महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्टa>👈 Website Views: 92,28,484

हनुमंत अंगद रघुनाथाला । जेधे बांदल शिवाजीला ।।

Views: 2288
2 Min Read

“हनुमंत अंगद रघुनाथाला । जेधे बांदल शिवाजीला ।।”

हनुमंत अंगद रघुनाथाला । जेधे बांदल शिवाजीला ।। अर्थात “ज्याप्रमाणे अंजनीसुत हनुमान आणि अंगद प्रभु श्रीरामचंद्रांना सोबतीला होते. त्याचप्रमाणे आज जेधे आणि बांदल मंडळी श्री शिवछत्रपतींना साथ देत आहेत.”

अफजलखान प्रसंगात जेधे शकावली या समकालीन साधनात वापरलेले वरील वाक्य अगदी समर्पक आहे. जेधे शकावली मध्ये अफजलखानाच्या वधाची हकीकत दिली आहे ती पुढीलप्रमाणे :

“मार्गशीर्षमासी शुद्धपक्षी सप्तमीस गुरुवारी प्रतापगडाचे माचीस अफजलखान बरोबर पालखी व हेजीब घेऊन हुदकरासमवेत भेटीस आले. राजश्री स्वामी किल्ल्यावरून उतरून भेटीस आले. भेटीचे समयी येकांगी करून अफजलखान जीवे मारला. सीर कापिले. जिवा महाला व लोक कान्होजी नाईक यांचे पुत्र बाजी सरजाराऊ यांनी युद्धाची शर्थ केली. आवाज प्रतापगडावरी जाला. तेव्हा कान्होजी नाईक जेधे जमावानिशी व बांदल देखील यांणी पारावरी चालोन घेऊन लष्करांत मारामारी केली. लष्कर अगदी बुडविले. काही पळून गेले. तेव्हा खंडोजी खोपडा पाडाव जाला. त्यास राजश्री स्वामींनी शास्त केली. कान्होजी नाईक जेधे व लोक निष्ठा धरून राहिले त्यांची नवाजीस केली…….. पवाडा केला त्यामध्ये आहे की, “हनुमंत अंगद रघुनाथाला जेधे बांदल शिवाजीला.” (संदर्भ : जेधे शकावली)

येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सन १६५९ साली एक पोवाडा रचला जातो आणि त्यात त्याचा कर्ता “प्रभु रामचंद्रासारखाच एक लोकपुरूष येथे जन्माला आला आहे. आणि त्याला साथ देणारे मावळे म्हणजे जणू रामचंद्राला साथ देणारी वानरसेनाच आहे” अशी भावना मनात धरतो, ही गोष्ट कोणत्याही जिज्ञासूला अर्थातच अचंबित करणारी आहे.

याला कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर विभूतीमत्व. छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व उल्लेखनीय होते. साधनांची सर्वतोपरी दरिद्रता असतांनाही त्यांनी शुन्यातून नवे विश्व निर्माण करुन दाखविले. शत्रूंचे बळ लक्षात घेऊन त्यांना कुठल्या रेषेवर खिळवून ठेवायचे हे ही ते जाणत होते. वेगवेगळ्या प्रसंगी युध्दाचे वेगवेगळे प्रकार हाताळून त्यांनी शत्रूंना नामोहरण केले व अखेर शत्रूंचा विनाश अटळ होईल एवढी संजीवन शक्‍ती उत्पन्न केली. यामुळे तत्कालीन लेखक, कवी, शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्याची महती अशा समर्पक शब्दांत मांडणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.

– संकेत पगार

Leave a Comment