माझा मनमोहक वाद्य संग्रह !!

माझा मनमोहक वाद्य संग्रह !!

अनादिकालापासून सुरु असलेली, मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांच्या शोधांची तीव्रता जेव्हा कमी झाली तेव्हा हान मानव, रम्य असा निसर्ग, कला, सौन्दर्य अशा विविध दालनांकडे वळला असावा. संगीत हे तर अद्भुत आणि ईश्वरापर्यंत घेऊन जाणारे प्रासादिक दालन ! निसर्गाच्या रोजच्या घडामोडीतून, पशु-पक्षांच्या आवाजातून, वारा – पाऊस — झरे — धबधबे यांच्या अस्तित्वातून त्याला सूर तालांची अनुभूती मिळाली. पुढे मानवाला अधिक स्थैर्य लाभल्यावर या संगीताचा विकास होऊ लागला. त्याने सुरांची साधना आरंभिली आणि तालांवर हुकूमत मिळविली. साध्यासुध्या वस्तूंवर ताल धरता धरता त्याने जाणीवपूर्वक अभ्यास करून तालवाद्यांची निर्मिती केली. विविध इशारे, खाणाखुणांसाठी वापरल्या जाणाऱ्या आवाजांची अभ्यासपूर्ण बांधणी होऊ लागली….. आणि साक्षात ईश्वराचा स्पर्श लाभलेल्या संगीताची सुरम्य वाटचाल सुरु झाली !

विविध वाद्ये आपापल्या तालांनी सुरांची संगत करू लागली. अभिजन ते बहुजन, नगरांपासून जंगलांपर्यंत, देवळांपासून तमाशा फडांपर्यंत, भक्तीपासून शक्तीपर्यंत कुठलेही स्थान संगीताला वर्ज्य नव्हते. जसे स्थान – जशी गरज तसे सूर – राग आणि जसे सूर – राग तशी वाद्ये तयार होत गेली.
या संगीत वाद्यांची विभागणी किमान २००० वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. नाट्यशास्त्र निर्माता भरतमुनी याने वाद्यांचा उल्लेख अतोध्य वाद्य असा केला असून त्याने सर्व वाद्यांचे ४ प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे.
१) तत् वाद्य – ज्या वाद्यांमध्ये तंतू किंवा तारांचा वापर केलेला आहे ती वाद्ये म्हणजे तत् वाद्ये ! उदा.- तंबोरा, एकतारी, वीणा इ. तसेच यामध्येच एक वितत वाद्ये असाही उपप्रकार आहे.
२) सुषिर वाद्ये — ज्या वाद्यांमध्ये ती वाजण्यासाठी हवेचा वापर ( फुंकून किंवा अन्य प्रकारे } केला जातो ती सुषिर वाद्ये ! उदा. बासरी, सनई, शंख, तुतारी, हार्मोनियम इत्यादी.
३) अवनद्ध वाद्ये किंवा चर्म वाद्ये– ज्या वाद्यांमध्ये प्राण्यांच्या चर्माचा म्हणजेच चामड्याचा वापर केलेला असतो त्यांना अवनद्ध किंवा चर्म वाद्ये ! उदा.- तबला, मृदंग, ढोल,पखवाज इत्यादी
४) घन वाद्ये — पोकळपणा नसलेली वाद्ये म्हणजे घन वाद्ये ! अशा वाद्यांवरच आघात करून ती वाजविली जातात. उदा.– झांजा, घंटा, टाळ, चिपळ्या इत्यादी.

विष्णुधर्मोत्त पुराणातही वाद्यांचे वर्गीकरण चार प्रकारात केलेलं आहे. संगीत दामोदर ग्रंथामध्ये तत् वाद्ये ही देवांना, सुषिर वाद्ये गंधर्वांना, अवनद्ध वाद्ये राक्षसांना आणि घन वाद्ये किन्नरांना आवडतात असे म्हटले आहे. संगीत रत्नाकरामध्ये एकल ( solo ) वादनासाठी, संगिताला साथ करण्यासाठी, नृत्याला साथ करण्यासाठी आणि नृत्य व संगिताला एकत्रित साथ करण्यासाठी असे वाद्यांच्या उपयोगावरून त्यांचे ४ भाग केले आहेत. बाराव्या शतकातील सोमेश्वराच्या मानसोल्लास या ग्रंथात, ” वाद्ये ही नृत्य आणि गायन यांचे सौन्दर्य आणि खुमारी वाढवतात ” असे म्हटले आहे.

अशाच विविध प्रकारच्या विविध वाद्यांच्या सुंदर प्रतिकृती माझ्या संग्रहात आहेत. या प्रतिकृती साधारणतः ६ इंच ते १५ इंच इतक्या आकाराच्या असून त्यामध्ये मूळ वाद्यांचे पूर्ण तपशील सामावलेले आहेत. तबला, हार्मोनियम ( पेटी ), मृदंग, वीणा, सारंगी ( सारंगीवर सुंदर चित्रे काढलेली आहेत ), सतार, तंबोरा, संतूर, तुणतुणे, तुतारी, तारपा,एकतारी, व्हायोलिन, गिटार, मेंडोलिन, घटम, ढोल, डमरू, इसराज, केरळी ढोल, जेंबे, बासरी, चिपळ्या अशा वाद्यांच्या या प्रतिकृती आहेत. एक पोकळ लाकडी बेडूक आणि छोटी काठी देखील आहे. यांच्या साहाय्याने बेडकाच्या ओरडण्यापासून ते घोड्यांच्या टापांपर्यंत अनेक आवाज काढता येतात. पूर्वी प्रत्येक गायकाच्या चेहेऱ्याआधी हमखास दर्शन देणारा जुना माईकही आहे. LP आणि EP प्रकारच्या वाटाव्यात अशा ४ / ४ रेकॉर्डसच्या प्रतिकृती देखील आहेत. एका कंपनीने त्या टी कोस्टर्स म्हणून काढल्या होत्या. सोबत माझ्याकडील या सर्व खजिन्याची छायाचित्रे देत आहेत.
पाहताना कुठलेही स्वर किंवा ताल ऐकू येणार नाहीत पण एक सौन्दर्य लहर नक्कीच जाणवेल !

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here