चैत्रातील हळदीकुंकू समारंभ आणि कुंकवाचे कलात्मक करंडे !

चैत्रातील हळदीकुंकू समारंभ आणि कुंकवाचे कलात्मक करंडे !

चैत्र पाडव्याला नवीन वर्ष सुरु झाले की पूर्वीच्या काळी वेध लागायचे ते पन्हे आणि आंबाडाळ हमखास मिळणाऱ्या हळदीकुंकू समारंभाचे ! चैत्र शुद्ध तृतीयेला गौरीची स्थापना करतात आणि तिचा मुक्काम वैशाख तृतीयेपर्यंत असतो. ती माहेरी आली आहे असे मानून त्या निमित्ताने होणारे हळदीकुंकू म्हणजे एक पर्यावरणीय – धार्मिक – सामाजिक समारंभ असे. शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवार अशा एक दिवशी, प्रत्येक घरात आजूबाजूंच्या स्त्रियांना आपल्या घरी बोलावून हळदीकुंकवाचा समारंभ केला जात असे. नवीन लुगडे ( पूर्वीचा शब्द ) नेसून, दागिने घालून शेजाऱ्यांकडे हळदीकुंकवाला जाणे ही स्त्रियांसाठी social gathering ची उघड संधी देणारी महत्वाची परंपरा होती. श्रीमंत यजमानीणबाईंना आपली श्रीमंती दाखवून आपला मोठेपणा अधोरेखित करण्याची तर ही सुसंधीच असे ! नटसम्राट बालगंधर्व हे स्त्री भूमिका उत्तमपणे साकारीत असत. पुण्यात ते एका घरी, स्त्री वेशभूषेत जाऊन हळदीकुंकू घेऊन आले तरी यजमानीणबाईंना पत्ताच लागला नाही, असा किस्सा पूर्वी सांगितला जात असे. पण प्रत्यक्षात असे काही घडले नाही असे नंतर कळले.

आता समारंभच हळदीकुंकवाचा म्हटलं की पूर्वापार चालत आलेल्या हळदीकुंकवाचे कलात्मक करंडे आणि कोयऱ्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात. या करंडे आणि कोयऱ्यांचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत.
१) घरच्या स्त्रिया स्वतःला जेव्हा कुंकू ( पिंजर ) लावीत असत तेव्हा एका खणाचे करंडे असत.
२) घरातील देवपूजेसाठी, हळदीकुंकू समारंभासाठी, हळद आणि कुंकू ठेवायला दोन खणांच्या कोयऱ्या असत.
३) सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात आणि देवळात, मोठ्या आकाराची पंचपाळी असायची.

या परंपरा साधारणतः आजही अस्तित्वात आहेत पण त्यात महत्वाचे बदलही झालेले आहेत. कुंकवाच्या कोरड्या पावडरऐवजी मेण असलेले लाल गंध, ओले प्रवाही दरबार गंध बाजारात मिळू लागले. आज कुंकवाऐवजी टिकल्या लावल्या जातात. ( अनेकदा बाहेरगावच्या हॉटेल्सच्या भिंतींवर, आरशांवर त्या मोठ्या प्रमाणावर विराजमान झालेल्या दिसतात ). पण आजसुद्धा धार्मिक कार्यक्रमात स्त्रिया एकमेकींना टिकल्या लावीत नाहीत तर हळदीकुंकूच लावतात. एरवी कुंकू लावलेच पाहिजे अशी सक्ती आता राहिलेली नाही. विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्ये, एखादी स्त्री दुष्ट दाखवायची असेल तर तिच्या कपाळावर मोठे उभे कुंकू लावलेले दाखवितात. जेवढे कुंकू मोठे आणि उंच तेवढी ती बाई दुष्ट, असा सुटसुटीत नियम असावा.

पूर्वापार कुंकवाचा संबंध सौभाग्य, अहेवपण, नवरा यांच्याशी जोडलेला आहे. कुंकवावरून मराठी भाषेत अनेक शब्द, वाक्प्रचार,
म्हणी अस्तित्वात आहेत. ” गरतीला कुंकू आणि मर्दाला तंबाकू ” ही गावाकडची महान अचूक म्हणायची ! कुंकू आजन्म, कायमचे राहावे म्हणून पूर्वी कुंकवाच्या जागी गोल ठिपका गोंदवून घेतला जात असे. नवऱ्याच्या पश्चात कुंकू लावायला कडक बंदी असे. वास्तविक नवरा वारला ही कांही त्या जिवंत राहिलेल्या स्त्रीची चूक नसायची ! पण तिला कमालीची अवहेलना, अपमान, हेटाळणी सहन करावी लागत असे. परंतु जर बायको वारली तर नवरा मात्र दुसरे, तिसरे लग्न करायाला मोकळा असे.

आपली अनेक शास्त्रे एकमेकांशी जोडलेली असत. धर्म आणि आयुर्वेद ही अशीच एक जोडी आहे. आयुर्वेदाला हळदीचे गुण माहिती होते. हळद ही पचनक्रिया, अल्सर, रक्तात गुठळ्या होणे, रक्तवाहिन्या ताठ / कडक होणे, विविध प्रकारचे कर्करोग, मधुमेह अशा त्रासांवर – रोगांवर गुणकारी ठरते. हळद ही जंतुप्रतिबंधाचे काम करते. जखम झाली, रक्तस्त्राव होऊ लागला तर लगेच त्यावर हळद चेपली जात असे. साहजिकच हळदीला धर्मातही महत्वाचे स्थान मिळाले. शुद्ध कुंकू सुद्धा हळदीवर चुना आणि कापूर यांची प्रक्रिया करून बनविले जात असे. आता कुंकू म्हणून बहुतांशी रासायनिक पावडर विकली जाते. हळदीकुंकू कपाळावर आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावले जाते त्याचे अध्यात्मिक फायदेही आहेत.

आणखी काळी हळद हा देखील एक प्रकार आहे. याचे शात्रीय नाव Curcuma caesia असे आहे. तांत्रिक आणि काळ्या जादूमध्ये ही खूप महत्वाची आहे. या काळ्या हळदीबद्दल अनेक गूढ प्रवाद आहेत, दंतकथा आहेत. या हळदीमध्येही खूप औषधी गुणधर्म आहेत. पण ही धार्मिक कार्यात वापरली जात नाही.
माझ्या संग्रहातील, वरील तीन प्रकारच्या करंडे आणि कोयऱ्यांकडे आपण ( छायाचित्रांच्या क्रमानुसार) वळूया. पहिला जुना करंडा हा फक्त कुंकू ठेवायचा तर मोराच्या सुंदर डबीला खाली एक शलाका असून त्याने डबीतील कुंकू लावायचे. मोराच्या पिसाऱ्यावर छोटे मणी आणि मागे चेहरा पाहायला छोटासा आरसा आहे. सुंदर मोर हा नर असूनही त्याला स्त्रियांच्या सौन्दर्य प्रसाधनात मानाचे स्थान आहे. पुढच्या छायाचित्रातील कुंकवाचे ४ करंडे हे जर्मन सिल्व्हर या धातुचे असून त्याला प्रत्येकी २ खण आहेत. खाली कुंकू ठेवायचे. मधील झाकणाला छोटा आरसा आणि झाकणाच्या वरच्या भागात कुंकवाआधी कपाळावर लावायचे नैसर्गिक मेण ठेवले जात असे. पुढच्या चित्रात हळदीकुंकवाच्या अस्सल जुन्या कोयरीवर एकूण ७ मोर आहेत. मुख्य मोराच्या दोन पंखांवर एकेक आणि पिसाऱ्यावर एक असे मोर असून त्याने चोचीत मासा पकडला आहे. सर्वात पुढचा मोर मान वळवून मागे पाहतो आहे. ही कोयरी खूपच सुंदर आहे. चांदीची मोर कोयरी ही सर्वत्र आढळते. नंतरच्या दोन पितळी कोयऱ्या अस्सल जुन्या आहेत. त्यापैकी एकावर शेषशायी विष्णू, लक्ष्मी, गरुड, हनुमंत आणि विष्णूच्या नाभीतून निघालेला ब्रह्मदेव आहे. नंतरच्या ३ कोयऱ्यादेखील प्रत्येक घरात असतात. त्यावर लक्ष्मी, गणपती आढळतात. आंब्याला धार्मिक विधींमध्ये मोठा मान आहे त्यामुळे आंब्याच्या आकाराच्या डब्या मुद्दाम बनविल्या जातात आणि आंब्यावरूनच त्यांना कोयऱ्या असे म्हटले जाते. नंतरच्या चित्रातील लाकडी पंचपाळ्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. यात ५ पाळ्या / खण आहेत. नंतरचा मोराचा पितळी चौफुला हा ५ खणांचा आहे. तर पुढच्या चे ६ व ५ खणांच्या डब्याची रचना आकर्षक आहे. सार्वजनिक ठिकाणी पूजेत ” नाना परिमळ द्रव्ये ” म्हणजे हळद, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध, शेंदूर, अक्षता वापरली जात असत त्यासाठी अगदी ९ खणांच्या डब्याही आढळतात पण म्हणताना त्यांना पंचपाळीच म्हणतात. बहुतेक देवळांमध्ये ( चोरीला जाऊ नयेत म्हणून ) ही पंचपाळी लाकडाची असतात. काही ठिकाणी अगदी दगडाचीही पाहायला मिळतात. लग्न, मुंजी, हॉलमध्ये साजरे होणारे धार्मिक कार्यक्रम यामध्ये चक्क २ स्टीलच्या वाट्या किंवा पानांच्या द्रोणात भरून ठेवलेले हळदी कुंकू पाहायला मिळते. नंतरच्या छायाचित्रात काही खास डब्या आहेत.

कोरीव नक्षीदार शृंगार डबी– आजच्या ‘मेक अप कॉम्पॅक्ट ‘ ची पूर्वज म्हणजे ही “शृंगार डबी”.. मधोमध लांब दांडीचा आरसा. त्या आरशाच्या मागेपुढे दांडीवरच बसविलेले आणि सरकवून उघडता येणारे दोन खोलगट गोल. या दोन खोलगट भागात कुंकू आणि काजळ असायचे आणि पाहायला छोटा आरसा.या दोन गोलांच्या बाहेर शृंगाराची द्योतक अशी राघूमैनेची जोडी. सगळ्या भागांवर छान कोरीव काम . सहजपणे कुठेही अडकवायला टोकाशी एक छानसा आकडा ! पूर्वी चेहेऱ्याला लावायला पावडर, क्रीम्स, लोशन्स, लिपस्टिक अशा काही गोष्टी नसल्याने कुंकू, काजळ आणि आरसा या तीन गोष्टीच महत्वाच्या होत्या.
नंतरची काळी डबी ही घुबडाच्या आकाराची असून ती चक्क जनावराच्या शिंगापासून बनविली आहे. घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. या डबीत कुंकू किंवा शेंदूर ( भांगात भरण्यासाठी ) ठेवला जातो. पुढच्या चित्रातील छोट्या भिंगासारखी पितळी डबी निझामाच्या प्रांतात वापरली जात असे. शेवटच्या चित्रातील वाट्या या आत्ताच्या आधुनिक काळातील आहेत.
चैत्रातील हळदीकुंकू करण्याचे प्रमाण आता कमी झाले असले तरी त्याचे socio-religeous स्वरूप कायम आहे तसेच हे करंडे – कोयऱऱ्यांचे वैभवदेखील कायमच राहणार आहे !

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here