हरिहर : एक देह, दोन तत्त्वे
संहार आणि पालन यांचे संतुलित सौंदर्य.
भारतीय देवप्रतिमांच्या परंपरेत काही संकल्पना अशा आहेत की त्या केवळ शिल्परूप म्हणून पाहाव्यात अशा नसतात; त्या अनुभवाव्या लागतात. “हरिहर” ही त्यापैकीच एक अद्वितीय आणि गूढ संकल्पना आहे. शिव आणि विष्णू .
भारतीय भक्तीपरंपरेतील दोन महान प्रवाह. एक तप, वैराग्य, संहार आणि अनासक्तीचे प्रतीक; तर दुसरा पालन, करुणा, संतुलन आणि संरक्षणाचा अधिष्ठाता. परंतु भारतीय तत्त्वज्ञानाने या दोघांना कधीही परस्परविरोधी मानले नाही. उलट, या दोन्ही तत्त्वांचा संगम म्हणजेच विश्वाचे पूर्णत्व आहे, असे मानले. त्या विचाराचे मूर्त, सजीव आणि कलात्मक रूप म्हणजे हरिहर.
“शिवाय विष्णुरूपाय, विष्णवे शिवरूपिणे” हा वचनप्रचार भक्तिभाव व्यक्त करत असतानाच एका गूढ तात्त्विक सत्याकडे निर्देश करतो. पालन आणि संहार हे विरोधी नसून सृष्टीच्या अखंड चक्रातील पूरक टप्पे आहेत. जे निर्माण होते ते टिकते, आणि जे टिकते ते परिवर्तन पावते. म्हणूनच शिव आणि विष्णू ही दोन वेगवेगळी तत्त्वे नसून, त्या एकाच परमसत्याचे दोन आयाम आहेत. हरिहर प्रतिमा या एकात्मतेचे साक्षात दृश्य विधान आहे.
शिल्पशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर हरिहर प्रतिमा ही संतुलनाच्या परमोच्च कसोटीवर उभी असलेली कलाकृती आहे. एका देहात दोन वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जिवंत ठेवणे हे शिल्पकारासाठी अत्यंत आव्हानात्मक कार्य आहे. शिवभागात जटामुकुटाची उग्र रचना, अर्धचंद्राची लय, कंठातील नागाची वलये आणि त्रिशूळाची उभी रेषा , हे सर्व तपस्वी गांभीर्य दर्शवितात. त्याच वेळी विष्णुभागात किरीटमुकुटाची रेखीवता, शंख–चक्राची सममिती, अलंकारांची सौम्यता आणि अंगकाठीतील संतुलित लय . पालनतत्त्वाची करुणामय अभिव्यक्ती घडवितात.
केवळ आयुधे किंवा अलंकार यांपुरतेच भेद मर्यादित राहत नाहीत. मुखमुद्रेतही दोन वेगळे स्वभाव जाणवतात. एका बाजूस समाधिस्थ, अंतर्मुख आणि गंभीर भाव; तर दुसऱ्या बाजूस आश्वासक, शांत आणि सौम्य अभिव्यक्ती. तरीही या दोन भिन्न छटा कृत्रिम वाटत नाहीत. उलट, त्या एका अखंड रेषेत विलीन होतात. हा विरोधाचा नव्हे, तर संतुलनाचा उत्सव आहे . शिल्पकाराच्या विलक्षण प्रतिभेचा परिपाक.
इतिहासात गुप्तोत्तर काळापासून हरिहर प्रतिमांची उदाहरणे आढळतात. दक्षिण भारतातील चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात या संकल्पनेला विशेष स्थान लाभले. मंदिरांच्या भिंतींवर, गर्भगृहाच्या निकट किंवा मंडपातील कोरीव कामात हे संयुक्त रूप दिसते. उत्तर भारतातही या परंपरेचा प्रभाव जाणवतो. कोलकात्यातील Indian Museum मध्ये जपलेली दहाव्या शतकातील सूरजकुंड (नालंदा, बिहार) येथील हरिहर प्रतिमा हा त्याचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या प्रतिमेकडे निरखून पाहताना जाणवते की कलाकाराने केवळ दगड कोरलेला नाही, तर दोन परंपरांना एकाच श्वासात बांधले आहे.
त्या प्रतिमेतील सूक्ष्म निरीक्षण केल्यास अनेक बारकावे लक्षात येतात. शिवभागातील जटा उग्र आणि विरक्त, तर विष्णुभागातील केशरचना सुव्यवस्थित आणि कोमल. एका बाजूस साधे कर्णाभूषण, दुसऱ्या बाजूस अधिक अलंकृत कुंडले. बाजूबंदांच्या नक्षीमध्येही भिन्नता स्पष्ट दिसते. जणू दोन स्वतंत्र शिल्पभाषा एकाच पाषाणात संवाद साधत आहेत. देहबांधात प्रमाणबद्धता, आयुधांची अचूक मांडणी आणि अलंकारातील सूक्ष्म सममिती हे त्या काळातील शिल्पवैभव अधोरेखित करतात.
जेव्हा मी ही प्रतिमा पाहिली, तेव्हा मन अनायासच वढोणा (हिमायतनगर) येथील परमेश्वर मंदिरातील हरिहर मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. दोन प्रदेश, दोन भिन्न कालखंड; परंतु तत्त्व एकच . अद्वैताचे सजीव शिल्परूप. या साम्यांतून तत्कालीन सांस्कृतिक देवाणघेवाणीची व्यापकता आणि भारतीय चिंतनपरंपरेची अखंडता प्रकर्षाने जाणवते.
हरिहर आपल्याला सांगतो की भेद हा वरकरणी आहे. संहार आणि संरक्षण, तप आणि पालन, तांडव आणि शांतता . हे सर्व एका परम तत्त्वाचे विविध आविष्कार आहेत. आजच्या काळात, जेव्हा आपण पंथ, विचार, मत आणि परंपरा यांच्या चौकटीत अडकतो, तेव्हा हरिहराची प्रतिमा आपल्याला समन्वयाचा धडा देते. सहअस्तित्व आणि संतुलन हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे.
हरिहर म्हणजे दोन देवतांचा अर्धा-अर्धा संगम नाही; तो अद्वैताच्या जाणिवेकडे नेणारा पूल आहे. पाषाणात कोरलेला हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. त्या शिल्पातील केशरचना, कर्णाभूषण, आयुधांची सममिती, देहबांधातील प्रमाण आणि मुखमुद्रेतील सूक्ष्म भाव . हे सर्व पाहताना शिल्पकाराची प्रतिभा आणि भारतीय तत्त्वज्ञानाची गूढता अधिकाधिक उलगडत जाते.
कदाचित म्हणूनच हरिहर हे रूप केवळ मंदिरांच्या भिंतींवर नसून, आपल्या विचारांमध्ये आणि आचरणातही कोरले जाणे आवश्यक आहे. . . .
✍️ अमित हरीकृष्ण त्रिवेदी
तामसा रोड, तालुका भोकर
जिल्हा नांदेड
