महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,70,485

पांगरे बुद्रूक येथे सापडला शिलाहार कालीन शिलालेख

Views: 5
10 Min Read

पांगरे बुद्रूक येथे सापडला शिलाहार कालीन शिलालेख –

राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक या गावात एक शिलाहारकालीन शिलालेख उजेडात आला आहे. सदर लेखाची शिळा गावातील श्री हरिहरेश्वर मंदिर परिसरात एका ओट्यावर ठेवलेली आहे . आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या लेखाचे वाचन पुण्यातील इतिहास संशोधक श्री. अनिल दुधाणे यांनी केले त्यांना श्री. अथर्व पिंगळे यांचे सहकार्य लाभले असून त्यातून तत्कालीन राजकीय व धार्मिक परिस्थितीची माहिती मिळाली आहे. पांगरे बुदृक येथील श्री हरीहरेश्वर मंदिराचा पाया शिलाहार राजाने शके १०८२ म्हणजे सन ११६० साली घातल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे . त्यामुळे राजापूर तालुक्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत झाले आहे .

शिलाहार राजा हा शिलालेख दोन ओळींचा असून देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत आहे.शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने त्याची अक्षरे पुसट झाली असून झिजली आहेत शिलालेखात कालोल्लेख शके १०८२ म्हणजे सन ११६० असून तो बाराव्या शतकातील दिसतो. मजकुरात एका देवाच्या पीठिका (हरिहरेश्वर मंदिराचा ) म्हणजे पाया घातल्याचा उल्लेख असून तो शिलाहार वंशातील सर्वश्रेष्ठ राजा मल्लिकार्जुन याचा आहे.तो स्वतःस सिलाहार नरेंद्र ,महासमंताधिपती, तगरपूर परमेश्वर, महामंडळेश्वर अशी बिरुदे धारण करत असे .मल्लिकार्जुन देवाची कारकीर्द सन ११५५-११६२ अशी होती. त्याचे उत्तर कोकणवर प्रणालक (पन्हालेकाजी )येथे राज्य होते त्याचे शके १०७८ चा चिपळूण (पन्हाळे)स्तंभ लेख तसेच वसई येथील शके १०८३ शिलालेख प्रसिद्ध आहेत त्याने शेजारील राज्यांवर अनेक स्वाऱ्या करून मोठा राज्यविस्तार घडवून आणला होता. या मल्लिकार्जुन देवाने मंदिराचा पाया घालून त्यास (भूदान ) काही जमीन दान केल्याचा शिलालेखात उल्लेख आहे.. लेखाच्या शीर्ष भागात शापवचन आहे मजकुरावर गधेगाळाची आकृति कोरून ते पूर्ण केलेले दिसते. मल्लिकार्जुन देवाच्या राजवटीतील हा तिसरा शिलालेख उपलब्ध झाला आहे.

शिलालेखातील मजकूर:
१. सकु १०८२ विक्रम संव
२. त्सरे पिठिका

अर्थ: शालिवाहन शके १०८२ विक्रम संवत्सर म्हणजे सन ११६० साली पीठिकेचे म्हणजे बहुधा येथील हरिहरेश्वर देवालयाच्या पायाचे बांधकाम केले होते. ते कोणी केले त्यांची माहिती लेखात नाही मात्र त्यावेळी शिलाहार राजा मल्लिकार्जुन तेथे राज्य करत होता. त्याचे पन्हाळे व वसई येथील कोरीव लेख उपलब्ध आहेत. ही नोंद नष्ट करणाऱ्यासाठी गधेगाळाच्या रूपात शापवचन अंकित करण्यात आले आहे.

शिलाहार राजांच्या काळात (इ. स. ८१० इ. स. १२६०) दगडांवर दानाचा मजकूर लिहून ते जाहीर करण्यासाठी व प्रजेला लिहिलेले नियम पाळण्यासाठी असे दगड बनवले जायचे. अश्या दगडांवर वरच्या बाजूस सूर्य व चंद्र असतात. ज्याचा अर्थ असा होतो की या शिळेवर लिहिलेला दान व नियम चंद्र व सूर्य आकाशात असे पर्यंत अबाधित राहील या अर्थाने कोरलेले असतात तर वर काही जागा मोकळी सोडलेली दिसते. काही ठिकाणी या दगडांवर शिलालेखही कोरलेले दिसतात.
गाय हे राजाचे प्रतीक असून वासरू हे प्रजेचे प्रतीक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो असे यातून संबोधले आहे. गाय म्हणजे जमीन व वासरू म्हणजे जमिनीचा उपभोग घेणारा असा अर्थ अपेक्षित असतो. यावर राजाच्या आज्ञेचे प्रतीक आणि राजसत्ता म्हणून तलवारीचे ही चित्रांकन केलेले असते.

गधेगळ म्हणजे काय ?
गधेगळ म्हणजे असा दगड ज्यावर एक स्त्री आणि तिच्या सोबत प्रणय करणारा गाढव अशी आकृती कोरलेली असते सोबत चंद्र आणि सूर्य, शिल्पात हे कोरण्याचे कारण म्हणजे यावर कोरलेले दान इनाम वैगरे जे काही आहे ते अबाधित राहो असे होय. चंद्र आणि सूर्य यांच्या मध्याभगी त्या दानाचा अथवा ती कश्यासाठी उभारली आहे त्या कारणाचा उल्लेख असलेला लेख खालील भागात शापवाणी स्वरुपात किंवा आकृती स्वरुपात कोरलेली असते.

गधेगळचा अर्थ काढायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की, ‘गधे’ म्हणजे गाढव आणि ‘गळ’ म्हणजे दगड. गधेगळ हा स्पष्ट शब्दात सांगायचं तर दिलेली शिवी, ही शिवी कशासाठी तर पूर्वीच्या काळी मंदिर किंवा गाव यांना राजाश्रय होता. बऱ्याचदा मंदिरासाठी राजाकडून जमीन दान दिली जात. या गावासाठी अथवा देवा साठी दान केलेल्या जमिनीचा कोणी दुरुपयोग करू नये अथवा त्यावर अतिक्रमण करू नये म्हणून या वर शाप लिहिलेला असतो

“जो माणूस या जमिनीचा अथवा दानाचा गैरवापर करेल त्याच्या आईला गाढव लागेल ” हा शाप वाचायला बराच विचित्र आणि किळसवाणा वाटेलही ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना हा शाप समजावा म्हणून त्या वर दगडी शिल्पे कोरली जाऊ लागली. पण त्या मागचा हेतू एवढाच कि कोणी राजाज्ञेचा भंग करू नये आणि प्रजेवर वचक राहावा

कोट
शिलाहार राजे शैवमतावलंबी होते. त्यांच्या काळात ठाण्याजवळ अंबरनाथ, उत्तरेश्वर अशा अनेक मंदिरांचे बांधकाम झाले. शिलाहार राजा झंझ याने आपल्या नावाने १२ शिवालये उभारली होती. पांगरे बुद्रुक येथील हरिहरेश्वराचे मंदिरही शिलाहार राजांच्या काळात उभारले गेलेले दिसते.:- श्री अनिल दुधाणे ,अथर्व पिंगळे

टीप :-सदर कार्यात पत्रकार श्री विनोद पवार श्री दत्तात्रय शिंदे श्री गणेश नेर्लेकर ,श्री अंजय धनावडे यांचे सहकार्य लाभले

शिलाहार राजा मल्लिकार्जुन याचा इतिहास :-
शिलाहार राजा हरिपालदेवानंतर मल्लिकार्जुन गादीवर आला. त्याचे दोन लेख सापडले आहेत. एक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आणि दुसरा ठाणे जिल्ह्यातील वसई येथे. पहिला शक संवत् १०७८ (सन ११५६) चा असून त्यात सुप्रया नामक दण्डाधिपतीला (सेनाधिकाऱ्याला) प्रणालक देशाचा शासनकर्ता नेमल्याचा उल्लेख आहे. या लेखावरुन दक्षिण कोकण विक्रमादित्यानंतरही शिलाहारांच्या राज्यात राहिले होते, असे दिसते. बहुधा विक्रमादित्य निपुत्रिक वारला असावा आणि म्हणून दक्षिण कोकण ठाणे शाखेच्या अंमलाखाली आलेले दिसते. प्रणालक हे पूर्वोक्त प्रणाल (दापोली तालुक्यातील पन्हाळे) होय. वसईचा लेख शक संवत् १०८३ (सन ११६२) चा आहे. त्यात एका शिवालयाच्या जीर्णोद्धाराचा उल्लेख असून लखण उपाध्याय नामक ब्राह्मणाला लोणवाटक (भिवंडी तालुक्यातील लोनांड) ग्राम दान दिल्याचे सांगितले आहे.

हेमचंद्राने आपल्या ‘कुमारपालचरिता’ त’ चौलुक्य नृपति कुमारपाल याने पाठविलेल्या सैन्याशी मल्लिकार्जुनाने केलेल्या मुकाबल्याचे सविस्तर वर्णन केले आहे. मेरुतुंगानेही आपल्या ‘प्रबन्धचिन्तामणी’ त त्याचा वृत्तांत दिला आहे.’ पण तो काल्पनिक दिसतो. मेरुतुंग सांगतो की, मल्लिकार्जुनाने ‘राजपितामह’ हे बिरुद धारण केल्यामुळे कुमारपालाला चीड आली आणि त्याने अम्बड नामक आपल्या सेनापतीला कोकणावर हल्ला करण्याचा आदेश दिला. मल्लिकार्जुनाने त्याचा पराभव केला. तेव्हा खिन्न होऊन त्याने कृष्णगिरि (कान्हेरी) येथे कृष्ण वस्त्रे परिधान करुन कांही दिवस घालविले. कुमारपालाला हे समजताच त्याने सैन्याची मोठी कुमक त्याच्याकडे पाठविली. नंतर अम्बडाने मल्लिकार्जुनाचा पूर्ण पराभव केला, त्यांच्या हत्तीवर चढून त्याचा शिरच्छेद केला आणि कुमारपालाला त्याच्या राज्यसभेत वाहत्तर सामंतांच्या समक्ष त्याचे शिरकमल सादर केले. या वृत्तांतात बरीच अतिशयोक्ति दिसते. तथापि अनेक जैन ग्रंथांत उदयनाचा पुत्र अम्बड याने मल्लिकार्जुनाचा पराभव केल्याचाउल्लेख आहे खरा.’ तेजपालाच्या अबू प्रशस्तीत म्हटले आहे की परमारवंशी यशोधवलाचा पुत्र धारावर्ष रणांगणावर मोठ्या धैर्याने लढत असताना कोकण नृपतीच्या स्त्रिया नेत्रकमलांतून अश्रूचा वर्षाव करीत होत्या. या वर्णनातही पूर्वोक्त घटनेचाच उल्लेख आहे, असे काही विद्वान म्हणतात; पण हे वर्णन मोघम आहे. जयानकाच्या ‘पृथ्वीराजविजया’ त चाहमान राजकुमार सोमेश्वर याने कोकण नृपतीला कंठस्नान घातले, असे म्हटले आहे. पण हे उल्लेख कुमारपालाचा आश्रित हेमचंद्र यांच्या ‘कुमारपालचरिता’ त आढळत नाहीत. हेमचंद्र कुमारपालाचा समकालीन असल्यामुळे त्याच्या वर्णनाला विशेष महत्त्व आहे. आपल्या ‘कुमारपालचरिता’त हेमचंद्राने या युद्धाचे खालील वर्णन दिले आहे. : एकदा कुमारपाल आपल्या दरबारात बसला असता त्याचा सान्धिविग्रहिक येऊन कोकणवरील स्वारीचा वृत्तांत सांगू लागला. कुमारपालाची सेना कोकणाच्या राजधानीजवळ आली असता कोकणाधिपति तिचा प्रतिकार करण्याकरिता चालून आला. राजधानीवरचा हा हल्ला अनपेक्षित होता, असे दिसते. कारण हेमचन्द्रने वर्णन केले आहे की मल्लिकार्जुनाचे सैनिक विहीरीवर स्नान करण्याचे टाकून शत्रूचा प्रतिकार करण्याकरिता धावले. मल्लिकार्जुन मोठ्या शौर्याने लढला, त्याचे सैन्य शत्रूची फळी फोडून आत घुसले आणि क्षणभर असे वाटू लागले की कोकणाधिपति विजय होणार. पण तितक्यात गुर्जरांच्या सैन्याने एकवटून शत्रूची झुंज दिली. मल्लिकार्जुनाच्या हत्तीवर बाणांचा वर्षाव झाला. तेव्हा मल्लिकार्जुन खाली कोसळला आणि त्याच्या सैन्याची दाणादाण. झाली, आणि अशा रीतीने कुमारपाल ‘पश्चिमसमुद्राधिपति’ झाला.

हेमचन्द्राने या युद्धाच्या वर्णनात अम्बडाचा किंवा सोमेश्वराचा उल्लेख केला नाही. तसेच या युद्धात दोन चकमकी झाल्या, पहिलीत मल्लिकार्जुन विजयी आणि दुसरीत पराभूत झाला, असेही तो सांगत नाही. त्याच्या वर्णनात मल्लिकार्जुनाचे शिरकमल कुमारपालाला राजसभेत नजर केल्याचाही उल्लेख नाही. एकंदरीत त्याचा वृत्तांत जास्त विश्वसनीय वाटतो. नंतरच्या कालात या युद्धातील विजयाचे श्रेय अम्बडाला दिलेले दिसते.’ त्याला वणिक् (वनिया) म्हटले आहे. या कालात चाहमान राजकुमार सोमेश्वर अणहिलपाटण येथे राहत होता. म्हणून जयानकाने वर्णिल्याप्रमाणे त्याने या युद्धात भाग घेतला असणे शक्य आहे.

या युद्धाला कारण काय झाले ते निश्चितपणे सांगता येत नाही. मुजुमदारांनी म्हटले आहे की, या काळात कदंब होयसळाशी झगड्यात गुंतले असल्यामुळे त्यांच्याकडून धोका नव्हता. म्हणून मल्लिकार्जुनाने गुजराथवर स्वारी करण्याचे साहस केले असावे. पण हे बरोबर वाटत नाही. हेमचंद्र आणि मेरुतुंग या दोघांच्या वर्णनावरुन या युद्धात कुमारपाल हाच आक्रमक होत असे दिसते. हेमचंद्राच्या वृत्तांतावरुन तर गुर्जरांचा शिलाहारांच्या राजधनीवरचा हल्ला अगदी आकस्मिक व अनपेक्षित होता, असे दिसते. सामान्यतः शिलाहार राजे शांतताप्रेमी होते. त्यांच्या इतिहासांत त्यानी इतरांवर आक्रमण केल्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. याच्या उलट कुमारपालाने अनेक आक्रमक युद्धे केली असल्याचे माहीत झाले आहे. तेव्हा त्यानेच या प्रसंगीही आक्रमक पवित्रा घेतला असावा. मेरुतुंगाने सांगितलेले त्याचे पूर्वोक्त कारण मात्र काल्पनिक दिसते.मल्लिकार्जुनानंतर द्वितीय अपरादित्याला गादी मिळाली. पण त्याचे मल्लिकार्जुन शी नेमके नाते माहित नाही.त्याचे लोनाड, ठाणे आणि परळ येथे लेख मिळाले आहेत …

संदर्भ – शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख … वा. वा. मिराशी पान 69 ते 74

माहिती व संकलन :- अनिल दुधाणे
विनोद मनोहर पवार
पत्रकार , राजापूर

Leave a Comment