बाळाजी विश्वनाथ (पेशवा) : अहमदाबादची लूट – मिरात-ए अहमदी (गुजरातचा इतिहास) मधून भाग १
*फार्सी* (अहमदाबादची लूट)
आमदन बालाजी बिश्वनाथ मरहता ब-अफवाज-ए गिरान व ताख्त नमुदन अक्सर परगनात व मआवदत नमुदन बाद गिरफ्तन दो लक व दू (दह) हजार रुपिया ब-सिग़े खंदनी अज़ बलदे अहमदाबाद
अज़ ऑंजा की पैवस्ते अफवाज-ए बहर अमवाज-ए पादशाही तअक्कुब व ज़द व दस्त मरहता मामुर बूदंद ब-हर जानिब की रुये मी आवर्द व कज़ाफादे दस्त ततावुल ब-ताख्त व ताराज दर अज़ मी करदीद. दर इन वला की रेहलत हजरत खुल्द मकान की बाद सिपरी शूदन पंजाह साल व कसरी ब-अर्जे जहूर आमद अजब तहेलका व तरफे आशुबी दर मुमालिक महरुसे रुख नमूद
*नज्म*
रफ्त ऑंकी बूद खानाए मुल्क उस्तवार अज़ु
रफ्त ऑंकी दाश्त कार जहानी करार अज़ु
खसुसान दर इन सुबा की बिनाबर नज्म व नस्क नाज़ीमान व फौजदारान व थानाबंदी कोलीयान व राजपुतान मुतमर्रीद मानंद रुबाह दर गोशा व विराने खजीदे बूदंद. सर ब-शोरश व फसाद दर दाश्तंद. अलावा आन चूं दखनियान दर मुकदमा अब्दुल हमीद खान चाश्ते खोर इन मुल्क शुदे बुदंद.
दर इन वला बालाजी बिश्वनाथ नामी ब-अफवाज-ए गिरान हमान होश दर सर व हमान दाईयाइ दर जमीर जा दादे अज़ राह जाबुआ आज़ीम इन सुबा गश्त व हम्मा जा ग़ारत कुनान गोधरा पैवस्त. नायब मुहम्मद मुराद खान बख्शी की फौजदारी ऑंजा बे ज़मीमे बख्शीगिरी दाश्त। चूं ताब मकावमत नियावरदे गुजारा गिरफ़्त व ब-दीन ब-हैज अक्सर फौजदारान बर्ख़ास्तंद। मराथा बे कसबे मुंदा रसीदे ऑंजा रा ब-ताख्त दर आवरदा आतिश दाद व इन खबर-ए वहशत असर बरुज़ दो शंबे शशम शहर सफर अल-मुज़फ्फर सना १११९ हजार व सद व नौवजदह अज़ तकरीर आमिल परगना मुहम्मदाबाद की अज़ क़ब्ल ख़्वाजा अब्दुल हमीद खान दिवान सुभा दर ऑंजा बूद रसीद की दखनियान अज़ कसबे नादियाद ब-इन तरफ रसीदे अंद व मुतवातिर व मुतवाली इन मानी ब-सदक मकरून गरदीदा शाइया शूद. दिवान सूबा व बख्शी ब-इत्तेफ़ाक़ यकदीगर नज्द इब्राहिम खान शीताफ्ते जाहर साख्तंद व दीर ब-वुजूह इन जमीद की बालाजी बिश्वनाथ मबलग़हाई खतिर कुली ब-सीग़ा माल आमानी की ब-इस्तिलाह आन्हा खंदनी गोयंद दाईया दारद
*मराठी*
मराठा बाळाजी विश्वनाथ याचे मोठ्या फौजेसह आगमन, त्याने अनेक पारगण्यांवर केलेला हल्ला व अहमदाबाद शहराकडून दोन लाख दहा हजार रुपयांची खंडणी वसूल करून परतणे
समुद्राच्या लाटांप्रमाणे असणाऱ्या बादशाही फौजा ( अफवाज-ए बहर अमवाज-ए पादशाही ) मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी सदैव तैनात असत, परंतु तरीदेखील मराठे सर्व बाजूंनी येत व लुटालूट करत (ब-हर जानिब की रुये मी आवर्द व कज़ाफादे दस्त ततावुल ब-ताख्त व ताराज दर अज़ मी करदीद.) पन्नास वर्षे राज्य केल्यानंतर हजरत खुल्द मकान ( औरंगजेब) यांचे नुकतेच देहावसान झाल्यामुळे राज्यात सर्वत्र एकच अस्वस्थता आणि खळबळ माजली. ( दर इन वला की रेहलत हजरत खुल्द मकान की बाद सिपरी शूदन पंजाह साल व कसरी ब-अर्जे जहूर आमद अजब तहेलका व तरफे आशुबी दर मुमालिक महरुसे रुख नमूद )
कविता –
घर रुपी राज्याची व्यवस्था कायम व स्थिर ठेवणारा निघून गेला !
जगाचे व्यवहार स्थिर ठेवणारा निघून गेला !
नाझीम, फौजदार आणि ठाण्याच्या कारभार पाहणाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे खास करून या सुभ्या मध्ये कान्याकोपऱ्यात व वैराण प्रदेशात कोल्ह्यांप्रमाणे पसरलेले बंडखोर कोळी व राजपूत यांनी परत आपले डोके वर काढले व बंडाळी केली. (खसुसान दर इन सुबा की बिनाबर नज्म व नस्क नाज़ीमान व फौजदारान व थानाबंदी कोलीयान व राजपुतान मुतमर्रीद मानंद रुबाह दर गोशा व विराने खजीदे बूदंद. सर ब-शोरश व फसाद दर दाश्तंद.) दखनी लोकांखेरीज अब्दुल हमीद खान याने देखील या प्रदेशाचा नाश्ता चाखला होता (उत्पन्न घेतले होते – अलावा आन चूं दखनियान दर मुकदमा अब्दुल हमीद खान चाश्ते खोर इन मुल्क शुदे बुदंद. )
या वेळेस तोच मनसुबा (लुटीचा) मनात ठेवून बाळाजी विश्वनाथ मोठी फौज घेऊन झाबुवाच्या मार्गाने या भागात आला ( दर इन वला बालाजी बिश्वनाथ नामी ब-अफवाज-ए गिरान हमान होश दर सर व हमान दाईयाइ दर जमीर जा दादे अज़ राह जाबुआ आज़ीम इन सुबा गश्त) व त्याने सर्व बाजूने लुटालुट करून गोधरा येथे आगमन केले. ( व हम्मा जा ग़ारत कुनान गोधरा पैवस्त.)
नायब मुहम्मद मुराद खान बख्शी याने – ज्याच्याकडे फौजदार आणि बख्शी अशी दुहेरी जबाबदारी होती – बाळाजी विश्वनाथाचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्य नसल्याने त्याच्याशी लढण्याच्या विचार सोडून दिला. इतर अनेक फौजदारांनी देखील बाळाजी विश्वनाथाचा सामना न करण्याचे ठरविले.
बाळाजी विश्वनाथ मराठ्याने मुंढा या गावात येऊन लुटालूट केली व गावाला आग लावली ( मराथा बे कसबे मुंदा रसीदे ऑंजा रा ब-ताख्त दर आवरदा आतिश दाद )
सोमवार ६ सफर १११९ हिजरी रोजी ( २८ एप्रिल १७०७) ख्वाजा अब्दुल हमीद खान याच्या वतीने मुहम्मदाबाद परगणा येथे असलेला आमील याच्या मार्फत ही भयंकर बातमी आली. ( औरंगजेब शुक्रवार, २८ जिल्काद १११८ हिजरी, २०/२१ फेब्रुवारी १७०७ रोजी मेला) त्या बातमीनुसार नादियाद कडून दखनी लोक या भागात आले असल्याचे समजले. यानंतर सतत आलेल्या बातम्यांवरून हे खरे असल्याची खातरजमा झाली.
ही बातमी ऐकल्यावर सुभ्याच्या दिवाण व बख्शी असे दोघे मिळून तातडीने इब्राहिम खानाला ही बातमी देण्यासाठी त्याच्याकडे गेले. ( दिवान सूबा व बख्शी ब-इत्तेफ़ाक़ यकदीगर नज्द इब्राहिम खान शीताफ्ते जाहर साख्तंद )
या दोघांनी इब्राहिम खानाला स्पष्ट केले की आपल्या संरक्षणासाठी म्हणून – ज्याला सर्वसाधारण भाषेत खंडणी म्हणतात – मोठी रक्कम वसूल करण्याचा बाळाजी विश्वनाथाचा मनसुबा आहे. ( दीर ब-वुजूह इन जमीद की बालाजी बिश्वनाथ मबलग़हाई खतिर कुली ब-सीग़ा माल आमानी की ब-इस्तिलाह आन्हा खंदनी गोयंद दाईया दारद )
भाग १ समाप्त
सत्येन सुभाष वेलणकर, पुणे