महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,41,268

शूलाग्री स्थिती

Views: 4
2 Min Read

शूलाग्री स्थिती

मग नगरीं घोषविलें कीं, ‘कोणीं करिल जो सुरापान,
त्याला शूलाग्रीं स्थिति, नाकीं साधुसि जसी दुरापा नै.’

नगरामध्ये अशी घोषणा करण्यात आली की, जो कोणी मद्य प्राशन करील त्याला शूलाग्री स्थिती म्हणजे सुळावर चढविण्यात येईल. मोरोपंतांच्या आर्याभारत मधली ही एक आर्या. . सुळावर चढविणे हा शिक्षा प्रकार प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात होता. केवळ शिक्षा म्हणूनच नाही तर काही वेळा आत्माहुती देण्यासाठी स्वतः सुळावर चढत असत.

वरंगळ स्टेशन जवळच्या बस स्थानकाचे काम चालू असताना एक शिल्प नुकतेच सापडले. यात एक वीर सुळावर चढलेला चित्रित केला आहे. यात डाव्या बाजूला एक स्त्री आणि उजव्या बाजूला कुत्रा कोरलेला आहे. वीरशैव समाजात शिवसायुज्य मिळवण्यासाठी अशी आत्माहुती देण्याची पद्धत होती. यात एखाद्या उंच ठिकाणाहून उडी मारून, गळा किंवा हातपाय कापून घेऊन किंवा सुळावर चढून शिवाचे सानिध्य मिळविणे हा उद्देश असे. सुळावर बसल्याने शरीर फुटून मृत्यू येई. स्वामीनिष्ठ सैनिकही त्यांच्या मालकाच्या मृत्यू पश्चात सुळावर चढत असत. हे शिल्प बहुधा अशा वीराचेच असावे.बाजूला दाखवलेला कुत्रा हा निष्ठेचे प्रतीक आहे. अशाच प्रकारचे आत्माहुतीचे एक शिल्प पेडगावच्या किल्ल्यातही पाहायला मिळते . ज्यात एका वीराचे हात पाय तोडताना आणि मुंडके उडवताना चित्रित केले आहे.

सुळावर चढण्याची शिक्षा देण्याबद्दलची मांडव्य ऋषींची कथा प्रसिद्ध आहे. मांडव्य ऋषी तपस्येत असताना चोर त्यांच्या आश्रमात लपले. सैनिकांनी चोरांना पकडले आणि मांडव्य यांच्यावर संशय घेऊन त्यांना सुळावर चढवले. तरीही मांडव्य जिवंत राहिले, तेव्हा राजाने त्यांना मुक्त केले. मांडव्य यांनी धर्मराजाला त्यांच्या शिक्षेचे कारण विचारले. धर्मराजाने सांगितले की, बालपणात मांडव्य यांनी किड्यांना टोचले होते, त्यामुळे ही त्यांना शिक्षा मिळाली. मांडव्य यांनी याला अन्याय मानून धर्मराजांना मानव योनीत जन्म घेण्याचा शाप दिला, ज्यामुळे धर्मराज विदुराच्या रूपात जन्मले. विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला आणणाऱ्या संत भानुदास यांनाही अशीच शिक्षा देण्यात आली होती परंतु त्या सुळाचे फुलांच्या झाडात रूपांतर झाले अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.
भारतीय संस्कृती कोशात शूलिक नावाच्या जमातीचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण पुरुष आणि शूद्र स्त्री यांची ही विवा‌ह्वाह्य संतती होय. गुन्हेगारांना सुळावर चढविणे, हा त्यांचा व्यवसाय होता. वैखानस म्हणतो की, क्षत्रिय पुरुष आणि शूद्र स्त्री यांची ही विवाहबाह्य संतती आहे.

© सतीश भि. सोनवणे

Leave a Comment