उलटले होते. मिर्झाराजे जयसिंगाच्या नेतृत्वाखाली मुघल फौजेचा अफाट विळखा स्वराज्याला बसला होता. पुरंदरचा तह झाला होता, आग्र्याला जायची तयारी सुरू होती. हे सगळे सुरू असतानाच त्याच वर्षी बसरूरची आरमारी स्वारीही झाली – ज्यात महाराज जातीने हजर होते. शिवाय मराठ्यांची व्यापारी जहाजेही निर्वेधपणे कोकणच्या बंदरांहून बसरा, मोखा, मस्कत, वगैरे हजारो किमी दूरवरच्या प्रसिद्ध बंदरांकडे जात होती. १६६५ मधल्याच एका नोंदीनुसार कोकण किनारपट्टीवरची ८ ते ९ बंदरे स्वराज्यात होती आणि यांपैकी प्रत्येक बंदराहून दरवर्षी २ ते ३ जहाजे परदेशी बंदरांकडे जात असत. पुढे दक्षिणदिग्विजयानंतर तमिळनाडूच्या किनारपट्टीवरून मराठ्यांची व्यापारी जहाजे मलेशियालाही नियमितपणे जाऊ लागली. मराठ्यांचा दक्षिण भारतातील परदेशी सागरी व्यापार हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
नव्या नोंदीनुसार, १६६५ मध्येच शिवछत्रपतींची ४ जहाजे मस्कतच्या बंदरात शिरली, आणि त्याबरोबर तिथल्या अरब इमामाने (तिथल्या शासकालाच इमाम असे म्हणत) ती चारही जहाजे पकडली, त्यांवरचा माल जप्त करून लोकांनाही तुरुंगात टाकले. इतकेच नव्हे, तर ४ मोठी जहाजे आणि जवळपास १४ लहान जहाजे असे आरमारही त्याने पश्चिम किनार्यावर हल्ला करण्यास सज्ज केले होते. या इमामाचे नाव होते सैफ बिन सुलतान. याने अचानक असे पाऊल का उचलले, हे आज तरी इतिहासाला ठाऊक नाही. पण यानंतर जे घडले ते निव्वळ अभूतपूर्व होते. शिवछत्रपतींच्या आरमारात शंभरापेक्षा अधिक जहाजे आहेत हे त्याला जेव्हा समजले तेव्हा त्याने तो बेत रद्द केला व तो मस्कतच्या बंदरात सामानासह लपून बसला !!
मूळ डच मजकूर असा:
Den Iman van mascatta heeft vier scheepjes van Den Sevagie, in sijn Haven g’arresteert de schippers gevangen, ende goederen vrbeurt verclaert, deselve hadde een scheepsmacht van 4: schepen, en 12 â 14 fregatten gereet gemaeckt, om op de Indische Cust, den Sevagie, ‘t Hooft te bieden, maer verstaen hebbende desselfs macht over de hondert fregatten, buijten eenige schepensterck te wesen, is met zyn verder Equipagie te rugh getreden En heeft syn vaertuijgen binnen gehouden.
अर्थः
मस्कतच्या इमामाने शिवाजी महाराजांची चार जहाजे त्याच्या बंदरात पकडली, जहाजावरील लोकांना तुरुंगात टाकले आणि वस्तू जप्त केल्याचे जाहीर केले. आणि ४ मोठी जहाजे व १२ ते १४ फ्रिगेट्स अर्थात लहान जहाजे असा जहाजांचा ताफा सज्ज करून भारताच्या किनारपट्टीवर शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सज्ज केली. परंतु त्यांच्या आरमारात शंभरापेक्षा अधिक फ्रिगेट्स आणि जहाजे असल्याचे समजल्यावर तो त्याच्या सामानासह मागे फिरला आणि त्याची जहाजे आत (बंदरात) नेली.
हे पहिल्यांदा वाचले तेव्हा काय वाटले ते शब्दांत सांगता येणार नाही. तत्कालीन भारतीय सत्ताधीशांमध्ये सिद्दीसारख्यांचा अपवाद सोडल्यास पूर्णवेळ लढाऊ नौदल इतर कुणाचे फारसे नव्हते. पण सिद्दीचा जीव लहान होता. आदिलशाही, मुघल वगैरे मोठ्या राज्यांचे स्वतःचे असे लढाऊ नौदल नव्हते. त्यामुळे युरोपीय सत्तांचे समुद्रावर खूप फावत असे. सिद्दी व युरोपीयांपासून पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणासाठी महाराजांनी साधेसुधे नौदल नाही तर “आरमार” उभारले. या शब्दापासूनच त्याचे वेगळेपण सुरू होते. आरमार हा शब्द संस्कृत किंवा फारसी भाषेतला नसून, स्पॅनिश-पोर्तुगीज भाषेतल्या अर्माडा या शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थही लढाऊ जहाजांचा ताफा असा आहे – नुसता ताफा अभिप्रेत नाही. या आरमाराची स्थापना १६५७ मध्ये झाली. तेव्हापासून ते १६६५ मध्ये म्हणजे एक दशकही उलटले नसताना शिवछत्रपतींनी बसरूर स्वारी केली, अनेक व्यापारी जहाजे परमुलुखात पाठवली आणि आरमाराच्या दरार्याचा मस्कतच्या अरबांनाही धसका बसला.
हे अरबही कोणी साधेसुधे नव्हते. तब्बल शंभरेक वर्षे ओमानच्या किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते, ते त्यांनी १६५० मध्ये मोडून काढले आणि पुढील काही वर्षांत, विशेषतः १६७० नंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारतातल्या प्रदेशांवर धडाधड हल्ले चढवले. खर्या अर्थाने समुद्री सत्ता म्हणाव्यात अशी राज्ये आशिया खंडात खूप कमी होती – हे अरब त्यांपैकीच एक. पोर्तुगीजांसारख्या प्रबळ शत्रूची तमा न बाळगता त्यांनी जेव्हा भारतात हल्ले केले तेव्हा मराठ्यांना मात्र कसलाही उपद्रव दिला नाही. पुढे १६७९ ला तर पोर्तुगीजांविरुद्ध अरबांना मराठ्यांनी मदतही केलेली आढळते. यामागे शत्रूचा शत्रू तो मित्र ही नीती जशी होती तसे मराठ्यांच्या सामर्थ्याची १६६५ मध्ये अरबांना आलेली प्रचीतीही होती. पुढेही मस्कतसोबत मराठ्यांचा संपर्क अबाधित राहिला. कोकण किनारपट्टीहून मस्कतला दरवर्षी अनेक जहाजे जात. मस्कती तरांड्यांचा उल्लेख अनेक मराठी पत्रांत आढळतो.
ही घटना किती महत्त्वपूर्ण आहे याकडे पुनरेकवार लक्ष वेधणे गरजेचे वाटते. शिवाजी महाराजांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती पुणे प्रांतात – किनारपट्टीचा प्रदेशाची त्यांना सुरुवातीला माहिती नसूनही त्यांनी प्रबळ आरमार उभारले. त्याचा दरारा इतका, की मस्कतच्या कडव्या अरबांनाही त्याची दहशत वाटली. आपापल्या प्रदेशात सगळेच शेर असतात, मात्र स्वराज्यापासून हजारो किमी दूरवरही आरमाराचा दरारा पोचला, तोही स्थापनेपासून दशकभरही न होता ! शिवचरित्रामधील भव्यदिव्य घटनांमध्ये या माध्यमातून आणखी एकीची भर पडली आहे. शिवरायाचा आठवावा प्रताप, असे समर्थ रामदास म्हणून गेले आहेतच. त्याचेच हे रोकडे प्रत्यंतर आहे.
एरवी मराठ्यांच्या इतिहासाला केंद्रीय पातळीवर दुर्लक्षिले जाते असा महाराष्ट्रात प्रचलित सूर असताना सुदैवाने केंद्रीय पातळीवर याची दखल घेतलेली आढळते. एनसीईआरटीच्या नवीन अभ्यासक्रमात, इयत्ता आठवीच्या सोशल सायन्स विषयाचे भाग १ चे जे पाठ्यपुस्तक आहे त्यातील मराठ्यांविषयीच्या धड्याला तब्बल २२ पाने दिलेली असून, त्यातच ही घटनाही ठळकपणे उल्लेखिलेली आहे.
निखिल बेल्लारीकर
